नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या : छगन भुजबळ

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या

नाशिक : राज्यात अवकाळी पाऊस व ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी आमदार छगन भुजबळ यांनी आर्थररोड कारागृहातून लेखी पत्राद्वारे राज्याचे महसूल, मदतकार्य व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

छगन भुजबळ यांनी कारागृहातून दिलेल्या पत्रात म्हटले, मुंबईच्या किनारपट्टीवर धडकलेल्या ओखी चक्रीवादळाचा कोकणासह उत्तर, पश्‍चिम व मध्य महाराष्ट्राला फटका बसला असून, यात अवकाळी पावसामुळे कोट्यवधींची पीकहानी झाली आहे. नाशिक जिल्ह्यात तर सुमारे दीड लाख एकरांवरील द्राक्षबागा अवकाळी पावसासह ढगाळ हवामान व थंडीच्या संकटात सापडल्या असून, या बागांवर डाऊनी, भुरी इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.

सदर वादळाने आलेल्या अवकाळी पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे द्राक्ष, कांदा, मका, कापूस व पालेभाज्या आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आगामी काळात वातावरणात होणाऱ्या बदलामुळे रोगराई पसरून पिकांचे आणखी मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. या सर्व बाबींमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे होण्याची अपेक्षा असताना ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला तरच नुकसानीचे पंचमाने व्हावेत अशी सुधारणा अलीकडेच करण्यात आल्याचे समजते. मात्र ओखी वादळ ही नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देण्याची गरज आहे. या वादळामुळे कोकण किनारपट्टीवरील मासळीसोबतच मच्छीमारांच्या बोटी आणि साहित्याचेसुद्धा नुकसान झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर ऑक्‍टोबर २०१७ मध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com