बार्शीत एसटी बस पेटवली; सोलापुरात रास्ता रोको

बार्शीत एसटी बस पेटवली; सोलापुरात रास्ता रोको
बार्शीत एसटी बस पेटवली; सोलापुरात रास्ता रोको

सोलापूर : पंढरपूर येथे आषाढी वारीच्या निमित्ताने १० लाखांपेक्षाही अधिक वारकरी आल्याने मराठा समाजाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून सौम्य आंदोलन सुरू होते. मात्र, आता वारकरी माघारी परतल्यानंतर आंदोलन तीव्र होत आहे. जिल्ह्यात बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, करमाळा, माढा अशा बहुतेक सर्व तालुक्‍यांत गुरुवारी (ता. २६) बंद, ठिय्या, जाळपोळ अशी आंदोलने सुरू होती. बार्शी तालुक्‍यात सर्वाधिक घटना घडल्या. सकाळी बार्शीजवळ करमाळा आगाराची पंढरपूरकडे जाणारी बस आंदोलकांनी जाळली, तर सोलापुरात हैदराबाद नाक्‍यावर रास्ता-रोको आंदोलन करण्यात आला.

बार्शी तालुक्‍यात आज संपूर्णपणे बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळे तालुक्‍यातील अनेक मोठ्या गावातील व्यापारीपेठा बंद राहिल्या. पानगाव, वैराग भागात अनेक ठिकाणी रस्त्यावर लाकडी ओंडके टाकून जाळपोळ करण्यात आली. तसेच रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. बार्शीत आज कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील पेट्रोल पंप, मेडिकल, हॉस्पीटलसह व्यापारीपेठा शंभर टक्के टक्के बंद राहिल्या. पांडे चौकात सामुदायिक मुंडन आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये मुस्लिम युवकांनीही भाग घेतला. तालुक्‍यातील कुसळंब येथे शिवाजी चौकात टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आला. तर पानगाव येथे सोलापूर-बार्शी महामार्ग रोखण्यात आला. नातेपुते ग्रामस्थांनी आक्रोश आंदोलन करत, दुकाने बंद ठेऊन शासनाचा निषेध केला.

करमाळा तालुक्‍यातील गौंडरे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माढा येथे जागरण गोंधळ घालीत केला ठिय्या आंदोलन करण्यात आले. मोडनिंब येथे शिवसेनेचे माढा तालुका उपप्रमुख नितीन गडधरे यांनी दिला राजीनामा दिला. उत्तर सोलापुरातील नान्नज येथे गाव बंद ठेवून सगळे व्यवहार बंद ठेवले. दक्षिण सोलापुरातील बोरामणी येथे सोलापूर- हैद्राबाद महामार्ग रोखण्यात आला. त्याशिवाय माळशिरस येथे कोळेगाव मध्ये रस्त्यावर टायर पेटवून आंदोलनाकडे लक्ष वेधले. मोहोळ तालुक्‍यातील पेनूर येथेही रास्ता-रोको करण्यात आला.

मंत्र्यांच्या घरासमोर आसूड आंदोलन

सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर शुक्रवारी (ता. २७) सकाळी आसूड ओढो अंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक माऊली पवार यांनी दिली. मराठा आरक्षणाच्या बाबत राज्यभरात आमदार राजीनामा देत आहेत. पंढरपूरच्या आमदारांनी जाहीर पाठिंबा देत मराठा आंदोलनासाठी आहुती दिलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व लाख रुपये मदत केली. मात्र या जिल्ह्याचे पालकमंत्री व मराठा समाजाचे व समाजाच्या बळावर निवडून आलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अद्याप मराठा मोर्चाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही. त्याविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे.

पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार भालकेंचा राजीनामा

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्‍नावर सुरू असलेल्या आंदोलनावरून पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठवला आहे. मुख्यमंत्र्यांनी समाजाला लेखी व तोंडी आश्‍वासन देऊनही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही किंवा याबाबतचा ठोस निर्णय घेतला नाही, सध्या राज्यात आंदोलनाचा वणवा पेटला आहे, अशा परिस्थितीत समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला पदावर राहण्याची नैतिकता वाटत नाही, असे त्यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com