कापूस आयातीसाठी चीनची भारताकडे धाव

कापसाला देशातच चांगले दर मिळतील. त्यासाठी आयातीवर शुल्क लावले पाहिजे. यंदाची दुष्काळी स्थिती पशुखाद्याची मागणी कमी करणारी ठरली आहे. सरकीला उठाव नाही. बाजार स्थिर असून, चीनने भारतातून कापूस आयातीला सुरवात केली आहे. चीनची गाठींची गरज मोठी असणार आहे. याचा सकारात्मक परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात दिसून येईल. - अरविंद जैन, माजी अध्यक्ष, खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशन
कापूस गाठी
कापूस गाठी

जळगाव ः चीनमधील कापूस लागवडीचे नियोजन चुकल्याने तेथील कापूस उत्पादनावर परिणाम झाला आहे. चीनने ६०० लाख गाठींची गरज भागविण्यासाठी संरक्षित साठ्याचा (बफर स्टॉक) वापर यंदा वाढवला आहे. यामुळे चीनने आशियाई देशांमध्ये कापूस आयातीसाठी चाचपणी सुरू केली असून, भारतातून सुमारे पाच लाख गाठींची तेथे निर्यात झाली आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण होणार नाही. दरही काहीसे वाढतील, अशी माहिती बाजार विश्‍लेषकांनी दिली. दरम्यान, जगातील सर्वांत मोठा कापूस उत्पादक देश अशी चीनची ओळख मागे पडली असून, भारत उत्पादनात जगात क्रमांक एकची जागा यंदा घेईल, अशी माहिती बाजारपेठ विश्‍लेषकांनी दिली आहे.  मागील दोन वर्षे चीनने संरक्षित साठ्यावर भर दिला. कापूस लागवड नियोजन (क्रॉप प्लानिंग) केले. त्यातच तेथील यंगत्से नदीच्या खोऱ्यातील भागात कापूस उत्पादनावर परिणाम व मर्यादा आल्या आहेत. चीनला दरवर्षी ६०० लाख गाठींची गरज असते. यंदा तेथे ३५० लाख गाठींचे उत्पादन होणार आहे. तेथे मागील वर्षापासूनच उत्पादन कमी व्हायला सुरवात झाल्याने संरक्षित ४०० लाख गाठींच्या साठ्यातून वापर वाढला. आजघडीला तेथील संरक्षित साठा एक कोटी गाठी एवढा आहे. संरक्षित साठ्यासह देशांतर्गत वापरासंबंधी चीनला आयातीवर अवलंबून राहण्याची वेळ आली असून, चीन पुढील सात ते आठ महिन्यांत सुमारे २० ते २५ लाख गाठींची आयात करेन, असे संकेत जाणकारांनी दिले आहेत. 

शिलकी गाठी १० लाखांनी कमी होणार कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाची (सीएआय) बैठक नुकतीच मुंबईत हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन स्टेशननजीक कॉटन बिल्डिंगमध्ये झाली. त्यात यंदाच्या कापूस हंगामासंबंधी अंदाज व्यक्त करण्यात आला असून, शिलकी गाठींचे प्रमाण १० लाख गाठींनी (एक गाठ १७० किलो रुई) घटेल, असे म्हटले आहे. यंदा देशांतर्गत गरज ३२० लाख गाठी असेल, देशातील उत्पादन ३६० लाख गाठी एवढे होईल. निर्यात ५५ लाख गाठी अपेक्षित आहे. आयातही ३५ ते ४० लाख गाठींपर्यंत होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याची माहिती या असोसिएशनचे सदस्य अनिल सोमाणी यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली. 

सरकीचे दर आणि आयात चिंताजनक सध्या सरकी व पशुखाद्याचे दर वाढत नसल्याची स्थिती आहे. सरकीचे कमी झालेले दर अजूनही वाढलेले नाहीत. देशांतर्गत बाजारात सरकीचे १८०० ते १५५० रुपये प्रतिक्विंटल दर आहेत. आंतरराष्ट्रीय कापूस बाजार स्थिर आहे. आयातही सुरू असून, जिनर्सच्या असोसिएशनने केंद्राकडे आयातीवर शुल्क लावण्याची मागणी केली होती, ती मंजूर झालेली नाही. कापड मिलचालकांच्या लॉबीने आयातीवर शुल्क लावले तर निर्यातीवरही लावा, अशी भूमिका मांडून केंद्रीय संस्थांना आयात शुल्क लावण्यासंबंधी रोखून धरल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

३६ लाख गाठींची निर्यात देशातून आशियाई देशांमध्येच गाठींची निर्यात झाली असून, बांगलादेशात सर्वाधिक १४ लाख गाठींची निर्यात झाली. त्यापाठोपाठ पाकिस्तानमध्ये सुमारे नऊ लाख गाठी गेल्या आहेत. तसेच चीन, तुर्की, व्हिएतनाम, इंडोनेशिया येथेही निर्यात झाली आहे. अलीकडे रुपया डॉलरपेक्षा थोडा कमकुमत झाल्याने निर्यातीला थोडी चालना मिळाली, परंतु किडक्‍या कापसाची रुई बहुराष्ट्रीय कंपन्या नाकारत असल्याचे सांगण्यात आले. 

भारताचे अपेक्षित उत्पादन   ३६० लाख गाठी  देशांतर्गत गरज      ३२० लाख गाठी  अपेक्षित निर्यात  ५५ लाख गाठी  शिलकी गाठी (कॅरी फॉरवर्ड) ३० लाख गाठी  चीनचे अपेक्षित उत्पादन     ३५० लाख गाठी  चीनची गाठींची गरज     ६०० लाख गाठी  चीनमधील संरक्षित साठा     एक कोटी गाठी  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com