राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६ अंशांवर

हवामान
हवामान

पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान तापमान पुन्हा घसरले आहे. निफाड (जि. नाशिक) येथील गहू संशोधन केंद्रात शनिवारी (ता. १६) राज्यातील नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी पिके, आंब्याचे नुकसान झाले. मंगळवारपर्यंत (ता. १९) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानासह, थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   मागील आठवड्यात आलेल्या कडाक्याच्या थंडीनंतर वातावरणात अचानक बदल होत राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडला. ढगाळ आणि पावसाळी हवामानामुळे आठवडाभर थंडी कमी झाली होती. राज्यात सर्वच ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा १ ते ५ अंशांनी वर गेले होते. मात्र शनिवारी (ता. १६) रात्रीच्या तापमानात घट होत पारा पुन्हा सरासरीच्या खाली घसरला आहे. नाशिक येथे ९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पुणे, नगर येथेही तापमान १० अंशांपर्यंत कमी झाले आहे.    शुक्रवारी (ता. १५) दुपारनंतर गडचिरोली, भंडारा, गोंदियात गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले. या पावसामुळे हरभरा, गहू, जवस, पालेभाज्या या पिकांना फटका बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे ३० मिलिमीटर, राजूरा २० मिलीमीटर, सिंदेवाही, चमूर प्रत्येकी १० मिलीमीटर, गाेंदियातील मोरगाव अर्जुनी येथे १० मिलीमीटर, भंडारा जिल्ह्यातील लाखंदूर येथे १० मिलीमीटर आणि गडचिरोली येथे २० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या नागपूर विभागीय केंद्रातर्फे सांगण्यात आले.  गोंदियातील तिरोडा तालुक्यातील नवेझरी परिसरात बोरांच्या आकाराच्या गारा पडल्या, अर्जुनी मोरगाव तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी गारपिटीसह पाऊस झाला. मोहाडी, करडी, तुमसर, लाखंदूर, साकोली, तालुक्यांत अवकाळी पावसाने आंब्याचा मोहर गळाला, तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागांत वादळी वारा, गारांसह पाऊस पडला. पावसाने गहू, हरभरा व पालेभाज्या पिकांना फटका बसला. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीसह परिसरात गारांचा पाऊस झाला.  शनिवारी (ता. १६) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १०.३(-२.१), नगर १०.२ (-३.७), जळगाव १३.६(-१.३), कोल्हापूर १७.९(१.२), महाबळेश्‍वर १२.०(-२.२), मालेगाव १३.४(०.७), नाशिक ९.४, सांगली १४.५(-१.५), सातारा १२.१(-२.४), सोलापूर १७.७(-०.७), सांताक्रुझ १५.४(-३.१), अलिबाग १६.५(-२.०), रत्नागिरी १६.८(-२.६), डहाणू १५.६(-२.९), आैरंगाबाद १३.५(-१.३), परभणी १८.१ (१.४), नांदेड १६.० (१.०), अकोला १६.६(-०.१), अमरावती १६.८(-०.४), बुलडाणा १५.३ (-१.७), ब्रह्मपुरी १४.९ (-१.३), चंद्रपूर १६.६(-०.९), गोंदिया १७.३(१.३), नागपूर १८.१(१.९), वर्धा १७.८(-०.७), यवतमाळ १७.४(-०.३).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com