बल्क कुलर बंद
बल्क कुलर बंद

पाथरीतील शासकीय दूध संकलन केंद्रातील दोन बल्क कूलरमध्ये बिघाड

पाथरी, जि. परभणी : पाथरी येथील शासकीय दूध संकलन केंद्रातील दोन बल्क कूलर बंद पडल्याने बुधवारी (ता. १४) सकाळी दूध संकलन केंद्र सुरूच झाले नाही.
 
अचानक दूध संकलन केंद्राला कुलूप लावलेले दिसल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संतप्त झाले. दुधाची नासाडी होण्याच्या भीतीमुळे शेतकरी आक्रमक झाले. त्यामुळे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अखेर परभणी येथील शासकीय दुग्धशाळेत दूध पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सकाळी संकलित झालेल्या ९ हजार लिटर दुधाचा तात्पुरता मार्गी लागला. दूध साठविण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे दररोजच्या दूध संकलनाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
 
परभणी येथील शासकीय दूध योजनेअंतर्गत गेल्या १२ वर्षांपासून पाथरी येथे दूध संकलन केले जाते. गेल्या काही वर्षांत या भागातील शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळल्यामुळे दूध संकलन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. विशेषतः गतवर्षीच्या तुलनेत अडीच ते तीन हजार लिटरने दुधाची वाढ झाली आहे. सध्या तालुक्यातील दूध उत्पादक संस्थाकडून दररोज सरासरी १४ हजार लिटर दूध संकलन होते. तापमानात वाढ झाल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सकाळी ९ हजार लिटर आणि संध्याकाळी ५ हजार लिटर दूध संकलन केले जात आहे.
 
पाथरी येथील केंद्रात चार हजार लिटर दूध संकलन करण्याची क्षमता आहे. या ठिकाणी दूध थंड करण्यासाठी तीन बल्क कूलर आहेत. त्यापैकी एक बल्क कूलर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे दोन बल्क कूलरवर काम सुरू आहे. त्यात गेल्या चार दिवसांपूर्वी आणखी एक बल्क कूलर बंद पडल्याने दूध संकलनाचा प्रश्न निर्माण झाला.
 
दूध संकलन वाढल्यामुळे जिल्हा कार्यालयाने मंगळवारी (ता. १३) एक पत्र काढून दूध उत्पादक संस्थांकडून दूध संकलन केले जाणार नाही. संकलित केलेले दूध संस्थांनी परभणी येथे आणून घालावे, असे कळवले आहे. मात्र काही संस्थांना तसे पत्रच मिळाले नाही, त्यामुळे बुधवारी (ता. १४) नेहमीप्रमाणे सकाळी दूध घेऊन आलेली वाहने पाथरी बाजार समितीच्या परिसरातील संकलन केंद्रात आणली. मात्र केंद्राला कुलूप लावलेले दिसल्यामुळे दूध खराब होईल या भीतीने शेतकरी आक्रमक झाले.
 
रस्त्यावर दूध फेकून देण्याच्या तयारीत असताना घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी शासकीय अधिकारी, दूध उत्पादक संस्थेचे पप्पू घाडगे, विठ्ठल गिराम, अविनाश आम्ले शिवाजीराव नखाते, विजय कोल्हे, शेख खय्यूम यांच्याशी चर्चा घडवून आणली. या वेळी सर्व दूध परभणी येथील दुग्धशाळेत नेण्याचा निर्णय झाला. परंतु पुरेशा व्यवस्थेभावी दररोजचे दूध संकलन करण्याचा प्रश्न कायम आहे.
 
दरम्यान, पाथरी येथील शीतकरण केंद्रातील दूध साठवण क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. सध्या वाढीव दूध परभणी येथे स्वीकारणार आहोत. वाढत्या तापमानामुळे नासाडी होऊ नये यासाठी संस्थांना बर्फपुरवठा केला जात आहे, असे शासकीय दुग्धशाळेचे व्यवस्थापक एस. सी. पाखले यांनी सांगितले.
----------------------

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com