फूल प्रक्रियेसाठी उद्योग उभारण्याची गरज : डॉ. लाखनसिंग

शेवंती फुलाच्या वाणांची पाहणी करताना शेतकरी
शेवंती फुलाच्या वाणांची पाहणी करताना शेतकरी

पुणे   ः पांरपरिक शेतीमधून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणे शक्य नसून, शेतकऱ्यांना कौशल्य विकासातून उद्योजकतेचे धडे देणे आवश्‍यक आहे. देशातील ७०३ कृषी विज्ञान केंद्रांद्वारे शेतकऱ्यांना शेतीमधील कौशल्य विकासाचे धडे दिले जात आहेत. शेतकऱ्यांनी पांरपरिक पिकांपासून फूलशेतीकडे वळले पाहिजे, तसेच फुलांच्या प्रक्रियेसाठी उद्योग उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन रिसर्च इन्स्टिट्यूटचे (अटारी) संचालक डॉ. लाखनसिंग यांनी केले.

भारतीय कृषी संशोधन परिषद आणि पुष्प संशोधन संचालनालयाच्या वतीने मंगळवारी (ता. ११) केशवनगर-मुंढवा येथील प्रक्षेत्रावर आयोजित शेवंती दिन कार्यक्रमात डॉ. लाखनसिंग बोलत होते. या वेळी पुष्पसंशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद, संचालनालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डी. व्ही. एस. राजू उपस्थित होते. शेवंती दिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी डॉ. लाखनसिंग म्हणाले, की जागतिक आणि देशपातळीवरील विविध संशोधने तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे काम देशातील कृषी विज्ञान केंद्रांद्वारे केले जात आहे. मात्र शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीतून फूलशेतीसारख्या पिकांकडे वळण्याची गरज आहे. या पिकांसाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देणे आवश्‍यक असून, तसे प्रयत्न कृषी विज्ञान केंद्रांतील शास्त्रज्ञ, प्राध्यापक करत आहेत. कौशल्य विकासातून उद्योजकाता विकास होऊन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होणार आहे.  

डॉ. के. व्ही. प्रसाद म्हणाले, की विविध फूल वाणांच्या संशोधनाबरोबरच लागवड ते काढणी आणि प्रक्रिया उद्योगांसाठीच्या यांत्रिकीकरणावर संचालनालयाचे संशाेधन सुरू आहे. हे संशाेधन लहान शेतकऱ्यांसाठी पूरक असणार असून, याद्वारे सुगंधी द्रव्ये, तेल आणि रंग तयार करण्यात येणार आहे. ही संशाेधने शेतकऱ्यांसाठी पर्याय निर्माण हाेऊन उत्पन्न वाढीसाठी फायदेशीर ठरतील. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कदम यांनी केले. विविध शेतकऱ्यांचा सत्कार या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com