नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १५ हजार क्विंटल तूर खरेदी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २१ शासकीय खरेदी केंद्रांवर तूर विक्रीसाठी २३ हजार ९०९ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. शनिवार (ता.१७) पर्यंत या तीन जिल्ह्यांतील २१ पैकी १९ खरेदी केंद्रांवर १,५८२ शेतकऱ्यांची १५ हजार ४४७  क्विंटल तूर खरेदी करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातील ९ खरेदी केंद्रांवर १० हजार ६५१ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. शनिवार (ता.१७) पर्यंत सर्व खरेदी केंद्रांवर १ हजार २७  शेतकऱ्यांची १० हजार ३८४.२६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये नांदेड (अर्धापूर) येथील खरेदी केंद्रांवर १,५१३ क्विंटल, नायगांव येथे १,८७२.५० क्विंटल, लोहा येथे ७६९ क्विंटल, बिलोली येथे १,२२६.७८ क्विंटल, देगलूर येथे १,०३१ क्विंटल, मुखेड येथे ७३१ क्विंटल, किनवट येथे १,७८९.९८ क्विंटल, भोकर येथे १,२७४.५० क्विंटल, हादगांव येथे १७६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

परभणी जिल्ह्यात नाफेडच्या ६ आणि विदर्भ कोर्पोरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या एक अशा एकूण सात तूर केंद्रांवर ८ हजार ८९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शनिवार (ता.१७) पर्यंत  नाफेडच्या परभणी येथील केंद्रावर २१८.५० क्विंटल आणि जिंतूर येथे १८९.५० क्विंटल, सेलू येथे १३६ क्विंटल, गंगाखेड येथे १२८ क्विंटल, पूर्णा येथे ४७५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.

मानवत येथील विदर्भ को. मार्केटिंग फेडरेशनच्या खरेदी केंद्रावर ५१८ क्विंटल परभणी जिल्ह्यातील ६ केंद्रांवर १,६६६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील ५ खरेदी केंद्रांवर ४ हजार ३५९ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. शनिवार (ता. १७) पर्यंत या ५ खरेदी केंद्रावर ३,३९७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये हिंगोली येथे ८२ क्विंटल, सेनगाव येथे १,३७२ क्विंटल, कळमनुरी ६१८ क्विंटल, वसमत येथे ४००.५० क्विंटल, जवळा बाजार येथे ९२४ क्विंटल तुरीचा समावेश आहे.

तीन जिल्ह्यांतील २४ हजार शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर तूर घेऊन येण्यासाठी एसएमएस पाठविले जात आहेत, परंतु अनेक शेतकरी केंद्रांवर तूर आणण्यासाठी इच्छुक नसल्याचे चित्र आहे.

बोरी बाजार समितीत अद्याप खरेदी सुरूच नाही

परभणी जिल्ह्यातील बोरी (ता. जिंतूर) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडच्या खरेदी केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रांवर जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ३९७ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. परंतु अद्याप या केंद्रावर तूर खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे  शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी शनिवारी (ता.१७) बाजार समिती कार्यालयाला कुलूप ठोकले होते. सचिव रावसाहेब गाडेकर यांनी गुरुवार (ता.२१) पासून खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com