भारतीय मागूर मासा
भारतीय मागूर मासा

भारतीय मागूर माशांचे बिजोत्पादन तंत्रज्ञान

कमी संवर्धन कालावधी (सहा ते सात महिने), कमी पाणीपातळीमध्येही उत्तम वाढ, कणखर स्वभाव, कृत्रिम खाद्य स्वीकारण्याची सवय, बाजारामध्ये असलेली प्रचंड मागणी इत्यादी कारणांमुळे मागूर मत्स्यपालनाचे महत्त्व वाढले आहे. योग्य प्रतीचे बीज योग्य प्रमाणात उपलब्ध न होणे ही मागूर संवर्धनाच्या प्रगतीमधील सर्वात मोठी अडचण आहे. कृत्रिम पद्धतीने बीजनिर्मिती करून मागूर माशांचे चांगले उत्पादन मिळवता येते. भारतीय मागूर (Clarias batrachus) माशाला उत्तम चव अाणि औषधी गुणधर्मामुळे बाजारामध्ये मोठी मागणी आहे. मागूरमध्ये मुबलक प्रथिने (२१ टक्के) व जीवनसत्त्व (बी१, बी२, डी) योग्य प्रमाणात आढळते व दुसऱ्या माशांच्या तुलनेत चरबीचे प्रमाण खूप कमी असते. मानवी शरीर मागूरमधील प्रथिने सहज पचवू शकते. मानवाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. अशा विविध कारणांमुळे सर्व राज्यामध्ये मागूरला चांगली मागणी आहे. नैसर्गिकदृष्ट्या मागूर मासा मुख्यतः दलदल, चिखल आणि वनस्पतीयुक्त जलाशयात किंवा भाताच्या शेतात संवर्धित केला जातो. माशाचे कमी पाणी पातळीच्या तलावामध्येही पालन करतात. मागूर हा कणखर मासा असल्यामुळे खराब जलाशयातही आढळतो. मागूर मत्स्यबीजनिर्मिती

  • ०.०४ ते ०.१ हेक्टर आकाराच्या ०.७५ मी. ते १.० मी. खोली असलेल्या आयताकृती तलावात वातावरणामध्ये बदल करून मागूर माशाचे बिजोत्पादन करता येते.
  • तलावाच्या तळाशी १५ ते २५ सेंमी खोल असे छोटे छोटे खड्डे तयार करतात. या खड्ड्याचा वापर माद्या घरटे म्हणून करतात.
  • तलावाच्या आतील कडेने ५० सेंमी खोल खंदक तयार केले जाते.
  • खंदकामध्ये डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये प्रजननासाठी माशाचे संचयन केले जाते .
  • प्रजननक माशांना त्यांच्या एकूण वजनाच्या २ ते ३ टक्के प्रमाणे दररोज खाद्य पुरविले जाते.
  • या कालावधीमध्ये तलावांमधील इतर मध्य भाग उघडा ठेवला जातो. उघड्या क्षेत्रामध्ये भात पीक घेता येऊ शकते .
  • पावसाळा सुरू झाल्यानंतर पाण्याची पातळी २५ सेंमीपर्यंत हळूहळू वाढते.
  • यावेळी प्रजननक मासे खंदकामधून बाहेर येऊन तयार करण्यात आलेल्या छोट्या छोट्या खड्ड्याभोवती जोडीने फिरतात व खड्ड्यामध्ये फलित अंडी सोडतात.
  • ८ ते १० दिवसानंतर तलावातील पाण्याची पातळी पुन्हा कमी केली जाते.
  • पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर प्रजनन केलेले मासे पुन्हा खडकांमध्ये जातात.
  • खड्ड्यामध्ये पाणी साठले असल्यामुळे त्यामध्ये अंड्याची नैसर्गिक उबवणी होऊन पिले बाहेर पडतात.
  • खड्ड्यामधील पिले बारीक जाळी असलेल्या गाळणीने पकडून त्यांचे पुढील संगोपन करतात.
  • लैंगिक परिपक्वता

  • मागूर मासा एक वर्षाच्या कालावधीत किंवा एका वर्षानंतर परिपक्व होतो.
  • परिपक्व झाल्यानंतर मादीचे वजन जास्त असते व तिचे पोट फुगल्यासारखे असते.
  • नर मासा पातळ व लांब असतो.
  • मादीमध्ये जननेंद्रिय छोटे व गोलाकार अंड्याच्या आकारासारखे व छिद्र असलेले असते.
  • नर माशात जननेंद्रिय लांब व टोकदार असते.
  • परिपक्व झाल्यानंतर या माशाचे वजन १३० ते १५० ग्रॅमपर्यंत होते.
  • परिपक्वतेची ओळख

  • परिपक्व मादीचे पोट फुगीर व त्यास स्पर्श केल्यास ते नरम लागते.
  • परिपक्वता पडताळणीसाठी मादीच्या जननेंद्रियामधे प्लॅस्टिकची पातळ नळी टाकून अंडी तोंडाद्वारे सावधपणे शोषून घेतली जातात.
  • अंड्याची पडताळणी सूक्ष्मदर्शकद्वारे (मायक्रोस्कोप) केली जाते.
  • अंड्याचा आकार सामान्य (१.०-१.२ मि मी) असेल तर मादी प्रजननासाठी तयार आहे असे समजले जाते. जर अंडी लहान आकाराची असतील तर मादीला पुन्हा परिपक्‍व होण्‍यासाठी तलावात सोडण्यात येते.
  • परिपक्व मादीच्या उदराला हळूवार दाबल्यास अंडी बाहेर निघतात.
  • नराची परिपक्वता त्याचा जननेंद्रियाचा उभार पाहूनच केली जाते. जो जास्तच वर आलेला दिसतो.
  • माशाची शुक्र वाहिनी नलिका जटिल असल्यामुळे कार्प माशाप्रमाणे पोटाला दाब दिला असता शुक्राणूयुक्त द्रव्य सहजपणे बाहेर पडत नाही.
  • प्रेरित प्रजननाचा काळ (स्ट्रिपिंग पद्धत)

  • प्रेरित प्रजननासाठी मादीला ओव्हप्रिम/ओवाटाइड या संप्रेरकाराची १ ते १.५ मि.लि. प्रति एक किलो अशी मात्रा दिली जाते.
  • म्हणजेच एका १५० ग्रॅम वजनाच्या मादीला ०.१ मिली एवढी संप्रेरकाची मात्रा इंजेक्शनच्या साहाय्याने दिली जाते.
  • संप्रेरकाची मात्रा मादीला संध्याकाळच्या वेळी दिली जाते.
  • त्यानंतर १५ ते १७ तासानंतर मादीचे पोट दाबून अंडी बाहेर काढली जातात व वीर्याच्या द्रावणामध्ये मिसळतात.
  • वीर्याचे द्रावण तयार करण्यासाठी नराचे पोट फाडून वीर्याची पिशवी वेगळी केली जाते व नंतर वीर्याच्या पिशवीचे तुकडे करून ०.९ टक्के सलाईनमध्ये त्याचे द्रावण केले जाते.
  • तयार केलेले द्रावण २४ तासापर्यंत कधीही वापरता येते. हे द्रावण अंडी फलित करण्यासाठी वापरतात .
  • अंडी व वीर्याचे द्रावण योग्य पद्धतीने मिसळल्यानंतर फलित अंडी धुतली जातात.
  • मागूरची अंडी चिकट व फिकट तपकिरी रंगाचे दिसतात तर न फलित झालेली मागूरची अंडी पांढरी पडतात.
  • या प्रक्रियेमध्ये नर माशाला संप्रेरकाची मात्रा देण्याची आवश्यकता नसते.
  • एक मासा सर्वसाधारणपणे दहा हजार अंडी देतो.
  • अंडी उबविण्यासाठी प्लॅस्टिकचा टब किंवा पत्राच्या ट्रेचा वापर करतात.
  • पत्र्याच्या ट्रेचे आकारमान १.२५ मी x ०.५ मी x ०.२ मी. एवढी असते.
  • एका ट्रेमध्ये दोन मादींपासून मिळणारी अंडी उबविण्यासाठी सोडतात.
  • अंडी उबविण्यासाठी पाण्याचा प्रवाह एक लिटर प्रति मिनिट एवढा ठेवतात.
  • २४ ते २६ तासानंतर अंड्यामधून पिले बाहेर येतात.
  • सरासरी ६० ते ८० टक्के एवढे उबविण्याचे प्रमाण या तंत्रामधून मिळते 
  • पिलांना उबवणी ट्रेमधून बाहेर काढून ९ फूट x २ फूट x १.५ फूट आकारमानाच्या दुसऱ्या एफअारपी टाकीमध्ये ४ ते ५ हजार पिलांचे संचयन करतात .
  • एफअारपी टाकीमध्ये पिलांची पुढील काळजी आठवडाभर घेतली जाते.
  • सुरवातीचे तीन दिवस पिले शरीरामधील साठवलेल्या अन्नद्रव्याचा उपयोग वाढीसाठी करतात व नंतर बाहेरील खाद्य खाणे सुरू करतात.
  • टाकीमध्ये पाण्याची पातळी ९ इंचापर्यंत ठेवली जाते. पाण्यामधील प्राणवायूचे प्रमाण योग्य राहावे म्हणून एरिएटर सुरू ठेवले जातात.
  • टाकीमधील दररोज १० ते २० टक्के पाणी बदलेले जाते. या दरम्यान दिवसातून दोनदा प्लवंग व दिवसातून एकदा अंड्याचे आटीव मिश्रण खाद्य म्हणून पुरविले जाते.
  • संगोपन व्यवस्थापन

  • तळाला मातीचा थर दिलेली सिमेंटची टाकी किंवा पूर्ण मातीच्या तलाव संगोपनासाठी वापरतात. तलावाचे आकारमान ५० ते १०० चाै.मी. एवढे असते.
  • तलावामध्ये जास्तीत जास्त ८० सेंमी पाण्याची पातळी ठेवली जाते.
  • खताची मात्रा देते वेळी २५ ते ३० से.मी. पाण्याची पातळी ठेवली जाते.
  • पाण्याचा सामू योग्य राहावा म्हणून खताची मात्रा देण्याअगोदर प्रति हेक्टरी १०० किलो चुन्याची मात्रा दिली जाते.
  • प्रति हेक्टरी ५०० किलो ताजे शेण, १०० किलो शेंगदाणा पेंड व २५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट खत म्हणून वापरतात.
  • खताच्या वापरामुळे पाण्यामध्ये नैसर्गिक प्लवंग निर्मिती होते.
  • पिल्ली सोडण्याच्या एक आठवडा अगोदर खताची मात्रा दिली जाते.
  • प्रति चाै.मी. साठी ४०० ते ५०० बीज या प्रमाणात पिलांची संचयन घनता ठेवली जाते.
  • ३० ते ३५ दिवसामध्ये बिजाची वाढ ७ से.मी. व वजन २ ग्रॅम एवढे होते.
  • संगोपन कालावधी दरम्यान प्रत्येक आठवड्याला पाण्याची पातळी १० से.मी.ने वाढवतात. संगोपनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पाण्याची पातळी ७५ से.मी. पेक्षा जास्त व ९० से.मी.पेक्षा कमी ठेवतात.
  • मत्स्यबीजांना खाद्य म्हणून सुकी मासळी व भाताचा कोंडा याचे मिश्रण किंवा बाजारामध्ये उपलब्ध असलेले झिग्यांचे बारीक दाण्याचे खाद्य वापरतात.
  • खाद्य व्यवस्थापन

  • ७ :३ या प्रमाणात लहान मासे आणि तांदळाच्या कोंड्याचे मिश्रण दिले जाते.
  • खाली दिलेल्या तक्त्याप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी असा दोन वेळा आहार दिला जातो.
  • कालावधी--- प्रमाण (किलो प्रति एक लाख जिरे प्रति दिवस) पहिला आठवडा---१.० दुसरा आठवडा---२.० तिसरा आठवडा---३.० चाैथा आठवडा---४.० पाचवा आणि सहावा आठवडा---५.० जिऱ्यापासून बोटुकलीचे उत्पन्न

  • ३० ते ४० दिवसांत मत्स्यजिऱ्यापासून ५ ते ७ सेंमी अाकारच्या २ ग्रॅम वजनापर्यंतच्या मत्स्यबोटुकली मिळतात.
  • ५० ते ६० टक्क्यांपर्यंत मासे जिवंत राहण्याचे प्रमाण असते.
  • संपर्क ः सोमनाथ यादव, ९८९०९१५६८६ (मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com