तूर, मूग, उडीद दराबाबत आठवडाभरात केंद्राचे धोरण

सोलापूर बाजारसमितीच्या सायंकाळच्या लिलाव उपक्रमाचे उदघाटन नुकतेच झाले.
सोलापूर बाजारसमितीच्या सायंकाळच्या लिलाव उपक्रमाचे उदघाटन नुकतेच झाले.

सोलापूर : तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, हरभरा यांच्या किमान आधारभूत किंमतीबाबत केंद्र सरकारकडून आठवडाभरात नवीन व्यापक धोरण जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोमवारी (ता.६) येथे दिली. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत फळे व भाजीपाल्याचे लिलाव सायंकाळीही होणार आहेत. या उपक्रमाचे उद्‌घाटन पटेल यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर सौ. शोभा बनशेट्टी, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, नानासाहेब देशमुख, विक्रम देशमुख, जगन्नाथ सिंदगी, रेवणसिद्ध आवजे, रियाज बागवान, बाजार समितीचे प्रशासक कुंदन भोळे, सचिव विनोद पाटील आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. 
 
पाशा पटेल म्हणाले, की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामविलास पासवान तसेच कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्यासह विविध खात्याच्या सचिवांची एकत्रित बैठक नुकतीच दिल्लीत झाली. मी स्वतः त्यात सहभागी होतो. त्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, हरभरा यांचे देशातील उत्पादन किती आहे, गरज किती आहे, राज्य सरकारने दराबाबत केलेली शिफारस किती आहे, या सगळ्याचा ताळमेळ घालून केंद्र सरकार हे धोरण आखत आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या पद्धतीने शेतकऱ्यांचा विचार आमचे सरकार करते आहे. सप्टेंबर महिन्यात तूर, मूग आणि उडीद यावरील निर्यातबंदी उठवली आहे. येत्या काही काळात हरभरा आणि मसूर या डाळींवरील निर्यातबंदी उठेल. या निर्णायाने या देशातील शेतकऱ्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळणार आहे. गेल्या वर्षातील चुकलेली घडी दुरुस्त करण्याचे काम या निर्णयाने होईल, अशी टिप्पणीही त्यांनी केली. 
 
शेतीमालाचे काढणीपश्‍चात प्रक्रियेत मोठे आर्थिक नुकसान होते. विशेषतः नाशवंत शेतीमालामध्ये ही मोठी समस्या आहे. वर्षाकाठी सुमारे एक लाख कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान त्याच्या हाताळणीत होते, या सगळ्याचा अभ्यास करण्याचे काम राज्य शासनाने समिती नेमून केले. या समितीमध्ये मी स्वतः आहे. त्यासंबंधीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यावर उपाययोजनेचा अहवाल सरकारला सादर होईल, त्यानंतरही मोठा निर्णय होईल, असेही पटेल म्हणाले. 
 
 महापौर सौ. बनशेट्टी म्हणाल्या, की बाजार समितीमध्ये सायंकाळच्या व्यवहारामुळे शेतकऱ्यांची सोय झाली आहे. यापुढे त्यांना मुक्कामाची गरज भासणार नाही. त्या-त्यादिवशी व्यवहार होणार आहेत. बाजार समितीला महापालिका आवश्‍यक ते सगळे सहकार्य करेल.
 
श्री. पवार म्हणाले, की शेतकरी आणि व्यापारी यांनी मिळून एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याचे हे ठिकाण आहे. यासाठी समन्वय ठेवा, कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नका, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची सोय पाहूनच हा निर्णय घेतला आहे. 
 
प्रास्ताविकात बाजार समितीचे प्रशासक कुंदन भोळे यांनी बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेताना शेतकरी, व्यापाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर सर्वांची सोय यामध्ये पाहूनच हा निर्णय घेतला आहे. राज्यात अशा पद्धतीचा निर्णय केवळ सोलापूर बाजार समितीने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आम्ही घेतोच, पण व्यापाऱ्यांनीही त्यासाठी दक्ष रहावे, असे सांगितले. 
 
या वेळी भाजीपाला संघाचे अध्यक्ष नानासाहेब देशमुख, रियाज बागवान, रेवणसिद्ध आवजे यांचीही भाषणे झाली. सचिव विनोद पाटील यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com