‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्त

कापूस
कापूस

मुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये बाजारात महिनाभरापूर्वीच मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. त्यामुळे भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) सुरवातीलाच देशात कापूस खरेदी १ आॅक्टोबरपासून सुरू करणार असल्याचे घोषित केले होते. परंतु, सध्या देशातील अनेक बाजारपेठांमध्ये कापसाचे दर प्रतिक्विंटल हमीभावापेक्षा अधिक असल्याने ‘सीसीआय’ची खरेदी दिवाळीपर्यंत जोमात सुरू होण्याची शक्यता कमीच आहे, अशी महिती बाजारातील सूत्रांनी दिली.  केंद्राने २०१८-१९च्या हंगामासाठी मध्यम लांबी धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ५ हजार १५० रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. दिवाळी ७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये आॅक्टोबरच्या सुरवातीला कच्च्या कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी होते. मात्र, सध्या याच कापसाचे दर प्रतिक्विंटल ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. उत्तरेकडील बाजारात कापसाला मिळणारे दर हे हमीभावापेक्षा अधिक आहेत. याचा परिणाम हजर आणि वायदा बाजारावरही झाला आहे. वायदा बाजारात कापसाचे व्यवहार आॅक्टोबरच्या सुरवातीला २१ हजार ८०० रुपये प्रतिगाठ (एक गाठ=१७० किलो कापूस) प्रमाणे झाले होते. सध्या हेच व्यवहार प्रतिगाठ २३ हजार रुपयांनी होत आहेत.  सध्या पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांतील बाजारांमध्ये कापूस आवक वाढली आहे. मंगळवारी (ता. १६) महत्त्वाच्या स्पॉट मार्केटमध्ये ६८ हजार ५०० गाठी कापसाची आवक झाली होती. यापैकी ११ हजार गाठी हरियाना, १५ हजार गाठी राजस्थान आणि पंजाबमधील सात हजार गाठींचा समावेश होता. महाराष्ट्रात चार लाख गाठी आणि तेलंगणात पाच लाख गाठी कापसाची बाजारात आवक झाली होती. महाराष्ट्र आणि तेलंगणानंतर गुजरात हे महत्त्वाचे कापूस उत्पादक राज्य आहे. 

अंदाजामुळेही दरात सुधारणा भारताच्या कापूस उत्पादनाविषयी विर्तविण्यात आलेल्या वेगवेगळ्या अंदाजामध्ये यंदा कापूस उत्पादन ३५० लाख गाठींच्या कमीच राहील, असे सांगण्यात आले. तसेच अमेरिकेच्या कृषी विभागाने भारताच्या शिलकी साठ्यातही घट झाल्याचे सांगितले आहे, त्यामुळे बाजारात कापसाला उठाव मिळत असून, दरात सुधारणा झाली आहे. 

दुष्काळाचा फटका मॉन्सूनच्या काळात देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक पट्ट्यात पावसाने दडी दिली आहे. यंदा आॅगस्ट ते सप्टेंबर या काळात गुजरात, महाराष्ट्र आणि राज्यस्थानच्या काही भागांत पावसाने मोठी उघडीप दिली. त्यामुळे या भागातील कापूस पिकाला याचा फटका बसला. येथील कापूस उत्पादन घटेल, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. परंतु, नोव्हेंबरमध्ये हंगाम जोमात आल्यानंतरच याचे चित्र स्पष्ट होईल. जिनर्सच्या खरेदीने दर वधारले सध्या जिनर्सना साठ संपल्याने कापूस टंचाई भासत आहे आणि कापूस उत्पादक महत्त्वाच्या काही राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याने महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांत नवीन कापसाचा कमी उत्पादनाचा अंदाज गृहित धरून जिनर्सनी बाजारात कापूस खरेदी सुरू केली आहे, असे ‘सीसीआय’ने म्हटले आहे. सध्या हरियाना, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये कापूस आवक वाढत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com