जतला पाणी देण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री सकारात्मक

जतला पाणी देण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री सकारात्मक
जतला पाणी देण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री सकारात्मक

जत, जि. सांगली ः तुबची बबलेश्वर (कर्नाटक) योजनेतून तालुक्‍याच्या पूर्व भागातील गावांना पाणी देण्याबाबत सकारात्मक विचार करू व लवकरच दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊ, अशी ग्वाही कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी व पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी जतच्या शिष्टमंडळाला दिली आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. 

कर्नाटकला चार टीएमसी पाणी द्यावे त्याबदल्यात आम्ही जतला दोन टीएमसी पाणी देऊ व उर्वरित दोन टीएमसी पाणी कर्नाटकात नव्याने निर्माण झालेल्या सीमेवरील चडचण तालुक्‍याला देणे शक्‍य आहे. तसा पत्रव्यवहार व बैठका महाराष्ट्र शासनाबरोबर करू, अशी ग्वाही श्री कुमारस्वामी यांनी दिली असल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली. 

पूर्व भागातील ५४ गावांना कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी द्यावे. शिक्षण व आरोग्य सभापती तम्माणगौडा रवि पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बेळगावी येथे सुरू असलेल्या कर्नाटक विधानसभा अधिवेशनादरम्यान कर्नाटक मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी व पाटबंधारे डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली. जमखंडीचे आमदार आनंद न्यामगोंड यांनी ही भेट घडवून आणली. 

शिष्टमंडळात सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, भाजपचे जत तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, बहुजन वंचित आघाडीचे नेते अशोक बन्नेनवर, संजय तेली, जत बाजार समितीचे सभापती दयगोंडा बिराजदार, सोमनिंग बोरामणी, धनगर समाज तालुका अध्यक्ष कामाण्णा बंडगर यांचा सहभाग होता. 

सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तम्माणगौडा रवि पाटील यांनी भेटी दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री व पाटबंधारेमंत्री यांना दुष्काळी जत तालुक्‍यातील सध्याची परिस्थिती सांगितली. जतला कर्नाटकातून पाणी द्यावे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

लवकरच बैठका- तम्मणगौडा रवि पाटील  म्हैसाळ योजनेपासून वंचित राहिलेली जत पूर्व भागातील ५४ गावांसाठी तुरची बबलेश्वर योजनेतून पाणी देण्याची विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री, पाटबंधारे मंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दोघांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच दोन्ही राज्याची बैठक होईल. यासाठी प्रयत्न करून जतला पाणी देऊ, असे सांगितले आहे. भेटीसाठी कर्नाटकचे आमदार आनंद न्यामगौडर यांनी सहकार्य केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com