‘उजनी’च्या पाण्याला मुख्यमंत्र्यांकडून बगल

सध्या मराठवाड्यावर पाणीटंचाईचे सावट आहे. पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत टंचाईची सर्व माहिती हाती येईल. त्यानंतर केंद्र शासनाचे पथक बोलावले जाईल. ते पाहणी करेल. त्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यात येईल. टंचाईवर मात करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.
अटल महाआरोग्य शिबीराचे उदघाटन
अटल महाआरोग्य शिबीराचे उदघाटन

लातूर  ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूरला ‘उजनी’चे तर बीडला कृष्णा खोऱ्याचे पाणी देण्याबाबत भाष्य करतील, अशी अपेक्षा असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात या विषयाला बगल दिली. निसर्ग आपली परीक्षा घेत असून, त्याला आव्हान देण्याचे काम आम्ही करत आहोत. संकटाच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा आशावाद मात्र मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

या वर्षी लातूरवर पाणीटंचाईचे सावट आहे. २०१६ मध्ये लातूरला भीषण टंचाईला सामोरे जावे लागले होते. रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस हे लातूर दौऱ्यावर आले होते. लातूरसाठी ‘उजनी’तून पाणी देऊ, अशी घोषणा त्यांनी केली होती. त्याचा सर्व्हे करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. पण पुढे मात्र ही योजना बारगळली. दोन वर्षे सलग चांगला पाऊस झाल्याने या योजनेचा विसर सर्वांनाचा पडला. यावर्षी पुन्हा लातूरवर टंचाईचे संकट घोंगावत आहेत. परतीच्या पावसाची आशा धुसर झाली आहे. शहराला आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे.

दरम्यान, रविवारी (ता. ७) अटल महाआरोग्य शिबिराचे उद्‍घाटन श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी आपल्या भाषणात लातूरला ‘उजनी’चे पाणी द्यावे, अशी मागणी केली. तोच धागा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात पकडला. बीडवरही पाणीटंचाईचे संकट आहे. त्यामुळे बीडला कृष्णा खोऱ्यातून तर लातूरला ‘उजनी’चे पाणी द्यावे, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही भाष्य केले. उजनी धरण हे माझ्याकडेच आहे. लातूरचा पाणी, आरोग्य व रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण श्री. फडणवीस यांनी मात्र आपल्या भाषणात उजनीच्या पाण्याला बगल दिली. यावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. ‘जलयुक्त’च्या कामांवर त्यांनी भर दिला. निसर्ग कोपला आहे. टंचाईचे सावट आहे. निसर्गाला आव्हान देण्याचे काम करीत आहोत. निसर्ग परीक्षा घेत आहे. या काळात सरकार तुमच्या पाठशी आहे, असा आशावाद मात्र त्यांनी दिला. ‘उजनी’च्या पाण्याला बगल दिल्याने लातूरकरांमध्ये मात्र नाराजी आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com