केंद्रीय कापूस संशोधन संस्थेची ‘अंकुर सीड्स’ला क्‍लीन चिट

सुरवातीला प्रोटीन चाचणी करण्यात आली. त्या वेळी बियाण्याचे केवळ दहा नमुनेच घेण्यात आले. त्यात एच.टी. जनुकाचा ३० टक्‍के तथ्यांश आढळला होता. परंतु चाचणीची ही पद्धत चुकीची असल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या वेळी १०० बियाणे नमुने घेऊन डीएनए चाचणी केली असता त्यात एच.टी. जनुक आढळून आले नाही. त्यामुळे या वाणात एच.टी. जनुक नसल्याचा दुसरा अहवाल देण्यात आला आहे. या संदर्भाने कृषी विभागालादेखील कळविण्यात आले आहे. या प्रकरणी सुरवातीच्या अहवालावरुन पोलिस तक्रार झाल्याचीदेखील मला माहिती आहे. - डॉ. बालसुब्रमण्यम, प्रयोगशाळा प्रमुख, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः मे. अंकुर सीड्स प्रा. लिमिटेडच्या ३०२८ या वाणात निघालेल्या एच.टी. जनुक प्रकरणाने अल्पावधीतच नाट्यमय वळण घेतले आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या अहवालावरूनच या प्रकरणात सुरवातीला पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यांनतर आता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या दुसऱ्या अहवालात एच.टी. संदर्भाने क्‍लीन चिट देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे कृषी विभागाच्या अडचणींमध्ये मात्र वाढ झाली आहे.

या वर्षी कृषी विभागाने हंगामाच्या सुरवातीला राज्य स्तरावर सर्वच कृषी निविष्ठांचे कंपन्यांच्या गोदामातच नमुने घेतले होते. मे. अंकुर सीड्स प्रा. लिमिटेड कंपनीचे बियाणे प्रक्रिया केंद्र मलकापूर (जि. बुलडाणा) येथे आहे. कंपनीच्या मलकापूर येथील गोदामातून कृषी विभागाने १५ मे २०१८ रोजी नमुने घेतले. हे नमुने २५ मे २०१८ रोजी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे पृथक्करणासाठी पाठविण्यात आले. १९ जुलैला याचा अहवाल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून कृषी विभागाला मिळाला. त्यामध्ये ३०२८ या वाणात ३० टक्‍के एच.टी. जनुकाचा अंश असल्याचा धक्‍कादायक खुलासा करण्यात आला होता.

याची कृषी विभागाने गांभीर्याने दखल घेत तातडीने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तसेच उपप्रादेशिक व्यवस्थापक चिरंजीव रेड्डी यांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. मलकापूर (जि. बुलडाणा) पोलिस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. पोलिसांचा तपास सुरू असतानाच कृषी विभागानेदेखील मे. अंकुर सीड्स प्रा. लिमिटेडला नोटीस बजावली. परवान्यातील तरतुदीचे उल्लंघन केल्यामुळे खुलासा करण्याचे यातून सांगण्यात आले.

ही सारी प्रक्रिया सुरू असतानाच अचानक  शनिवारी (ता. ४) रात्री केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने नवा अहवाल कृषी विभागाला ई-मेलद्वारे पाठविला. त्यामध्ये अंकुर सीड्स प्रा. लिमिटेड या कंपनीच्या ३०२८ या वाणात एच.टी. जनुकाचा अंश नसल्याचे नमूद आहे. या अहवालामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com