लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवार

लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवार
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवार

कऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा तुल्यबळ उमेदवार असेल. पक्षाने प्रत्येक मंत्र्याला लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी वाटून दिली आहे. माझ्याकडे माढा आणि सोलापूर मतदारसंघाची जबाबादारी आहे. त्यामुळे माढ्यात तुल्यबळ उमेदवारी देऊन तेथे कमळ फुलवणारच, असा विश्वास सहकारमंत्री सुभाषराव देशमुख यांनी व्यक्त केला. भाजप आणि शिवसेनेची युती होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

सहकार विषयावरील कार्यशाळेसाठी मंत्री देशमुख कऱ्हाडमध्ये आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर या वेळी उपस्थित होते. 

माढा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत देशमुख म्हणाले की, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा माढा लोकसभा मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार असेल. उमेदवार कोणीही असो, माढा मतदारसंघातून लोकसभेसाठी जो उमेदवार पक्ष देईल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. माढा येथे भाजपचा उमेदवार निवडून येईल. तेथे कमळ फुलेल. राज्यातील अनेक पतसंस्थांत गैरव्यवहार झाल्याचे समोर येत आहे, या प्रश्नावर ते म्हणाले, ज्या ठिकाणी गैरव्यवहार झाला आहे त्याची तपासणी सुरू आहे. दोषी आढळणाऱ्यांवर निश्चीतपणे कारवाई केली जाईल. 

साखरेला ३१०० रुपये दर देण्याची मागणी  

 कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपी देणे बंधनकारक आहे. देशात व राज्यात खूप मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन झाले. मात्र साखरेला उठाव नाही. त्यामुळे बफर स्टाॅकवरील व्याज द्यायचे, गोदामाचे भाडे द्यायचे, निर्यातीला अनुदान वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र साखरेचे भाव वाढत नाहीत. राज्य सरकारने मागील वर्षी २९०० रुपये साखरेची किंमत निश्‍चित केली. त्याखाली साखर विकता येत नाही. तर यावर्षी ती ३१०० रुपयांपर्यंत वाढवावी, अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे. २ रुपये वाढले तर साखरेचे दर वाढून उठाव होईल. शेतकऱ्यांना एफआरपी देणे शक्य होईल. सध्या किमान ८० टक्के तरी पैसे शेतकऱ्यांना द्यावे, असा प्रयत्न सुरू आहे, असेही सुभाष देशमुख म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com