प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस

प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस

सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व भाजप- शिवसेना महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. २३) अत्यंत चुरशीने मतदान झाले. माळशिरस, माढा, फलटण, करमाळा तालुक्‍यात अनेक ठिकाणी ही चुरस दिसून आली. या भागातील केंद्रांवर अनेक ठिकाणी सकाळपासून रांगा लागल्या. सायंकाळी सहा वाजेपर्यंत माढा 63.00 टक्के मतदान झाले. 

दुपारी उन्हातही रांगा कायम होत्या. काही ठिकाणी ईव्हीएम मशिनमधील बिघाड आणि किरकोळ बाचाबाची, वादावादीचे प्रकारही घडले, त्यामुळे मतदानाला उशीर आणि ताणतणावाचे वातावरण राहिले. पण काही वेळानंतर पुन्हा मतदान सुरळीत सुरू झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे ४४.१० टक्के मतदान झाले होते. 

माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि सातारा जिल्ह्यातील माण, फलटण अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. सुमारे १९ लाख ४ हजार ८३३ इतकी लोकसभेची मतदारसंख्या आहे. या सहाही कार्यक्षेत्रांत २०२५ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणला, तर राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी त्यांच्या निमगाव (टें) येथे मतदान केले. माढ्यात जवळपास ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पण नाईक निंबाळकर आणि शिंदे या दोघांमध्येच मुख्य लढत होत आहे.

सकाळी अकरा वाजेपर्यंत १९.३४ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. पुन्हा मतदानास गती आली. दुपारी एक वाजेपर्यंत हा आकडा जवळपास ३५ टक्‍क्‍यांपर्यंत गेला. महिलांसाठी माळशिरस आणि माढ्यात सखी मतदान केंद्रे उभारली होती. याठिकाणी मतदारांचे आकर्षक रांगोळी काढून आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. माढा, माळशिरस येथील काही केंद्रांवर दिव्यांगांसाठी खास व्यवस्था करण्यात आली. 

फेरमतदानाची मागणी निमगाव येथे भाजपचा पोलिंग एजंट बाहेरील असल्याचे कारण देत शिंदे यांच्या समर्थकांनी त्याला आक्षेप घेतला. त्यावरून भाजप उमेदवार समर्थक, प्रहार संघटनेचे अतुल खुपसे आणि शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक झडली. हे प्रकरण नंतर पोलिस ठाण्यापर्यंत गेले. खुपसे यांनी आमदार शिंदे आणि उमेदवार शिंदे या दोघांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली. दरम्यान, शिंदे यांच्या समर्थकांनी भाजपच्या पोलिंग एजंटला हुसकावून लावले. राष्ट्रवादी काँग्रेसने मुद्दामहून आमच्या पोलिंग एजंटला हुसकावून दादागिरी केली. त्यामुळे या केंद्रावर फेरमतदान घ्यावे, अशी मागणी नाईक- निंबाळकर यांनी केली. 

ईव्हीएममध्ये बिघाड अन्‌ वादावादी माढ्यातील लऊळमध्ये, सांगोल्यातील जिल्हा परिषद शाळा, भीमानगर येथील केंद्र, वेळापूर आणि निमगाव येथे, माण आणि फलटण भागात काही ठिकाणी मशिन बंद पडल्या. त्या बदलण्यात सुमारे तास- दीड तासाचा वेळ गेला. त्यामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. त्यावरून केंद्रप्रमुख आणि गावकऱ्यांमध्ये वादावादी झाली. वेळ वाढवून देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर वाद निवळला. जवळपास ५७ ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाडाच्या घटना घडल्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com