यंत्रामुळे शहाळे फोडणे, नारळ सोलणे झाले सोपे

 शहाळे फोडणे, नारळ सोलणी यंत्र
शहाळे फोडणे, नारळ सोलणी यंत्र

शहाळे फोडणे आणि नारळ सोलणे यंत्र महिला तसेच वयस्क व्यक्तींना वापरता येते. यंत्रामुळे एका मिनिटात तीन शहाळी फोडता येतात. यंत्र वजनाने हलके आहे. यंत्राची संपूर्ण जोडणी नट बोल्ट वापरून केल्याने अंशतः तसेच संपूर्ण यंत्र सुटे करून वाहतूक करता येते. कोयत्याच्या साहाय्याने शहाळे फोडण्यासाठी कौशल्य आणि ताकदीची गरज असते. आपण शहाळे छाटून नेले तरी त्यातील पाणी लगेच प्यावे लागते, कारण शहाळे अर्धवट छाटल्याने त्यातील पाणी लवकर खराब होते. कोयत्याने छाटलेल्या शहाळ्यांचा कचरा पसरतो. हे लक्षात घेऊन शहाळ्यास छिद्र पाडणे, शहाळे फोडणे, तसेच तयार नारळ सोलण्यासाठी यंत्र विकसित करण्यात आले आहे. रचना आणि कार्यपद्धती 

  • मुख्य फ्रेम लोखंडी अँगलने बनविलेली आहे. या फ्रेमवर यंत्र जमिनीवर ठेवले जाते.
  • फ्रेमवर शहाळे ठेवण्यासाठी वर्तुळाकार रिंग सेट बसविला आहे. कोणत्याही आकाराचे शहाळे यामध्ये बसेल अशा रीतीने या वर्तुळाकार रिंगसेटचा व्यास ठेवण्यात आला आहे.
  • वर्तुळाकार रिंगसेटच्या मधोमध ठेवलेल्या शहाळ्यास छिद्र पाडण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पंच वापरला जातो. हा पंच लोखंडी रॉडमध्ये बसविला आहे. या रॉडच्या दुसऱ्या टोकास नटबोल्डने हॅण्डल जोडलेले आहे.
  • पंच जोडलेल्या रॉडच्या बाहेरून स्प्रिंग बसविली आहे, जेणेकरून हॅण्डलने पंचिंग रॉड खाली ओढला असता पंच शहाळ्यास छिद्र पाडेल आणि त्यानंतर आपोआप पूर्ववत ठिकाणी जाईल.
  • शहाळ्यास पंचिंग रॉडने छिद्र पाडल्यानंतर शहाळे पंचसोबत वर उचलले जाऊ नये म्हणून मुख्य सपोर्ट रॉडवर वर्तुळाकार आकाराची इजेक्‍टर रिंग आहे. पंचमध्ये अडकलेल्या शहाळ्यास ही रिंग पंचमधून बाहेर काढण्यात मदत करते.
  • यंत्राचा वापर करून शहाळ्यास छिद्र करता येते. पंच केलेल्या शहाळ्यात स्ट्रॉ टाकून आतील पाणी सहजपणे पिता येते.
  • शहाळ्यातील पाणी पिल्यानंतर आतील मलईदार खोबरे काढता यावे यासाठी मुख्य फ्रेमच्या दुसऱ्या बाजूस शहाळे फोडण्यासाठी धारदार लोखंडी पट्ट्या लावलेल्या आहेत. नारळ सोलणी यंत्राप्रमाणे त्या कार्य करतात.
  • शहाळे लोखंडी पट्ट्यांवर दाबले असता त्याच हॅण्डलने लोखंडी पट्ट्या फाकतात आणि शहाळे फोडले जाते, त्यामुळे त्यातील मलईदार खोबरे काढणे सोपे जाते. त्याचप्रमाणे शहाळ्याऐवजी तयार नारळ असतील तर नारळाची सोडणे याच यंत्राने सोलता येतात.
  • वैशिष्ट्ये आणि फायदे 

  • कमी श्रमात शहाळे फोडणे अत्यंत सोपे. महिला तसेच वयस्क व्यक्तींना यंत्र वापरता येते.
  • यंत्र वापरताना कोणत्याही प्रकारची इजा होण्याची शक्‍यता नाही.
  • एका मिनिटात तीन शहाळी फोडता येतात.
  • यंत्र वजनाने हलके (१६ किलो). वापरण्यास सोपे, आकाराने लहान.
  • एकाच यंत्राने शहाळ्यास छिद्र पाडणे, शहाळे फोडणे आणि तयार नारळ सोलणे ही कामे होतात.
  • यंत्राचा पंच स्टेनलेस स्टीलचा असल्याने गंजत नाही.
  • कोयत्याने शहाळे छाटल्यास त्याचे तुकडे इतरत्र विखरून पडतात, कचरा होतो. यंत्राने शहाळे फोडल्यास कचरा होत नाही.
  • व्यवसायासाठी यंत्र फायदेशीर आहे. यंत्राची संपूर्ण जोडणी नट बोल्ट वापरून केल्याने अंशतः तसेच संपूर्ण यंत्र सुटे करून मोटारसायकल किंवा कारच्या डिकीतून सहज नेता येते.
  • एकच पाना वापरून संपूर्ण यंत्र जोडता आणि सुटे करता येते.
  • संपर्क ः डॉ. एस. बी. पाटील ः ९८२३३८११९१ (पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळेसंदे, जि. कोल्हापूर) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com