वाण बदलातून ‘मोत्याच्या दाण्या’ला आणखी लकाकी

वाण बदलातून ‘मोत्याच्या दाण्या’ला आणखी लकाकी
वाण बदलातून ‘मोत्याच्या दाण्या’ला आणखी लकाकी

जळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामात दादरचे उत्पादन घेण्याच्या पारंपरिक पद्धतीला छेद देत वडगाव असेरी (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील सम्राट रामजी शिंदे या युवा शेतकऱ्याने परभणी कृषी विद्यापीठाच्या ज्वारी वाणाचे सलग दुसऱ्या वर्षी यशस्वी उत्पादन घेणार आहेत. असा प्रयोग करणारे शिंदे हे पाचोरा, चाळीसगाव भागांतील पहिलेच शेतकरी असून, दाट पेरणी करूनही ज्वारीचे पीक जोमात आहे.   शिंदे यांचे शिक्षण मॅकेनिकल अभियांत्रिकीमधील पदविकेपर्यंत झाले आहे. यंदाच्या खरिपात अधिक पाण्यात येणारी पिके न घेता शिंदे यांनी कमी पाण्यात येणाऱ्या ज्वारीला पसंती दिली. त्यासाठी पारंपरिक मालदांडी (दादर)च्या वाणापेक्षा अधिक उत्पादनक्षमता असलेल्या परभणी ज्योती या वाणाला पसंती दिली. मागील वर्षीही शिंदे यांनी परभणी कृषी विद्यापीठाच्या ज्वारी वाणाची पेरणी करून चांगले उत्पादन व भरपूर चाराही मिळविला होता.  यंदाही दोन एकर ज्वारीची पेरणी केली. त्यासाठी १२ किलो बियाणे वापरले. बियाण्यावर प्रक्रिया करून घेतली होती. पेरणीनंतर लागलीच सिंचन केले. जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया बियाण्यावर पेरणीपूर्वी केलेली होती, त्यामुळे लागलीच रासायनिक खते दिली नाहीत. नंतर महिनाभरात दोन गोण्या १८-१८-१० ची मात्रा दिली. पिकात तूट नव्हती. वाढ जोमात झाली. ३० दिवसांमध्ये तणनियंत्रण करून घेतले. महिनाभरानंतर एकरी ५० किलो युरिया, १० किलो निंबोळी पावडर यांचे मिश्रण करून ते पिकाला दिले. दाणे भरण्याच्या अवस्थेत सिंचन केले. आजघडीला पिकात दाणे चांगले भरत आहेत. 

दाट पेरणी, तरीही निसवण जोमात पेरणी अतिशय दाट आहे. दोन एकरांत १२ किलो बियाणे वापरले, तरीही निसवण एकसारखी आहे. कणसांचा आकार मोठा आहे. पारंपरिक मालदांडी किंवा दादरची पेरणी विरळ असली तरच पीक जोमात येते, असा मुद्दा परभणी ज्योती वाणासंबंधी आलाच नाही, असे शिंदे म्हणाले.  परभणी ज्योती वाणाचे उत्पादन तर चांगले मिळालेच आहे, पण तिची भाकरी खायला चवदार, गोड आहे. बाजारात तिला मागणी आहे. मी हे वाण घेण्यासाठी परभणी येथे गेले होतो. तेथून ते आणले. परिसरातील शेतकरीही या वाणाबाबत माझ्याकडे विचारणा करीत आहेत. - सम्राट शिंदे, शेतकरी, वडगाव (जि. जळगाव) दादरपेक्षा जादा उत्पादन जिल्ह्यात तापीकाठालागत पारंपरिक पद्धतीने दादरची पेरणी केली जाते. दादरचे उत्पादन एकरी आठ ते १० क्विंटलपर्यंत येते. पण शिंदे यांना मागील वर्षी परभणी ज्योती वाणाचे उत्पादन एकरी १४ क्विंटल आले होते. यंदाही एकरी किमान १४ ते १५ क्विंटल उत्पादनाचा अंदाज आहे. तसेच भरपूर चाराही मिळेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com