रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा

रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा
रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा

रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास आज ३४४ वर्षे होत आहेत. यानिमित्त राजधानी रायगडावर आज (ता. ६) अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे भव्य प्रमाणात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. राज्यासह देशभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. समितीचे मार्गदर्शक छत्रपती संभाजीराजे व युवराज शहाजीराजे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ ला दुर्गराज रायगडावर राज्याभिषेक झाला. त्या सुवर्ण दिनाची स्मृती कायम राहावी, या उद्देशाने अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहाने साजरा होत आहे. सकाळी साडेनऊ वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे राजसरदरेवर आगमन होईल. शिवरायांच्या उत्सवमूर्तीचे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते विधिवत पूजन, अभिषेक व त्यानंतर मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्णाभिषेक केला जाणार आहे.  दरम्यान, मंगळवारी (ता. ५) सकाळपासूनच ‘प्लॅस्टिकमुक्त रायगड’ करण्यासाठी हजारो हात सरसावले. चित्तदरवाजा ते भवानी टोक अशा सदतीस ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. रायगड विकास प्राधिकरणतर्फे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त ही मोहीम झाली.  सकाळी सात वाजता मोहिमेस प्रारंभ झाला  मेणा दरवाजा, हिरकणी बुरूज, टकमक टोक, होळीचा माळ, बाजारपेठ, महादरवाजा, कृषावर्त तलाव, शिवसमाधी, भवानी टोक, जगदीश्वर मंदिर, दारुखाना, हत्तीखाना, राजदरबार, बारा टाके आदी परिसरात स्वच्छता करण्यात आली. राज्यातील शिवभक्तांसह शिवाजी विद्यापीठ, मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे व सोलापूर विद्यापीठांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा मोहिमेत सहभाग होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com