जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कमी होणे ही सुपिकतेबाबत धोक्‍याची घंटा : कॅथल डेन्स

डाळिंब अधिवेशनात मार्गदर्शन करताना डॉ. कॅथल डेन्स.
डाळिंब अधिवेशनात मार्गदर्शन करताना डॉ. कॅथल डेन्स.

डाळींब संध अधिवेशन पुणे ः कोणत्याही पिकासाठी जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे असते. पण अलीकडे रासायनिक खतांचा वाढलेला वापर आणि जमिनीतील उपजतच असणारी सेंद्रिय पदार्थांची कमतरता ही जमिनीच्या सुपिकतेबाबत धोक्‍याची घंटाच म्हणावी लागेल. भारतच नव्हे, तर अन्य देशांतही हीच समस्या आहे. त्यामुळे वेळीच सावध होणे आणि जमिनीची काळजी घेण्याची गरज आहे, असे मत ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञ डॉ. कॅथल डेन्स यांनी शनिवारी (ता. ६) येथे व्यक्त केले.  अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघाच्या वतीने आयोजित डाळिंब अधिवेशनात डॉ. डेन्स बोलत होते. ‘गुणवत्तापूर्ण डाळिंबासाठी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन’ हा त्यांच्या चर्चासत्राचा विषय होता. डाळिंबाच्या आणि एकूणच शेतीसाठी आवश्‍यक असलेल्या जमिनीच्या सुपिकतेच्या अानुषंगाने विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. चंद्रशेखर बोंडे यांनी त्यांची माहिती भाषांतरीत केली.  डॉ. डेन्स म्हणाले, की जमिनीचे आरोग्य हे जमिनीची रचना व दर्जावर अवलंबून असते. कोणत्याही शेतीसाठी माती हा महत्त्वाचा घटक असतो. पण या मातीची रचना कशी आहे, हे समजून घेतले पाहिजे. जमिनीच्या एकूण घटकांपैकी ५३ टक्के घटकांत २५ टक्के हवा, २५ टक्के माती आणि तीन टक्के सेंद्रिय पदार्थांचा समावेश होतो. तर उर्वरित ४७ टक्‍क्‍यांमध्ये वाळू, रेताड माती आणि माती आढळते, पण यामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण तीन टक्‍क्‍यांवरून एक टक्‍क्‍यापेक्षाही कमी झाले आहे, हे चिंता वाढवणारे आहे.  जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ परत टाकण्याचे कमी झालेले प्रमाण, हवा व मशागतीमुळे कुजण्याच्या प्रक्रियेचा कमी झालेला वेग आणि मोठ्या प्रमाणात नत्रयुक्त खतांचा वाढलेला वापर, यामुळेही मोठा परिणाम जमिनीच्या आरोग्यावर झाला आहे. त्यामुळे जमिनीचा पोत, जमिनीतील उपलब्ध घटक याचा विचार करूनच आपण पिकांसाठी खतांचा वापर करण्याची गरज आहे, यामध्ये सुधारणा करावयाची असेल तर दरवर्षी दहा टक्के ताजे अवशेष, अडीचे टक्के वाळलेले पदार्थ टाकलेच पाहिजे. हिरवळीचे व सुके अवशेष मिसळून दिले पाहिजे. कुजलेल्या शेणखताचा वापर वाढवला पाहिजे. ‘‘ह्युमिक ॲसिडचा वापर अलीकडे वाढला आहे. पण त्यातही फसवाफसवी आहे. ह्युमिक ॲसिड हे जमिनीची रचना टिकवून ठेवते, पण त्याच्या गुणवत्तेचा विचार करूनच त्याचा वापर वाढवावा,’’ असे मतही डॉ. डेन्स यांनी नोंदवले. यावेळी त्यांनी भारतासह जगभरातील जमिनीच्या आरोग्याच्या स्थितीबाबतही उपस्थितांना माहिती दिली. तसेच छोट्या-छोट्या उपाययोजना सांगितल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com