मिरची उत्पादनात घटीची शक्यता

मिरची उत्पादन
मिरची उत्पादन
मुंबई ः गेल्या वर्षी मिरचीला चांगला दर मिळाला नसल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगामात कमी लागवड झाली. त्यात रषशोषक कीड अाणि विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे मिरची पिकाचे नुकसान झाले अाहे. त्यामुळे यंदा (२०१७-१८) देशातील मिरची उत्पादन ३५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता अाहे. गेल्या वर्षी मिरची उत्पादन १८ लाख टनांवर पोचले होते. यंदा ते ११ लाख टनांपर्यंत खाली येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात अाहे.
 
मध्य प्रदेशातील मिरची पिकाला किडीच्या प्रादुर्भावाचा फटका बसला अाहे. तसेच मिरची उत्पादनात अाघाडीवर असलेल्या अांध्र प्रदेश अाणि तेलंगणामध्येही मिरचीचे लागवड क्षेत्र कमी झाले अाहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची चिन्हे दिसत अाहेत. 
 
अांध्र प्रदेश अाणि तेलंगणामध्ये देशातील एकूण मिरची उत्पादनाच्या ६५ टक्के उत्पादन होते. तर कर्नाटकात २५ टक्के, महाराष्ट्र, मध्य प्रदेश अाणि गुजरातमध्ये देशातील एकूण उत्पादनाच्या १० टक्के उत्पादन घेतले जाते. मध्य प्रदेशात खरिपातील मिरचीची सप्टेंबरमध्ये काढणी केली जाते. तर अांध्र प्रदेश, तेलंगणामधील मिरचीची डिसेंबरमध्ये बाजारात अावक होते.
 
गेल्या मे महिन्यात सर्वसाधारण दर्जाच्या मिरचीचे दर प्रतिक्विंटल १८००-२५०० रुपये दरम्यान होते. तर निर्यात केल्या जाणाऱ्या तेजा वाणाचा दर प्रतिक्विंटल ३५००-४५०० रुपये होता. मिरचीचे दर घसरल्याने खरिपात लागवड कमी केली. मिरचीला किफायतशीर दर मिळाला नसल्याने अांध्र प्रदेशातील शेतकरी मिरची पिकाकडून कापूस, भुईमूग, मका पिकांकडे वळले अाहेत, अशी माहिती मुंबई येथील व्यापारी अशोक दत्तानी यांनी दिली.
 
पीक लागवडीनंतरच्या सुरवातीच्या काळात कमी पाऊस अाणि त्यानंतर जोरदार पावसामुळे पिकावर परिणाम झाला अाहे, असेही त्यांनी म्हटले अाहे.
अांध्र प्रदेशातील मिरची पीक क्षेत्र ४४ टक्क्यांनी कमी झाले अाहे. येथे खरिपात ९२ हजार हेक्टरवर मिरची लागवड झाली होती. तर तेलंगणामध्ये २५ हजार हेक्टर मिरची लागवड क्षेत्र अाहे.
 
अांध्र प्रदेशात मिरची पिकावर रषशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसान झाले अाहे. विशेषतः येथील कर्नुल भागातील पिकाला अधिक फटका बसला अाहे, असे फलोत्पादन संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ गिरिधर कलिदासू यांनी सांगितले.
 
अांध्र प्रदेशात यंदा ५ लाख ६२ हजार टन मिरची उत्पादन होण्याचा अंदाज अाहे. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी कमी असेल. तेलंगणामधील उत्पादनात ३० टक्क्यांनी घट होऊन ते २ लाख ८० हजार टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता व्यक्त करण्यात अाली अाहे.
अांध्र प्रदेश अाणि तेलंगणानंतर कर्नाटकचा मिरची उत्पादनात तिसरा क्रमांक लागतो. येथील उत्पादन २७.८ टक्क्यांनी कमी होऊन ते २ लाख ६० हजार टनांपर्यंत खाली येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात अाला अाहे.
 
कीड प्रादुभार्वामुळे मध्य प्रदेशातील उत्पादन ८० टक्क्यांनी घटणार असल्याचे संकेत देण्यात अाले अाहेत. येथे १६०००-२०००० टन उत्पादन होण्याची शक्यता अाहे. गेल्या तीन वर्षांपासून मिरची पिकावर कीड, राेगांचा प्रादुर्भाव होत अाहे. ही कीड नियंत्रणात अालेली नसल्याचे दिसून येत अाहे.
मिरचीचे दर वधारण्याचे संकेत
देशात गेल्या वर्षीचा ८० हजार टन मिरचीसाठा शिल्लक अाहे. मात्र, यंदा उत्पादन कमी होणार अाहे. यामुळे दरात घसरण होण्याची शक्यता कमी अाहे. स्थानिक बाजारपेठेतून तसेच चीन, बांग्लादेश अाणि श्रीलंकेतून मागणी अधिक राहिल्यास दरात वाढ होईल, असे गुंटूर येथील मिरची निर्यातदार जुगराज भंडारी यांनी सांगितले.
 
तेजा मिरची वाणाचे दर डिसेंबरच्या मध्यावधीला प्रतिक्विंटल ११,००० रुपयांपर्यंत अाणि एलसीए-३३४ या वाणाचे दर ७०००-८००० रुपयांपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com