एकवीस कीडनाशकांवर बंदी

एकवीस कीडनाशकांवर बंदी
एकवीस कीडनाशकांवर बंदी

पुणे : विविध देशांत बंदी असलेल्या; मात्र भारतात वापरात असलेल्या ६६ कीडनाशकांचे फेरपरीक्षण (रिव्ह्यू) केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समितीतर्फे (सीआयबीआरसी) करण्यात आले आहे. या ६६ कीडनाशकांपैकी यापूर्वीच बंदी घालण्यात अालेल्या रसायनांसह २१ कीडनाशके येत्या काळात किंवा २०२० पर्यंत कायमस्वरूपी बंद होणार आहेत. वापर सुरू ठेवण्यास संमती मिळालेल्या जवळपास सर्व म्हणजे ४५ रसायनांचे पुढील वर्षी पुन्हा फेरपरीक्षण होणार आहे. किडींचे नियंत्रण करण्याची क्षमता, मानवी, पशुपक्षी व पर्यावरण आरोग्याच्या दृष्टीने विषारीपणा या दोन मुख्य कसोट्यांवर अभ्यास करून ‘सीआयबीआरसी’ने कीडनाशकांबाबत शिफारसीही सादर केल्या आहेत. बंदी आलेल्या रसायनांमध्ये १४ कीटकनाशके, ४ बुरशीनाशके व ३ तणनाशकांचा समावेश आहे. परदेशात बंदी मात्र भारतात नोंदणीकृत अशा ६६ कीडनाशकांच्या अनुषंगाने डिसेंबर २०१५ मध्ये ‘सीआयबीआरसी’च्या सदस्यांची बैठक झाली. यासंबंधीचा सविस्तर अहवाल ‘सीआयबीआरसी’ने संकेतस्थळावर उपलब्ध केला आहे. फेरपरीक्षण केलेल्या ६६ कीडनाशकांविषयी निरीक्षणे नोंदविण्याबरोबरच सीआयबीआरसीने महत्त्वाच्या शिफारसीही सादर केल्या आहेत. वापरास संमती मिळालेली काही कीडनाशके पर्यावरणाच्या अनुषंगाने किती विषारी आहेत याबाबत पुरेसा तपशील नसल्याचा शेरा नोंदविला आहे. तर काही शिफारसीत पिकांत काढणीपूर्व प्रतीक्षा काळ (पीएचआय) देखील दिलेला नसल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. त्या अनुषंगाने संबंधित कंपनी व कीडनाशक संघ यांना याबाबतचे अभ्यास अहवाल ठराविक मुदतीत उपलब्ध करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यांची पूर्तता न केल्यास डिसेंबर २०१७ मध्ये संबंधित कीडनाशकाचे नोंदणीकरण रद्द करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे बंदीच्या अनुषंगाने या देशांचे तपासले संदर्भ  मुख्य युरोपीय देश, अमेरिका, कोरिया, सौदी अरेबिया,  व्हेनेझुएल्ला, स्वीडन, डेन्मार्क, आॅस्ट्रेलिया, जपान, फ्रान्स अर्जेंटिना, रशिया, अँगोला, इक्वेडोर, पाकिस्तान आदी.  परीक्षण झालेली कीडनाशके. संमत कीडनाशके : ४५ 

  • कीटकनाशके    १९ 
  • बुरशीनाशके    १२
  • तणनाशके        ९
  • अन्य रसायने     ५  
  • बंदी आलेली एकूण कीडनाशके-२१

  • कीटकनाशके- १३ 
  • बुरशीनाशके- ४ 
  • तणनाशके- ३
  • संपूर्ण वापरासाठी बंदी आलेली कीटकनाशके : एकूण १३  

    1. कार्बारील 
    2. डीडीटी -शेतीसाठी यापूर्वीच बंदी, आता डासनियंत्रणासाठीही बंदी 
    3. डायझिनॉन- घरगुती कीटकनाशक
    4. डायक्लोरव्हॉस 
    5. इंडोसल्फान 
    6. फेनिट्रोथिआॅन 
    7. फेन्थिआॅन- कीटकनाशक-(घरगुती वापर, लोकस्ट (टोळधाड) व सार्वजनिक आरोग्य)
    8. मिथील पॅराथिआॅन 
    9. फोरेट 
    10. फॉस्फामिडॉन 
    11. थायोमेटाॅन 
    12. ट्रायझोफॉस 
    13. ट्रायक्लोरफाॅन 

    संपूर्ण वापरासाठी बंदी आलेली बुरशीनाशके :  एकूण ४

  • बेनोमील
  • फेनारीमोल 
  • मिथील इथिल मर्क्युरी क्लोराईड बुरशीनाशक- केवळ ऊस व बटाटा बेणेप्रक्रिया व्यतिरिक्त वापरास मनाई होती. आता पूर्ण बंदी. 
  • ट्रायडेमॉर्फ 
  • संपूर्ण वापरासाठी बंदी आलेली तणनाशके :  एकूण ३ 

  • अलाक्लोर 
  • लिन्युरॉन 
  • ट्रायफ्लुरॅलीन 
  • बंदी आलेली अन्य रसायने  सोडियम सायनाईड (उंदीर, मातीतील कीटकांच्या व धान्य साठवणूक कीड नियंत्रणासाठी)  बंदी आलेल्या एकूण रसायनांची संख्या- २१ लेबलवर या बाबींचा उल्लेख करण्याच्या शिफारसी 

  • मधमाश्यांची हानी टाळण्यासाठी फुलोरा अवस्थेत फवारणी नको. 
  • जलचर प्राणी, जलस्राेत यांच्या परिसरात वापर नको. त्यांच्यासह पक्ष्यांसाठी विषारी असा उल्लेख आवश्यक. 
  • लहान मुले व गर्भवती महिलांना फवारणी क्षेत्रापासून सुरक्षित अंतरावर ठेवावे.  
  • कार्बोफ्युरॉन-सर्वात विषारी असल्याने त्यासोबत हॅंडग्लोव्हज देणे गरजेचे.  
  • इथोफेनप्रॉक्ससारख्या कीडनाशकाचा मत्स्यशेती व भातशेती परिसरात वापर नको. सुरक्षेच्या सर्व दक्षता घेणे गरजेचे. 
  • मर्यादित स्वरूपात व तांत्रिक तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच वापर.
  • प्रॉपरगाईट-फवारताना हातमोजे व शरीर संरक्षक साधनांचा पूर्ण वापर हवा. मध्यम स्वरूपात त्वचाविकार, डोळ्यांना हानी होऊ शकते.
  • कीडनाशक हाताळणी वा फवारणी करणाऱ्या कामगारांची सुरक्षा घेण्यासंबंधीही दक्षता घेण्याच्या सूचना  
  • ठळक शिफारसी 

  • प्रत्येक कीडनाशकाचे फेरपरीक्षण दर दहा वर्षांनी होणे गरजेचे. 
  • कृषी विद्यापीठांनी आपल्या शिफारसींमध्ये लेबल क्लेमयुक्त कीडनाशकांचाच समावेश करावा. 
  • नियमित वापरात कीडनाशकांप्रती किडींमध्ये विकसित होणारी प्रतिकारक्षमता अभ्यासण्याचे किंवा त्याचे सर्वेक्षण करणारी यंत्रणा विकसित करण्याची गरज. 
  • कीडनाशक उत्पादनाच्या पॅकिंगसोबत शेतकऱ्याच्या संरक्षणासाठी हातमोजे तसेच अन्य संरक्षक साधने पुरवण्याची गरज. 
  • अत्यंत सूक्ष्म पद्धतीची (अल्ट्रा लो व्हॉल्यूम) फवारणी असल्यास संरक्षक साधने वापरण्याविषयी लेबलवर स्पष्ट सूचना. 
  • लेबलची रचना सुधारण्याची गरज. विशेषतः त्यावरील दक्षता घेण्यासंबंधीची माहिती ठळकपणे दर्शवण्याची गरज. 
  • सीआयबीआरसी’च्या परीक्षण समितीने सुचवलेल्या शिफारसींची संबंधित कंपनी व कीडनाशक संघांकडून वेळोवेळी पूर्तता व्हायला हवी.
  • विषबाधित रुग्णांवर त्वरीत उपचार करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळांची गरज.
  • जागतिक आरोग्य संघटनेने वर्गीकृत केलेल्या १ ए व १ बी वर्गातील कीडनाशकांच्या वापरावर 
  • राज्य सरकारचे कडक नियंत्रण गरजेेचे. त्याच्या सद्यस्थितीबाबत वेळोवेळी अहवालही देणे गरजेचे.
  • सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत राज्य सरकारने कीडनाशकांचे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत लेखापरीक्षण करून घेतले पाहिजे. 
  • संमत व बंदी आलेल्या रसायनांची एकूण यादी ( ६६)

    संमती मिळालेली कीटकनाशके :  एकूण १९ 

    1. ॲसिफेट- 
    2. बेनफ्युराकार्ब   
    3. बायफेनथ्रीन    
    4. कार्बोफ्युरॉन- (५० एसपी फॉर्म्युलेशनवर (स्वरूप) बंदी, मात्र तीन टक्के ग्रॅन्युलर स्वरूपाला संमती  
    5. कार्बोसल्फान   
    6. क्लोरफेनापायर- कीटकनाशक व कोळीनाशक 
    7. क्लोरपायरिफॉस 
    8. डेल्टामेथ्रीन
    9. डायकोफॉल- कीटकनाशक व कोळीनाशक 
    10. डायफ्लुबेंझ्युरॉन- कीड वाढ नियंत्रक- आयजीआर 
    11. डायमिथोएट  
    12. इथेफेनप्रॉक्स
    13. फेनप्रोपॅथ्रीन 
    14. मॅलॅथिआॅन 
    15. मेथोमील 
    16. मोनोक्रोटोफॉस- भाजीपाला पिकांत बंदी मात्र अन्य शिफारसीत पिकांत संमती 
    17. प्रॉपरगाईट-कीटकनाशक व कोळीनाशक 
    18. क्विनॉलफॉस
    19. थायोडिकार्ब 

    संमती मिळालेली बुरशीनाशके :  एकूण १२ 

    1. कॅप्टन 
    2. कार्बेनडाझीम 
    3. क्लोरथॅलोनील 
    4. डिनोकॅप
    5. इप्रोडिआॅन 
    6. कासुगामायसीन 
    7. मॅंकोझेब 
    8. प्राॅपीनेब 
    9. थायोफेनेट मिथाईल 
    10. थायरम-बीजप्रक्रियेसाठीचे बुरशीनाशक 
    11. झायनेब  
    12. झायरम

    संमती मिळालेली तणनाशके :  एकूण ९ 

    1. ॲट्राझीन 
    2. ब्युटाक्लोर 
    3. टू फोर डी  
    4. डायुरॉन 
    5. आॅक्सीफ्लोरफेन 
    6. पॅराक्वाट डायक्लोराईड 
    7. पेंडीमिथॅलीन 
    8. प्रेटिलॅक्लोर 
    9. सल्फोसल्फ्युरॉन 

    वापर सुरू ठेवण्यास संमती मिळालेली अन्य रसायने :  एकूण ५ 

    1. अल्युमिनीयम फॉस्फाईड- साठवणुकीच्या धान्यासाठी- धुरीजन्य कीटकनाशक-चालू 
    2. डॅझोमेट-कीटकनाशक व सूत्रकृमीनाशक- नर्सरीत वापरावयाचे.  
    3. मेपीक्वाट क्लोराईड- वनस्पती वाढ नियंत्रक- चालू, पुनर २०१८
    4. मेटॅल्डिहाईड- भारतातील एकमेव नोंदणीकृत गोगलगाय नाशक रसायन
    5. झिंक फॉस्फाईड- मुख्यत्वे उंदीरनाशक- वापरास संमती केवळ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ( वापरास मान्यता रसायनांची एकूण संख्या- ४५) 

    अहवालात कीडनाशकांच्या अनुषंगाने मांडलेल्या नोंदी 

  • मधमाश्‍यांसाठी अत्यंत विषारी. पीक फुलोरा अवस्थेत वापरण्यास मनाई
  • मातीत टिकून राहण्याचा गुणधर्म. मातीतील जीवाणू, गांडूळ यांच्यावर परिणाम शक्य
  • जलचर प्राणी, जलस्रोत यांच्यासाठी विषारी. प्रदूषणाचा धोका. 
  • कर्करोग संभवू शकतो. 
  • शिफारस केलेल्या पिकांमध्ये काढणीपूर्व प्रतीक्षा काळ (पीएचआय) दिलेला नसणे.  
  • एकाच कीटकनाशकाचा शिफारसीत पिकात पुन्हा पुन्हा वापर. उदा. ॲसिफेटचा कपाशीत अनियंत्रित वापर केल्याने पांढरी माशी व गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याचा पंजाब कृषी विद्यापीठाचा अहवाल
  • नोंदणीकरण होऊन काही वर्षांचा काळ उलटून गेलेल्या कीडनाशकांची किडींचे नियंत्रण करण्याची क्षमता पुन्हा तपासण्याची गरज.  
  • विषारीपणा, पर्यावरणीय व जैविक बाबी यादृष्टीने कीडनाशकावर संशोधन हवे.
  • गर्भावर परिणाम होऊ शकतो. नरवंध्यत्व येऊ शकते. 
  • झिंक फॉस्फाईडची कार्यपद्धती पाहता त्यावरील अँटीडोटची तातडीने गरज.
  • सल्फोसल्फ्युरॉन तणनाशकाच्या सतत वापराने पंजाब, हरियाना, उत्तराखंड भागात फॅलॅरिस मायनर तणात प्रतिकारक्षमता वाढल्याची शक्यता  प्रतिक्रिया... यवतमाळमध्ये नुकतीच घडलेली घटना दुर्दैवीच आहे ‘सीआयबीआरसी’ ने ६६ कीडनाशकांचे फेरपरीक्षण केले आहे. त्यातील काही कीडनाशकांचा वापर पूर्ण थांबविण्याचेही ठरविले आहे. परदेशात एखादे कीडनाशक ‘बॅन’ आहे याचा अर्थ सर्वच देशांकडून त्यावर बंदी असा त्याचा अर्थ नसतो. काही देशांत त्याच्या वापराला संमतीही असते. भारतही एखाद्या कीडनाशकावर बंदी घालतो त्या वेळी अन्य देशांत त्याचा वापर सुरू असतो. अनेक गोष्टी विचारांत घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात.  - डॉ. पी. के. चक्रवर्ती  सहायक महासंचालक (पीक संरक्षण)भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com