थंडीने केळी निर्यात ठप्प

थंडीने केळी निर्यात ठप्प
थंडीने केळी निर्यात ठप्प

जळगाव ः मागील २० ते २२ दिवसांपासून थंडीची लाट कायम आहे. गत बारा दिवस केळीच्या आगारातील म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील किमान तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे. परिणामी निर्यातक्षम केळी उपलब्ध होत नसून, राज्यभरातील केळी निर्यात सध्या ठप्प आहे. आखातामधून रोज किमान एक हजार क्विंटल केळीची मागणी आहे. परंतु हा पुरवठा करण्यास राज्यात केळी खरेदीदार, पुरवठादार असमर्थ ठरत आहेत.  केळीची आखातातील निर्यात ऑक्‍टोबरपर्यंत काही प्रमाणात टेंभूर्णी, अकलूज (जि. सोलापूर) येथून सुरू होती. रोज दोन कंटेनर (एक कंटेनर २० मेट्रिक टन क्षमता) केळी निर्यात आखातात सुरू होती. १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर त्या वेळी निर्यातक्षम केळीला मिळत होता. परंतु नंतर या भागातही निर्यातक्षम केळीचे प्रमाण कमी झाले. केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून या महिन्यात केळीची निर्यात होईल, यासंबंधी तयारी झाली होती. सुमारे चार लाख केळी झाडे फ्रूट केअर तंत्रज्ञानाच्या आधारे रावेर, यावल भागात वाढविण्यात आली असून, ती कापणीवर येत आहेत. रावेरातील तांदलवाडी, हतनूर भागात फ्रूट केअर तंत्रज्ञान राबविलेल्या केळी बागांमध्ये कापणी सुरू आहे. उत्तम व्यवस्थापन असलेल्या केळी बागांमध्ये रोज सुमारे दोन हजार क्विंटल केळी खानदेशातील शहादा, रावेर, यावल व चोपडा भागात उपलब्ध होत आहे. पण थंडीमुळे केळी घडांचा रंग हवा तसा नाही. ते पिकल्यानंतर हवे तसे पिवळे होत नाहीत. निर्यातीसाठी आवश्‍यक ४४ ते ४५ कॅलीबरचा घेर व सुमारे आठ इंची लांबीची केळी उपलब्ध होण्याचे प्रमाण अपवादानेच आहे. त्यामुळे कुठलीही निर्यातदार कंपनी परदेशात किंवा आखातात निर्यात करीत नसल्याची स्थिती आहे.  तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिले असते तर खानदेशातून आजघडीला रोज दोन हजार क्विंटल केळी आखातात निर्यात झाली असती. देशात सध्या आंध्र प्रदेशातून आखातात केळीची निर्यात सुरू असून, तेथील केळी उत्पादकांना प्रतिक्विंटल १२०० ते १२५० रुपये दर मिळत आहेत. तेथून प्रतिदिन तीन-चार कंटेनर केळीची निर्यात आखातात होत आहे. तसेच दिल्लीच्या बाजारातही आंध्र प्रदेशच्या केळीला उठाव आहे. परंतु खानदेश किंवा जळगाव जिल्ह्यातून निर्यात होत नसल्याने या केळीची विक्री उत्तर भारतासह ठाणे, कल्याण भागात करावी लागत असून, दर कमाल १००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळत आहेत. अर्थातच क्विंटलमागे २०० ते २५० रुपये कमी दर मिळत असून, रोज ५० ते ६० लाख रुपयांचा फटका खानदेशातील केळी उत्पादकांना बसत आहे. केळी दरांवरही काहीसा दबाव दिसत आहे.मागील महिनाभरापासून दर १००० रुपये प्रतिक्विंटलवर पोचलेले नसल्याची स्थिती आहे.  मध्यंतरी शहादा (जि. नंदुरबार), रावेर व यावल भागात केळी निर्यातदार कंपन्यांनी केळी बागांची पाहणी करून जानेवारीच्या मध्यापासून केळीची निर्यात करण्याची तयारी केली होती. परंतु थंडीमुळे निर्यात बंद आहे. थंडीमुळे निर्यातीचा हंगाम सुमारे ४५ ते ५० दिवस लांबल्याची माहिती केळी निर्यातदारांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com