बोंड अळीप्रकरणी चिखलीत मोन्सॅन्टो विरोधात गुन्हा दाखल

चिखली तालुका कृषी कार्यालयासमोर ठिय्या देताना स्वाभिमानीचे कार्यकर्ते.
चिखली तालुका कृषी कार्यालयासमोर ठिय्या देताना स्वाभिमानीचे कार्यकर्ते.

अकोला : बोंड अळी नुकसान प्रकरणी मोन्सॅन्टो कंपनीविरुद्ध चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या संदर्भात चिखली (जि. बुलडाणा) येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी (ता. १९) ठिय्या आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला कंपनीविरुद्ध तक्रार करावी लागली.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे या वर्षी बोंड अळीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बीटी कपाशीवर बोंड अळी पडल्याने शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक उपटून टाकले. लागवडीवर झालेला खर्चसुद्धा निघाला नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. मोन्सॅन्टो कंपनीने बीटी कपाशीचे वाण विकसित केले व हे वाण भारतात सर्वप्रथम याच कंपनीने आणले होते. 

बीटी कपाशीची लागवड करणाऱ्या चिखली तालुक्यातील सावरगाव भुसारी येथील बाबूराव नामदेव गरुड या शेतकऱ्याला बीटी कपाशीतून एकरात केवळ ७५ किलोच कापूस झाला. त्यामुळे या शेतकऱ्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे धाव घेऊन आपली कैफियत मांडली. त्या तक्रारीची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन पाटील बंगाळे यांनी चिखली येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन सुरू होते. प्रशासनाने दखल न घेतल्यास ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना कोंडून घेण्याचा इशारा दिला.

या आक्रमक पवित्र्यानंतर लगेच तालुका कृषी अधिकारी ए. टी. सुरडकर यांनी शेतकऱ्यांना घेऊन चिखली शहर पोलिस स्टेशनला मोन्सॅन्टो कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली. यावरून चिखली पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कलम ४२०, ४२७, कॉटन सीड ॲक्ट २००९ च्या कलम १३(१)नुसार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भरपाई मिळेपर्यंत आंदोलन : तुपकर बीटीचे मूळ तंत्रज्ञान हे मोन्सॅन्टो कंपनीने विकसित केले आहे. भारतात हे तंत्रज्ञान या कंपनीनेच आणले. त्यामुळे बोंड अळीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला कंपनीच जबाबदार आहे. कंपनीला सरकार पाठिशी घालत आहे. या कंपनीने शेतकऱ्यांकडून घेतलेली रॉयल्टी व नुकसानभरपाई वसूल केल्याशिवाय संघटना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com