राज्यात शनिवारपासून महारेशीम अभियान

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर   ः रेशीमशेतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शनिवारपासून (ता. १५) राज्यात महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात या अभियानाचे उद्‌घाटन होईल.

रेशीम संचनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बानायत म्हणाल्या, की पारंपरिक पिकाच्या तुलनेत रेशीम शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. शासनाचे कोश खरेदीचे हमीभाव १७८ रुपये क्‍विंटल असताना ७०० ते ८०० रुपयांना कोश खरेदी होत आहे. त्यावरूनच कोशाला असलेली मागणी लक्षात येते.

सध्या राज्यात १७ हजार ५०० शेतकरी रेशीम शेती करीत आहेत. त्यांच्या माध्यमातून १९ हजार ७०० एकरांवर तूती लागवड झाली आहे. यापुढील काळात हे क्षेत्र आणखी वाढण्याचा अंदाज आहे. शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत असल्याने या व्यवसायाकडे अधिकाधिक शेतकरी वळावे याकरिता रेशीम शेतीविषयक जागृती केली जाणार आहे. त्याकरिता १५ डिसेंबरपासून महा-रेशीम अभियान राबविले जाणार आहे.

या अभियानाच्या उद्‌घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री अर्जुन खोतकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, खासदार विकास महात्म्ये, आमदार सुधीर पारवे, समीर मेघे, डॉ. मिलिंद माने, जोगेंद्र कवाडे, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोनेकर, कृषी सभापती आशा गायकवाड यांची उपस्थिती राहील. अभियानाअंतर्गत रेशीम शेती करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार असून त्याकरिता ५०० रुपये प्रतिएकर असे शुल्क आकारले जाईल.  

शिर्ला येथे सुरू होणार अंडीपूंजनिर्मिती केंद्र राज्यात रेशीम शेतीला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर अंडीपूंज तुटवड्याचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. त्याची दखल घेत शिर्ला (ता. पातूर, जि. अकोला) येथे अंडीपूंजनिर्मिती केंद्र सुरू केले जाणार आहे. त्याकरिता बंगळूर येथील केंद्रीय रेशीम बोर्डाची शिर्ला येथे असलेली इमारत व जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. त्याठिकाणी यंत्रणा उभारून दरवर्षी सुमारे दहा लाख अंडीपूंज निर्माण केले जाणार आहेत. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी माहिती भाग्यश्री बानायत यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com