सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवाच्या तयारीची लगबग; २५ पासून प्रारंभ

चैत्रोत्सवाच्या तयारीची गडावर लगबग; २५ पासून प्रारंभ
चैत्रोत्सवाच्या तयारीची गडावर लगबग; २५ पासून प्रारंभ

वणी,  जि. नाशिक : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवास दुर्गाष्टमी व रामनवमीच्या मुहूर्तावर येत्या 25 मार्चपासून प्रारंभ होत आहे. पंधरा दिवसांवर आलेल्या यात्रोत्सवाच्या तयारीसाठी सप्तशृंगी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था, मंडळे तसेच प्रशासनाची सध्या तयारी सुरू आहे.  आदिमाया सप्तशृंगीचा वर्षभरातील वेगवेगळ्या उत्सवांपैकी एक प्रमुख उत्सव असलेल्या चैत्रोत्सव रविवार 25 मार्चपासून 2 एप्रिलपर्यंत होणार आहे. उत्सवकाळात रोज सकाळी सातला भगवतीची पंचामृत महापूजा होणार आहे. 25 मार्चला सकाळी नऊला भगवतीच्या नवचंडी यागास प्रारंभ होऊन चैत्रोत्सवास प्रारंभ होईल. त्याच दिवशी रामनवमी असल्याने मंदिरात जाताना रामटप्प्यावरील श्रीराम मंदिरात दुपारी बाराला श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार आहे. दुपारी तीनला भगवतीच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येईल. उत्सवातील 30 मार्च हा महत्त्वाचा दिवस असून, या दिवशी खानदेशवासीयांसह कसमादे पट्ट्यातील लाखो पदयात्रेकरू मजल दरमजल करीत गडावर दाखल होणार आहे. याच दिवशी दुपारी तीनला ध्वजाचे विधिवत पूजन न्यासातर्फे करण्यात येऊन ध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळीपाटील यांच्याकडे ध्वज सुपूर्द केल्यानंतर कीर्तिध्वजाची सवाद्य मिरवणूक निघेल व रात्री बाराला मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकणार आहे. 

चैत्रोत्सवाची सांगता 2 एप्रिलला सकाळी सातला भगवतीच्या प्रक्षालय पंचामृत महापूजा व दुपारी 11 ते 3 या वेळेत महाप्रसाद वाटपाने होणार आहे. यात्रोत्सवाच्या दृष्टीने गडावरील प्रसाद, नारळ, पूजेचे साहित्य, हॉटेल व इतर व्यावसायिकांची यात्रोत्सवाच्या काळात पुरेसा माल आपल्या दुकानात भरून ठेवण्याच्या दृष्टीने लगबग सुरू आहे. सप्तशृंगी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायतही यात्रोत्सव काळात भाविकांना सोयी- सुविधा पुरविण्याकामी नियोजन करीत असून, प्लॅस्टिकबंदी व स्वच्छतेच्या दृष्टीने प्राधान्य देत आहे. भवानी तलावाचे काम सुरू असल्याने व पाणीसाठाही संपुष्टात आल्यामुळे गडावर ऐन यात्रोत्सवात पाणीटंचाई निर्माण झाल्याने ट्रस्ट, ग्रामपंचायत व प्रशासनास पाण्याच्या टॅंकरद्वारेच भाविकांची तहान भागवावी लागणार आहे. 

यात्रोत्सवात पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा नियोजन करत आहे. यात्रा कालावधीत नांदुरी ते सप्तशृंगगड रस्ता खासगी वाहनांसाठी बंद करण्यात येत असल्याने या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाच्या बस नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव विभागातून सोडण्यासाठी त्या- त्या विभागातील महामंडळ प्रशासनाही नियोजन करीत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com