..या १८० तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती जाहिर

दुष्काळसदृश स्थिती
दुष्काळसदृश स्थिती

मुंबई ः पावसाने मोठी ओढ दिल्याने निर्माण झालेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १८० तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यासोबतच दुष्काळसदृश स्थिती असलेल्या तालुक्यांत दिलासादायी आठ उपाययोजना तातडीने लागू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.  राज्यात यंदा १८० तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यापैकी ११० हून अधिक तालुके गंभीर दुष्काळी, तर उर्वरित तालुक्यांत मध्यम दुष्काळी स्थिती आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाच्या दुष्काळाची तीव्रता मोठी आहे. विशेषतः मराठवाड्यात सर्वांत जास्त भीषणता जाणवत आहे. राज्यातील टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये केंद्र सरकारच्या नव्या संहितेनुसार दुष्काळाची दुसरी कळ लागू झाली आहे.  दुष्काळी स्थिती जाहीर करताना वनस्पतीशी निगडित निर्देशांक, लागवडीखालील क्षेत्र, मृद आर्द्रता निर्देशांक आणि जलविषयक निर्देशांक या प्रमुख चार बाबी विचारात घ्याव्यात, असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. या चार प्रभावदर्शक निर्देशाकांपैकी वाईट स्थिती दर्शवणारे ३ निर्देशांक विचारात घेतले जातात. या चारपैकी पावसाचा खंड हा निर्देशांक सर्वांत वाईट स्थिती दर्शवणारा आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील २०१ तालुक्यांत दुष्काळाची पहिली कळ लागू करण्यात आली होती. यापैकी १८० तालुके हे तीव्र, अति तीव्र पाणीटंचाईचे असून, या तालुक्यात सरासरीच्या ७५ टक्के पेक्षाही कमी पाऊस झालेला आहे. विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांत दुष्काळाची भयावहता अधिक आहे.  केंद्र सरकारच्या निर्देशानुसार या जिल्ह्यात दुष्काळी स्थितीच्या मोजमापाची प्रक्रिया केल्यानंतर दुष्काळाची पहिली कळ लागू झालेल्या २०१ तालुक्यांपैकी १८० तालुक्यांत मध्यम आणि गंभीर दुष्काळ सूचित करणारी दुसरी कळ लागू करण्यात आली आहे. पीक नुकसानीचे प्रमाण ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या तालुक्यात मध्यम दुष्काळी आणि ५० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर केला जातो. त्यानुसार सुमारे ११० हून अधिक तालुके गंभीर दुष्काळी असल्याचे निदर्शनाला आले आहे. तर उर्वरित सुमारे ७० तालुक्यांत मध्यम दुष्काळी स्थिती आहे.  खरिपासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर करणे आवश्यक होते. त्यानुसार राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १८० तालुक्यांत दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच या तालुक्यात दिलासादायी आठ उपाययोजना लागू केल्या आहेत. या संदर्भातील शासकीय आदेश तातडीने प्रसिद्ध केला जाणार आहे. मध्यम किंवा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळातच केंद्र सरकारकडून ‘एनडीआरआफ’मधून मदत मिळणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात राज्य शासनाकडून केंद्र सरकारला या तालुक्यांसाठी दुष्काळी मदतीचे निवेदन पाठवले जाणार आहे. त्यामध्ये शेतीपिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, तात्पुरत्या पिण्याच्या पाण्याच्या योजना, जनावरांना चारा आदी बाबींच्या मदतीचा समावेश असणार असल्याचे सांगण्यात आले.  या उपाययोजना लागू होणार...

  • जमीन महसुलात सूट 
  • सहकारी कर्जाचे पुनर्गठन 
  • शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती 
  • कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट 
  • शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी 
  • रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता 
  • आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर 
  • शेतीपंपाची वीजजोडणी खंडित न करणे.
  • भीषण दुष्काळाच्या छायेतील जिल्हे  औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक आहे.  जिल्हानिहाय गंभीर दुष्काळी तालुके नगर ः कर्जत, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा अकोला ः अकोला अमरावती ः अचलपूर, चिखलदरा, मोर्शी, वरुड औरंगाबाद ः औंरगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर बीड ः आष्टी, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, शिरूर (कासार), वडवणी बुलडाणा ः खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव धुळे ः धुळे, शिरपूर, सिंदखेडे हिंगोली ः हिंगोली, कळमनुरी, सेनगाव जळगाव ः अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर (एदलाबाद), पाचोरा, पारोळा, रावेर, यावल जालना ः अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी नागपूर ः कळमेश्वर नांदेड ः मुखेड, उमरी नंदुरबार ः नंदुरबार, नवापूर, शहादा नाशिक ः बागलान, देवळा, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, नाशिक, सिन्नर पालघर ः पालघर, तलासरी, विक्रमगड परभणी ः मनवथ, पाथरी, सोनपेठ पुणे ः आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर, वेल्हे रायगड ः माणगाव, सुधागड रत्नागिरी ः मंडणगड सांगली ः आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ, पलूस सातारा ः खंडाळा, माण-दहीवडी, फलटण सोलापूर ः करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले यवतमाळ ः बाभूळगाव, दारव्हा, कळंब, केलापूर, महागाव, मारेगाव, राळेगाव, उमरखेड, यवतमाळ मध्यम दुष्काळी तालुके नगर ः जामखेड अकोला ः बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा अमरावती ः अंजनगाव सूर्जी औरंगाबाद ः कन्नड बीड ः आंबेजोगाई, केज, परळी, पाटोदा भंडारा ः लाखणी, मोहाडी, पवणी बुलडाणा ः मलकापूर, मोताळा, सिंदखेडराजा चंद्रपूर ः भद्रावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिंपरी, नागभिर, पोंभुर्णा, राजुरा, सिंदेवाही, वरोरा गोंदिया ः देवरी, मोरगाव, अर्जुनी, सालेकसा जालना ः जाफ्राबाद, जालना, परतूर कोल्हापूर ः गगनबावडा, हातकणंगले, कागल, राधानगरी लातूर ः शिरूर अनंतपाळ नागपूर ः काटोल, नरखेड नांदेड ः देगलूर नंदुरबार ः तळोदे नाशिक ः चांदवड उस्मानाबाद ः लोहारा, भूम परभणी ः पालम, परभणी, सेलू रायगड ः श्रीवर्धन सांगली ः जत, खानापूर, विटा सातारा ः कराड, कोरेगाव, वाई सिंधुदुर्ग ः वैभववाडी सोलापूर ः अक्कलकोट, मोहोळ वर्धा ः आष्टी, कारंजा, समुद्रपूर वाशिम ः रिसोड

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com