रत्नागिरी जिल्ह्यात काजू उत्पादकांना यंदा ५०० कोटींचा फटका

पूर्वमोसमीच्या हजेरीने तापमानात चढ-उतार
पूर्वमोसमीच्या हजेरीने तापमानात चढ-उतार

रत्नागिरी ः बदलत्या वातावरणाचा फटका या वर्षी कोकणातील काजू उत्पादकांना बसला आहे. या वर्षी केवळ ३० टक्केच उत्पादन हाती मिळाले. त्यामुळे उत्पादकांना सुमारे ५०० कोटींचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही परिस्थिती सलग दुसऱ्या वर्षीही निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मागील तीस वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात काजू व आंबा लागवड झाली. मात्र बदलत्या वातावरणाचा पिकावर परिणाम होत आहे. यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर या मोहर येण्याच्या पहिल्या टप्प्यात अवकाळी पावसामुळे परिणाम झाला. त्यानंतर जानेवारीमध्ये या पिकाला थंडी आवश्यक असताना प्रत्यक्षात तापमानात वाढ झाली. फेब्रुवारी-मार्चमध्ये ढगाळ वातावरण तसेच थंड वातावरण यामुळे काजू पिकावर बुरशीजन्य रोगाचाही प्रादूर्भाव झाला. या वर्षी काजूला लांब मोहर आला. याचाच अर्थ या वर्षी नर मोहराचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे फळधारणा कमी झाली. नुकत्याच झालेल्या ‘फणी’ वादळाचाही परिणाम या पिकावर झाला आहे.  उत्पादन कमी होऊनही दर ११६ रुपयांभोवती गतवर्षी काजू बीला १५० ते १७० रुपये एवढा दर होता. मात्र या वर्षी उत्पन्न कमी असूनही यंदा काजू बीचा दर ११६ रुपयांभोवतीच फिरत राहिला. उत्पन्न कमी व दरही कमी त्यामुळे काजू उत्पादकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात काजू प्रक्रिया उद्योगही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लहान-मोठे २०० ते ३०० प्रक्रिया उद्योग सुरू आहेत. गतवर्षी काजू बी ७० टक्के उत्पादित झाली होती. जिल्ह्यात गतवर्षी ८० टक्के काजू बी स्थानिक पातळीवर, तर २० टक्के काजू बी परदेशातून मागवण्यात आली होती. मात्र त्यातून फारसा फायदा न झाल्याने काजू प्रक्रिया उद्योगाचेही कंबरडे मोडले. सलग दुसऱ्या वर्षी काजू उत्पादन कमी झाल्याने त्याचा फटका उत्पादकांना बसला आहे. आर्थिक मदत द्या जिल्ह्यात काजू लागवडीखालील क्षेत्र १ लाख २७ हजार हेक्टर आहे. कोकणात मजुरांचा प्रश्‍न असल्याने आंब्याऐवजी काजूला पसंती मिळत आहे. मात्र नैसर्गिक वातावरणाचा एवढा गंभीर परिणाम या पिकावरही होऊ शकतो हे गेली दोन वर्षे काजू उत्पादक अनुभवत आहेत. दुष्काळ जाहीर करून शासनाने उत्पादकांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया रत्नागिरीतील काजू उत्पादक विवेक बारगिर यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com