कोकणचे नारळपीक रामभरोसे

कोकणचे नारळपीक रामभरोसे
कोकणचे नारळपीक रामभरोसे

सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग : शाश्‍वत बाजारपेठ आणि प्रक्रिया उद्योगाच्या अभावामुळे कोकणातील नारळ बागायती रामभरोसे सुरू आहे. काजूचे पीक कमी देखभालीत चांगला फायदा देऊ लागल्याने बागायतदार पारंपरिक नारळ बागायतीपासून दूर होऊ लागल्याचे चित्र आहे. 

साधारण तीनशे वर्षांपासून कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात नारळाची लागवड सुरू झाली. आज कोकणात सुमारे 33 पैकी 31 हजार हेक्‍टरमधील लागवड उत्पादनक्षम आहे. संपूर्ण कोकणात वार्षिक 175.34 दशलक्ष नग नारळ मिळतात. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, दापोली व गुहागर, तर सिंधुदुर्गमधील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्‍यांच्या किनारपट्टी व सह्याद्रीच्या पायथ्याच्या भागात मोठ्या प्रमाणात नारळाचे उत्पादन घेतले जाते. 

शाश्‍वत पीक म्हणून असलेली नारळाची ओळख हरवू लागली आहे. येथील नारळाची बाजारपेठ हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्‍या दलालांच्या हातात आहे. ते नारळाचा दर कसा पडेल, याची प्रभावीपणे काळजी घेतात. वाढत्या उत्पादन खर्चामुळे नारळाचे आर्थिक गणित बसविणे कठीण बनले आहे. यातच गेल्या दोन वर्षांत काजूचा प्रतिकिलो दर सर्वसाधारण पन्नास-साठ वरून दीडशेपर्यंत पोचला आहे. काजूला फारशी मेहनत करावी लागत नाही. उत्पन्नही चांगले मिळत असल्याने अनेक बागायतदार नारळाऐवजी काजू पिकाकडे अधिक लक्ष देऊ लागले आहेत. यामुळे पुढच्या काळात "नारळ-पोफळींच्या बागांमधील कोकण' ही ओळख पुसली जाण्याची शक्‍यता आहे. 

नारळ बारमाही पीक आहे. उपलब्धता असल्याने कोकणी माणसाच्या आहारातील तो महत्त्वाचा घटक आहे. नारळाशिवाय त्याच्या जेवणाला पूर्णत्व नाही. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत विक्री होणारा बहुतांश नारळ दररोजच्या वापरासाठी स्थानिकच खरेदी करतात. 

कोकणातील नारळाची निर्यात होत नाही. लहान बागायतदार शहराच्या आठवडा बाजारात जाऊन किरकोळ आणि घाऊक विक्री करतात. स्थानिक व्यापारी त्याची जिल्ह्याच्या अन्य भागांत विक्री करतात. मोठे उत्पादक घाऊक पद्धतीने विक्री करतात. व्यापारी त्यांच्या बागेतूनच नारळ घेऊन जातात. किरकोळ आणि घाऊक विक्रीदरात मोठी तफावत नसते. 

कल्पवृक्षाला उतरती कळा  गेल्या काही वर्षांत नारळाच्या बागांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. आंब्याच्या बाजारपेठेविषयी मोठी चर्चा होते. तुलनेत नारळासाठी ठरलेली बाजारपेठच नाही. साहजिकच स्थानिक दलाल सांगतील तो दर बागायतदाराला घ्यावा लागतो. विविध रोगांवर उपाय करण्यासाठी खर्च वाढला, रासायनिक आणि सेंद्रिय खतांच्या किमती वाढल्या, मजुरीचे दरही वाढले. पारंपरिक पद्धतीत बदलामुळे सिंचन खर्चही वाढला. परिणामी उत्पादन खर्च वाढला. 

उत्पादनात मोठी घट  गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे नारळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. "इरिओफाइटमाइट' या रोगाचा घाला नारळावर पडला आहे. हा कोळी फळामधला रस शोषून घेतो. त्यामुळे परिपक्व होण्याआधीच नारळ गळून पडतात. नारळाचा आकारही लहान होतो. त्याच्या बाह्यपृष्ठावर सुरकुत्या निर्माण होतात. यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली. अनेक ठिकाणी लाल तोंडाच्या माकडांच्या धाडी नारळावर पडत आहेत. ही माकडे कोवळे नारळ पोखरून खातात. त्यांचा बंदोबस्त करणे बागायतदारांच्या आवाक्‍याबाहेरचे काम आहे. 

खर्च-उत्पन्नाचे व्यस्त प्रमाण  वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत नारळाला मिळणाऱ्या बाजारभावात वाढ नाही. एका झाडाला खते, कीटकनाशके, पाणी आणि मजुरी यांचा दरवर्षी खर्च सरासरी पन्नास ते साठ रुपये एवढा येतो. हा खर्च कृषी संशोधकांच्या अभ्यासाअंतीचा निष्कर्ष आहे; मात्र परिस्थितीनुसार खर्च वाढत असतो. त्याच्या तुलनेत उत्पादनातील घट आणि बाजारभाव पाहता खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ साधताना बागायतदार जेरीस येत आहेत. एकेकाळी दोन नारळांची किंमत म्हणजे एका मजुराची मजुरी होती. आज सुमारे वीस नारळ विकल्यानंतर मजुरीची रक्कम मिळते. 

हे आहेत प्रश्‍न 

  • कोकणातील नारळ उत्पादनासंबंधीचा दृष्टिकोन आजही पारंपरिक 
  • उत्पादनवाढ आणि बाजार व्यवस्थेसाठी संघटित प्रयत्न नाहीत 
  • नारळ संशोधन संस्था आणि शेतकरी यांच्यात अंतर 
  • उत्पादन क्षेत्रातील सिंचन विकासाकडे दुर्लक्ष 
  • नारळ उत्पादनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक 
  • नारळाची विक्री किंमत निश्‍चित नाही, हमीभाव नाही 
  • उत्पादक बागायतदारांमध्ये संघटनाचा अभाव 
  • उत्पादकांच्या प्रश्‍नांवर भूमिका घेणाऱ्या राजकीय, सामाजिक संघटनांचा अभाव 
  • प्रक्रिया उद्योगांचा अभाव 
  • असे आहे अर्थकारण  शास्त्रीय माहितीनुसार कोकणात प्रामुख्याने लागवड केल्या जाणाऱ्या "बाणावली' जातीच्या झाडापासून वर्षाला सरासरी 90 ते 100 नारळ मिळतात. त्यांची फळधारण क्षमता परिस्थितीसापेक्ष 50 ते 250 एवढी आहे, तर "टीडी' आणि "डीटी' या संकरित जातींपासून 140 ते 150 नारळ सरासरी मिळतात. यासाठी बागेची पूर्ण क्षमतेने देखभाल करणे आवश्‍यक आहे. मात्र देखभालीकडे दुर्लक्ष, वातावरणातील बदल यामुळे इतके उत्पन्न अगदी मोजक्‍या बागांमध्येच मिळते. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com