कॅनॉल दुरुस्तीची कामे आता जलयुक्‍त शिवारमधून

कॅनॉल दुरुस्तीची कामे आता जलयुक्‍त शिवारमधून
कॅनॉल दुरुस्तीची कामे आता जलयुक्‍त शिवारमधून

वर्धा : जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील तलावाच्या किंवा छोट्या धरणाच्या कॅनॉलची दुरुस्तीची कामे जलयुक्‍त शिवारमधून, लोकसहभागातून करण्यात येणार आहेत. त्यामुळे हजारो हेक्‍टर क्षेत्राची सिंचन क्षमता पुनरुज्जीवित होणार आहे. यासाठी नागरिकांनी कॅनॉल दुरुस्तीची मागणी पाटबंधारे विभागाकडे करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. 

रोठा येथे तलावाच्या कॅनॉल दुरुस्तीचे काम जलयुक्‍त शिवारमधून सुरू करण्यात आले. या कामाची नवाल यांनी पाहणी केली. रोठा गावात दोन तलाव आहेत. त्यापैकी तलाव २ मध्ये ८० टक्‍के पाणीसाठा आहे. मात्र मागील १४ वर्षांपासून दुरुस्ती न झाल्यामुळे या कॅनॉलमध्ये झाडे वाढली आहेत. या कॅनॉलमधून सिंचनासाठी सोडलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोचत नव्हते. या तलावाची सिंचन क्षमता १६२ हेक्‍टरची आहे. कॅनॉलची लांबी ५.६ किलोमीटर आहे. या तलावातून रोठा आणि पाडेगाव या दोन गावांतील शेतीला लाभ होऊ शकतो. त्यामुळे या कॅनॉलच्या दुरुस्तीची मागणी गावकऱ्यांकडून होत होती.

जिल्हाधिकाऱ्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना पाणी वापर संस्था तयार करावी आणि त्यासाठी अविरोध निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे सांगितले. कॅनॉलचे काम १५ दिवसांत पूर्ण होऊन तुम्हाला रब्बी गव्हासाठी पाणी मिळेल, त्यानंतर चारा लागवडीसाठी सुद्धा तलावाच्या पाण्याचा वापर करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ पाण्याची मागणी नोंदवावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

अशा पद्धतीच्या कॅनॉल दुरुस्तीची कामे कुऱ्हा, टेंभरी, हराशी या गावातसुद्धा होतील, अशी माहिती कार्यकारी अभियंता काळे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com