राज्यात बीटी बियाण्यांची यंदाही विक्रीपूर्व तपासणी

राज्यात बीटी बियाण्यांची यंदाही विक्रीपूर्व तपासणी
राज्यात बीटी बियाण्यांची यंदाही विक्रीपूर्व तपासणी

पुणे : प्रथम शुद्धता तपासणी झाल्यानंतर बीटी कपाशी बियाण्यांची प्रत्यक्ष विक्री सुरू करण्यापूर्वी पुन्हा तपासणी करण्याचे धोरण यंदा देखील राबविले जाईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  तत्कालीन कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शेतकऱ्यांच्या ताब्यात बियाणे जाण्यापूर्वी तपासणी करण्याचे धोरण गेल्या हंगामात राबविले होते. त्यामुळे राज्यभरात काढण्यात आलेल्या दीड हजार नमुन्यांपैकी १०० वाणांचे नमुने ‘फेल’ निघाले. यामुळे अप्रमाणित लॉटमधील बियाणे शेतकऱ्यांना विकले जाण्यापूर्वीच विक्रीबंद आदेश दिले गेले. यातील काही कंपन्यांवर न्यायालयात दावेदेखील दाखल करण्यात आले.  विद्यमान आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी आता गेल्या हंगामापेक्षाही यंदा जास्त काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. राज्यात तयार झालेल्या बीटी बियाण्यांचे बीजोत्पादन केंद्रांवर तसेच गोदामांच्या ठिकाणी नमुने घ्यावेत. सदर नमुने फेल आढळल्यास त्याचा पुढील प्रवास तात्काळ रोखावा, असा आयुक्तालयाचा प्रयत्न आहे.  ‘‘बीटी कापूस बियाण्यांच्या विक्रीतील बनवेगिरी रोखण्यासाठी राज्यातील सर्व गुणवत्ता निरीक्षकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. यंदा कंपन्यांच्या पातळीवरच कठोरपणा आणण्यासाठी आम्ही बियाण्यांची अंतर्गत गुणधर्मांची ‘डीएनए’ तपासणी तसेच बियाण्यांच्या बाह्यगुणधर्मांची ‘डस’ चाचणीदेखील सक्तीची केली आहे,’’ अशी माहिती उच्चपदस्थ कृषी अधिकाऱ्याने दिली.  कृषी खात्याच्या आधीच्या कामकाजानुसार शेतकऱ्यांच्या हातात बियाणे पडण्यापूर्वी बाजारपेठांमधील बियाण्यांची तपासणी केली जात नव्हती. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर फसवेगिरी करणाऱ्या व्यक्तींचे फावत होते.  ‘‘बियाणे बाजारात बियाण्यांची पाकिटे गेल्यानंतर शेतकरी ‘फेल’ बियाणेदेखील विकत घेत होते. तसेच, विक्री चालू असताना कृषी खात्याचे निरीक्षक बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवत असत. तपासणीत असे नमुने निकृष्ट निघाल्यानंतर कंपनीवर कारवाई केली जात होती. मात्र, इकडे तोपर्यंत शेतकरी सदर फेल बियाणे पेरतो व नुकसानीला सामोरे जात होता. श्री. केंद्रेकर यांनी ही पद्धत बदलण्याचा प्रयत्न केला होता,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.  तपासणीमुळे पुरवठा विस्कळित होणार नाही महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९ आणि पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अशा दोन कायद्यांचा आधार घेत बीटी बियाण्यांची विक्रीपूर्व तपासणी करण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून केला जाणार आहे. परराज्यातील कंपन्यांच्या बीजप्रक्रिया केंद्रांवर जाण्याचा अधिकार कृषी विभागाला नाही. त्यामुळे या कंपन्यांच्या मुख्य वितरकांकडे माल येताच नमुने ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विक्रीपूर्व तपासणी कालावधीत बियाण्यांचा पुरवठा मात्र विस्कळित न होण्याची काळजी घेतली जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com