‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून सुरू होणार

आम्ही `सीसीआय’च्या अध्यक्ष डॉ. पी. अली राणी यांची मुंबईत भेट घेऊन तेथे दरांबाबत सविस्तर चर्चा केली. ‘सीसीआय’ने आम्हाला दोन हंगामांत तेलंगणाला जेवढे दर एका गाठीसाठी दिले तेवढे देऊ, असे आश्‍वासन दिले. शेतकरी हित लक्षात घेऊन आम्ही प्रस्ताव स्वीकारला. २० तारखेपासून ‘सीसीआय’ जिनिंगमध्ये कापूस खरेदीला सुरवात करील. - अनिल सोमाणी, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून सुरू होणार
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून सुरू होणार

जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र सुरू करण्याबाबत दरांवरून जिनिंग व्यावसायिक व भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) यांच्यातील तिढा अखेर मिटला असून, राज्यातील जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनने ९८५ रुपये प्रतिगाठ (एक गाठ १७० किलो रुई) या दरास सहमती दाखविली आहे. येत्या मंगळवारी (ता. २०) ‘सीसीआय’ राज्यात विविध ठिकाणी कापूस खरेदी सुरु करणार आहे.  कापूस खरेदीसंबंधी सीसीआयने सुरवातीला खुल्या बाजारात खरेदीचे धोरण राबवू, असे म्हटले होते. परंतु आता हमीभावानुसार (एमएसपी) म्हणजेच मध्यम धाग्याच्या कापसाला ५१५० रुपये प्रतिक्विंटल व लांब धाग्याच्या कापसाला ५४५० रुपये प्रतिक्विंटल दर दिला जाईल. खरेदीसंबंधी कुठलेही उद्दिष्ट ठेवलेले नाही.  राज्यात पाच वेळेस निविदा काढूनही खरेदी केंद्रासंबंधीचे करार ‘सीसीआय’ करू शकले नव्हते. दरांचा तिढा कायम होता. औरंगाबाद व अकोला येथे मागील महिन्यात एक बैठक निष्फळ ठरली. जिनर्सनी तेलंगणात ११३४ रुपये प्रतिगाठ, असे दर दिले, तेच दर राज्यातही द्या, अशी मागणी केली होती. दरांच्या मुद्यावर नुकतीच मुंबई येथे ‘सीसीआय’च्या अध्यक्ष डॉ. पी. अली राणी व महाराष्ट्र राज्य जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्रसिंग राजपाल, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य अनिल सोमाणी, खानदेश जिनिंग प्रेसिंग असोसिएशनचे जीवन बयस यांच्यात दीड तास चर्चा झाली.  या चर्चेत ‘सीसीआय’च्या अध्यक्ष डॉ. राणी यांनी शेतकऱ्यांसाठी जिनर्सनी काम करायला हवे. ‘सीसीआय’ या व पुढच्या हंगामात दर वाढवून ते तेलंगणासाठी जेवढे दर (प्रतिगाठ ११३४ रुपये) दिले आहेत, तेवढे देईल, असे स्पष्ट केले. यावर असोसिएशनने सहमती दर्शविली असून, खरेदीसंबंधीची करार प्रक्रिया सुरू आहे. ती अंतिम टप्प्यात असून, येत्या २० तारखेपासून राज्यात खरेदी सुरू होईल. एकूण ६२ खरेदी केंद्र विदर्भ, मराठवाडा व खानदेशात (नगर, नाशिक मिळून) सुरू करण्याचे नियोजन ‘सीसीआय’ने केले आहे. खानदेशात जळगाव जिल्ह्यात एरंडोल, वराड (ता. एरंडोल), जळगाव, आव्हाणे (ता. जळगाव), जामनेर, शेंदूर्णी (ता. जामनेर), बोदवड, पाचोरा, भुसावळ, नंदुरबार जिल्ह्यांत नवापूर, शहादा व नंदुरबार येथे खरेदी सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

‘ॲग्रोवन’ने व्यक्त केली होती शक्‍यता ‘सीसीआय’ राज्यात २० नोव्हेंबरपासून कापूस खरेदी करू शकते, अशी शक्‍यता ‘ॲग्रोवन’ने मागील मंगळवारी (ता. १३) प्रसिद्ध केलेल्या वृत्तात वर्तविली होती. जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९०० रुपये प्रतिगाठीने तयार, हे वृत्त प्रसिद्ध केले होते. ‘ॲग्रोवन’चा अंदाज खरा ठरला आहे.  अटी व शर्तीही मंजूर असोसिएशनने ‘सीसीआय’च्या अटी व शर्तीही मान्य केल्या आहेत. त्यात अडीच टक्के ट्रॅश व आठ टक्के आर्द्रतेचा कापूस खरेदी केला जाईल. तर घट क्विंटलमागे तीन टक्के गृहीत धरली जाईल. एका गाठीसाठी ९०० रुपये दर असेल. तर उर्वरित ८५ रुपये रुईची प्रेसिंग केल्यानंतर गाठ बांधण्यासाठी लागणाऱ्या कापडापोटी दिले जातील. एका गाठीसाठी ८५ रुपये असतील. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com