नगरला हंगामातील नीचांकी ९.२ अंश तापमानाची नोंद

थंडी
थंडी

पुणे : उत्तरेकडील वाऱ्यांचे प्रवाह सुरळीत झाल्याने मध्य महाराष्ट्र आणि कोकणात किमान तापमान सरासरीच्या खाली उतरले आहे. नगर येथे हंगामातील नीचांकी ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुणे, नाशिक, साताऱ्यात तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरल्याने थंडी वाढली आहे. आजपासून (ता. १२) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, गारठा आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भात दोन-तीन दिवसांपासून पावसाला पोषक हवामान होते. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गोंदियातील आमगाव, देवरी, चंद्रपूरमधील भद्रावती, नगाभिड, गडचिरोलीतील कुरखेडा, गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज वडसा या तालुक्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात अाले. राज्यातील पावसाला पोषक हवामान निवळल्यानंतर आकाश निरभ्र होऊ लागले आहे. तसेच किमान तापमानात घट होऊन, गारठा पुन्हा वाढू लागला आहे. छत्तीसगड आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती असल्याने पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले. तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात गारठा वाढला असून, किमान तापमान पुन्हा सरासरीच्या खाली उतरले आहे. नगर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिक येथे ९.४, पुणे व सातारा ९.५ अंश, तर औरंगाबाद, जळगाव येथे १०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा १ ते ४ अंश, तर कोकणात १ ते ५ अंशांची घट झाली आहे. मंगळवारी (ता. ११) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ९.५ (-३), नगर ९.२ (-३), जळगाव १०.४ (-२), कोल्हापूर १५.४ (०), महाबळेश्‍वर १३.५ (०), मालेगाव १२.२ (१), नाशिक ९.४ (-१), सांगली १२.४ (-२), सातारा ९.५ (-४), सोलापूर १६.८ (१), सांताक्रूझ १६ (-३), अलिबाग १७.९ (-१), रत्नागिरी १५.४ (-५), डहाणू १७.९ (-१), आैरंगाबाद १०.४ (-१), परभणी १४.५ (-३), नांदेड १५ (२), अकोला १३.५ (०), अमरावती १३.३ (-२), बुलडाणा १३.६ (-१), चंद्रपूर २१(८), गोंदिया १५.८ (३), नागपूर १७.७ (५), वर्धा १६.६ (२), यवतमाळ १४.४ (०). कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढतेय बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, मंगळवारी हे क्षेत्र ठळक झाले होते. अाज (ता. १२) या भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. उत्तरेकडे सरकत असलेल्या प्रणालीचे कमी तीव्रतेच्या वादळात (डीप डीप्रेशन) रूपांतर होण्याचे संकेत असून, शुक्रवारपर्यंत (ता. १४) ते दक्षिण अंदमान आणि उत्तर तमिळनाडूकडे येण्याची शक्यता आहे. श्रीलंका आणि तमिळनाडूलगत समुद्र खवळणार असल्याचे मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com