नवसंशोधनातून हवामान बदलावर करा मात

औरंगाबादेत १४ डिसेंबरपासून‘हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावर झालेला परिणाम’ या विषयावर तीनदिवसीय जागतिक परिषद चालू आहे. या निमित्ताने बदलत्या हवामानाची कारणे, हवामान बदलाचा शेतीवर झालेला परिणाम आणि त्यावरील उपाययोजना मांडण्याचा हा प्रयत्न...
नवसंशोधनातून हवामान बदलावर करा मात
नवसंशोधनातून हवामान बदलावर करा मात

हवामान बदलासाठी मानवाचा नैसर्गिक संतुलनात अवाजवी हस्तपेक्ष हा प्रामुख्याने कारणीभूत आहे. हवामान बदलाचा सर्वात मोठा विघातक परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. गेल्या वीस वर्षात एकंदरीत तापमानात जवळपास ३ अंश सेल्शिअसने वाढ झाली आहे. तापमानवाढीमुळे पावसात फरक झाला आहे. मॉन्सूनच्या प्रमाणात फारसा बदल झाला नसून त्याच्या वितरणात मोठा बदल झाला आहे. २०३० पर्यंत तापमान आणखी ३ अंश से. वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान आणि पाण्याचा जवळचा संबंध आहे. तापमानवाढीमुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असल्याने पिकांची पाण्याची गरजही वाढणार आहे. पाण्याचा काटसरीने आणि काळजीपूर्वक वापर करणे महत्त्वाचे आहे.

पावसाच्या वितरणात बदल हवामान बदलाचा परिणाम बघता गत शंभर वर्षात तापमानात ०.६ अंश से. वाढ झाली, मात्र गेल्या वीस वर्षात त्यात ३ ते ५ अंश सेल्शिअने वाढ झाल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. यामुळे पावसाचे वितरण बदलत असून अचानक मोठा पाऊस पडणे किंवा खंड पडणे हे त्याचे लक्षण आहे. देशातील पर्जन्यामानाच्या बाबतीत विचार केल्यास विभागनिहाय पावसाचे प्रमाण बदलते आहे. उन्हाळ्यातील पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाचे एकूण दिवस कमी होत आहेत. समुद्राच्या पातळीत प्रती वर्षी २.५ मि.मी. (१९५० पासून) वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. हवामानात अचानक बदल घडत असून उष्णता किंवा थंडीची लाट, धुके पडणे, गारपीट होणे हे सर्व वारंवार घडत आहे. हवामान बदलाचा परिणाम सध्या १० ते १५ टक्के दिसत असून वेळीच उपाययोजना न केल्यास २५ टक्क्यांवर तो पोचेल. ‘ग्रीन हाउस गॅसेस’ घातक कार्बनडाय ऑक्साईड, मिथेन, नायट्रेड ऑक्साईड या वायूंचे वातावरणात प्रमाण वाढत असून या वायूंचा प्रभाव रोखणाऱ्या घटकांचे प्रमाण कमी होत आहे. शहरीकरणामुळे होत असलेली अमाप वृक्षतोड, औद्योगिकीकरणामुळे वाढते प्रदूषण, वाहनांमुळे होणारे प्रदूषण आदींमुळे हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत अाहे. याला रोखणाऱ्या वृक्षांची संख्या कमी झाली आहे. नत्रयुक्त खतांच्या वाढत्या वापराने नायट्रस ऑक्साईड वाढत आहे. मिथेन वायूचे प्रमाणदेखील वाढले आहे. यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडून हवामान बदल घडत आहे.

हवामान बदलात शेतीचे नुकसान बदलत्या हवामानामुळे सर्वात जास्त नुकसान हे शेतीचे होत आहे. अतिपावसाने खरिपाची, तर उष्णतेमुळे रब्बीची पिके धोक्यात आली आहेत. उष्णता वाढत असल्याने पिकांत मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते. पिकाला वेळेवर आणि गरजेपुरते पाणी उपलब्ध न झाल्यास पिके करपून जातात. पावसाचे दिवस कमी होत असल्याने विविध पिकांच्या उत्पादनासाठी ही गोष्ट हानिकारक आहे. केवळ पेरणीनंतर पाऊस पडून गेला आणि फूल आणि फळधारणेच्या काळात पिकाला आवश्यक तेवढे पाणी न मिळाल्यास उत्पादनात यामुळे घट येत आहे. अति उष्णता, अति थंडी ही पिकाला घातक आहेच, शिवाय धुक्यामुळेदेखील पिकावर रोगकिडींचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षांत गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उष्णतेमुळे दुग्ध आणि पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे. हवामान बदलामुळे एकूणच कृषी क्षेत्र अडचणीत आले आहे.

बदलत्या हवामानावर उपाययोजना अचानक किंवा तात्पुरत्या हवामान बदलावर तंत्रज्ञानातून उपायोजना करता येणे शक्य आहे. दीर्घकालीन उपाययोजनांसाठी संशोधन आणि धोरणात बदल करणे आवश्यक आहे. हवामान बदल, पाणी यांचा परस्पर संबंध असल्याने पावसाचे दिवस कमी होत अाहेत. पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. यासाठी मूलस्थानी जलसंधारण, बांध घालून पाणी अडविणे, शेततळ्यात पाणी साठविणे हे उपाय करताना पिकांना सिंचनासाठी ठिबक, तुषारसारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतीचा उपयोग करावा.     कोरडवाहू शेतात जास्तीत जास्त पाणी जिरविणे आणि बागायती क्षेत्रासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे. राज्यात जवळपास ८० टक्के क्षेत्र हे कोरडवाहू असल्याने भूगर्भातील पाण्याचे संरक्षण आणि जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. झाडातून पाण्याचे होणारे बाष्पीभवन लक्षात घेता जमिनीत शक्य तेवढे पाणी जिरविणे, मल्चिंग तंत्राचा वापर करणे, बीबीएफसारखे तंत्रज्ञानदेखील उपयुक्त ठरणारे आहे. ऊन आणि वाऱ्यापासून संरक्षणासाठी पिकाला सजीव कुंपण करावे. यामुळे पर्यावरणाचे संवर्धन आणि पिकांचे संरक्षण होईल.     शेतीसाठीच्या काही पारंपरिक पद्धती या उपयुक्त असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. या पीकपद्धतीचा अवलंब करून नुकसान कमी करता येईल. पिकांचा फेरपालट, आंतरपीक पद्धतीचा वापर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदलत्या हवामानात तग धरून राहणाऱ्या वाणांची निवड करावी.     हवामानावर अाधारित पीक पद्धती अवलंबविणे यापुढील काळात अनिवार्य आहे. मोठ्या प्रमाणावर संरक्षित (उदा. शेडनेट) शेती करणे आवश्यक आहे. फळपिकांसाठी हेलसारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. बागेवर संपूर्णपणे आच्छादन करणे या तंत्रात आवश्यक आहे. या सारखे प्रयोग कॅनडा, अमेरिका आदी देशात होत आहे. राज्यात काही भागातील शेतकरी जुन्या साड्यांचा वापर करून पिकांचे उष्णतेपासून संरक्षण करत आहेत.  विविध पिके आणि फळबागेवर धुक्याचा अनिष्ट परिणाम घडतो. यावर उपाय म्हणून धुके पडण्याच्या कालावधीत शेताच्या बांधावर काडीकचरा जाळून धुक्याचे प्रमाण कमी करता येणे शक्य आहे. ग्रीन हाऊस गॅसेस कमी करण्यासाठी वृक्षलागवड करावी. पिकांना नत्रयुक्त खते देताना काळजीपूर्वक आणि आवश्यक तेवढीच द्यावीत. शहरीकरण आणि कारखानदारीमुळे वाढते प्रदूषण रोखणे गरजेचे आहे. 

नव्याने हवे संशोधन बदलते हवामान लक्षात घेता विविध पिकांच्या पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी बदलत आहे. यामुळे पिकांसाठी शिफारस केलेले वाण, पाण्याची गरज, खते या सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. यामुळे सध्या असलेले विविध पिकांसाठीचे पेरणी तंत्रज्ञान हे कालबाह्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी हवामानाचा अचूक अभ्यास करून संशोधनातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसमोर मांडणे गरजेचे आहे. हवामानाचा अंदाज अचूक येण्यासाठी आधुनिक साधनसामग्री गरजेची आहे.  ः ९४२३६८९८१२ (लेखक कृषी व पर्यावरण क्षेत्रातील मुक्त पत्रकार आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com