कपाशीत आधुनिक तंत्रज्ञान वापरात चीनची आघाडी

कपाशीत आधुनिक तंत्रज्ञान वापरात चीनची आघाडी
कपाशीत आधुनिक तंत्रज्ञान वापरात चीनची आघाडीAgrowon

कृषी उत्पादकता वाढीसाठी जाणीवपूर्वक व नियोजनबद्ध कार्यक्रमांची आखणी चीन सरकारने केली आहे. त्यासाठी जीएम तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी भरघोस आर्थिक तरतूद केली आहे. त्याचे फायदे दिसून येत असून, भारतातही नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जाणे आवश्यक आहे. 

जी एम तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या देशामध्ये जागतिक पातळीवर चीन अग्रक्रमावर आहे. कृषी उत्पादन वाढ व राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी चीन सरकारने राष्ट्रीय जनुकीय सुधारीत (जीएम) वाण विकास कार्यक्रम राबवण्याचे धोरण अंगीकारले अाहे. २००८ ते २०२० या काळातील या कार्यक्रमासाठी चीनने ३.८ अब्ज अमेरिकन डॉलर्सची अार्थिक तरतूद केली अाहे.

चीनमध्ये जीएम तंत्रज्ञान (बीटी) कापसाचा वापर १९९७ पासून सुरू झाला. त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच २००२ मध्ये भारतात बीटी कापसाची लागवड सुरू झाली. जगात १२५ प्रमुख कापूस उत्पादक देशांपैकी चीनची कापूस उत्पादकता सर्वांत जास्त अाहे. चीनमधील कापूस उत्पादकता प्रतिहेक्टर १७६१ किलो रुई व भारताची कापूस उत्पादकता ५०६ किलो प्रतिहेक्टर आहे. म्हणजेच भारतापेक्षा चीनची कापूस उत्पादकता जवळपास साडेतीन पटीने जास्त अाहे. 

चीनमध्ये सर्वांत जास्त कापूस उत्पादकता का? चीनमध्ये ‘पीपल्स रिपब्लिक अाॅफ चायना’ याची १९४९ साली स्थापना झाली. तेव्हापासून शास्त्रोक्त पद्धतीने कापसाची शेती सुरू झाली. सन १९४९ पूर्वी १६० किलो रुई प्रतिहेक्टरी कापसाची उत्पादकता होती. मात्र शास्त्रोक्त पद्धती, अाधुनिक साधनांचा वापर यातून उत्पादकता ११ पटीने वाढत १७६१ किलो रुई प्रतिहेक्टरपर्यंत पोचली आहे.

Stats
StatsAgrowon

उत्पादनवाढीतील प्रमुख बाबी ः 

  1.  जीएम तंत्रज्ञान बीटी कापूस वाणाचा वापर ः चीनमध्ये हवामान व पर्जन्यनिहाय विभाग (उदा. हाँग हुईहाई, यंगटझ रिव्हर व्हॅली, झिगझॅग) केलेले आहेत. त्यानुसार हवामान, पर्जन्य यात चांगल्या प्रकारे वाढणाऱ्या कापूस वाणांची लागवड केली जाते. 

  1.  कापसाच्या पेरणीऐवजी पुनर्लागवड पद्धतीने लागवड ः कापसाच्या बियाण्यांची पेरणी न करता रोपवाटिकेत कापसाच्या बियाण्यांपासून प्रथम रोपे तयार केली जातात. या रोपांची पुनर्लागवड शेतामध्ये केली जाते. पेरणीपेक्षा लावणीमध्ये ३० टक्के कापसाचे उत्पादन वाढते. 

  1.  प्लॅस्टिक /पेपर मल्चिंगचा वापर ः प्लॅस्टिक /पेपर मल्चिंगमुळे जमिनीचे पिकासाठी पोषक तापमान राखण्यास मदत होते. पाण्याची, खताची बचत होते. तणांची वाढ होत नसल्याने तणाद्वारे होणारे नुकसान टाळले जाते. तण काढणीवरील मजुरी खर्च वाचतो. झाडाची योग्य प्रकारे वाढ होऊन बोंडांची संख्या वाढते. कापूस उत्पादकतेत भरीव वाढ होते.     

  1.  अनावश्यक फांद्या व शेंड्यांची छाटणी करून वाढ रोखणे ः कापूस झाडांची अनावश्यक वाढ रोखण्यासाठी कापूस फांद्याची व झाडाच्या शेंड्याची छाटणी योग्य वेळी केली जाते. या वाढीसाठी घेतली जाणारी अन्नद्रव्ये वाचतात. त्याएेवजी बोंडाची संख्या व बोंडाची वाढ होण्याकरीता ही अन्नद्रव्ये वापरली जातात. बोंडांची गळ थांबते. झाडाचा जोम वाढतो. बोंडाचा अाकार, वजन व संख्या वाढल्यामुळे कापूस उत्पादनात वाढ होते.

  1.  हायडेन्सिटी तंत्र (कापूस झाडांच्या संख्येत वाढ) ः चीनमधील नॉर्थवेस्ट इनलँड विभागात हायडेन्सिटी प्लॅंट्स तंत्रज्ञानाचा वापर होतो. यात कापूस झाडांची एकरी संख्या वाढवली जाते. या पद्धतीमध्ये कमी कालावधीच्या, कमी उंचीच्या बुटक्या वाणाची निवड केली जाते. हेक्टरी दोन लाख ते तीन लाख कापूस झाडे संख्या ठेवली जाते. तंत्रज्ञानाचा वापर करून उंची ७५ सेमीपर्यंत नियंत्रित केली जाते.

  1.  ठिबक सिंचन पद्धतीचा वापर ः कापूस पिकाच्या सिंचनासाठी प्रामुख्याने ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला जातो. ठिबक सिंचनाचे फायदे सर्वश्रुत अाहेत. खते व सूक्ष्मद्रव्ये खर्चात बचत साधल्याने उत्पादन खर्चात बचतीसोबतच उत्पादनामध्ये उल्लेखनीय वाढ होते.

  • चीनच्या तुलनेमध्येच नव्हे तर जगामध्ये भारताची कपाशी उत्पादकता सर्वात कमी अाहे. ती वाढवण्यासाठी चीन प्रमाणेच आपल्यालाही अाधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची गरज आहे. कापूस उत्पादकामध्ये अाधुनिक तंत्राचा प्रचार, प्रसार, जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न वेगाने होणे आवश्यक आहे. तसेच योग्य बियाण्यांचा पुरवठा, सिंचन सुविधांसाठी भरघोस साह्य मिळाले पाहिजे. यासोबत परवडणारे हमीभाव, बाजारभाव उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळण्यास प्रोत्साहन मिळू शकेल.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com