मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दूध, अंडी, लोकर उत्पादनवाढीसाठी नियोजन करा ः मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी पशुधन वाढीबरोबरच दूध, अंडी आणि लोकर उत्पादनात वाढ होण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  मंत्रालयात आयोजित पशुसंवर्धन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला पदुममंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, की तालुका पातळीवर युवकांना रोजगार मिळावा म्हणून पशुपालक उत्पादक कंपन्या स्थापन करण्यास प्रोत्साहन द्यावे. अशा युवकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून आर्थिक सहकार्य करावे. मराठवाडा विशेष पॅकेजअंतर्गत जालना जिल्ह्यातील पशुधन विकासासाठी उपलब्ध निधीचा वापर करून जालन्यात देशपातळीवरचे पशू प्रदर्शन घेण्याबाबत नियोजन करावे. मुख्यमंत्री पशुधन योजनेअंतर्गत मागेल त्याला पशुधन देण्याबाबतची योजना ग्रामीण भागापर्यंत प्रभावीपणे राबवावी. चारायुक्त शिवार योजनेला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच सेक्स सोर्टेड सिमेन लॅब स्थापन करण्यास मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. बैठकीत गोवर्धन गोवंश योजना, विशेष दूधवाढ प्रकल्प, कुक्कुट विकास गटाची स्थापना, स्वयम प्रकल्प, महामेष योजना, राष्ट्रीय गोकुळ मिशन, दुधाळ जनावरांचे वाटप, चारानिर्मिती, पशू वैद्यकीय सेवा, कृत्रिम रेतन, फिरते पशू वैद्यकीय चिकित्सालय, एकात्मिक पशू चिकित्सा केंद्र, सैन्यदलाकडील फ्रिजवाल जातीच्या गाईंचे संगोपन, शेळीपालन व कुक्कुटपालनाच्या माध्यमातून महिला बचत गटांचे सबलीकरण तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढण्याच्या दृष्टीने करावयाच्या विविध उपाययोजनेवर चर्चा करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com