वऱ्हाडातील गारपीटग्रस्तांना ६२ कोटींची मदत

गारपीटीने नुकसान
गारपीटीने नुकसान
अकोला : फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीची नुकसानभरपाई जाहीर करण्यात अाली असून, वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांना ६२ कोटींची मदत मिळणार अाहे. यात प्रामुख्याने सर्वाधिक ४४ कोटी ६६ लाख रुपयांची भरपाई एकट्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल, तर अवघी दोन कोटी २२ लाखांची भरपाई अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जाहीर झाली अाहे. 
 
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली होती. यात निकषांनुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या सुमारे दोन लाख ९३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीसाठी शासनाने ३१३ कोटी ५८ लाख रुपये जाहीर केले. यात कोरडवाहू, बागायती व फळपिकाच्या बाधित क्षेत्राला मदत मिळेल.
 
गेल्या फेब्रुवारी महिन्यात राज्यात प्रामुख्याने नाशिक, अौरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागात गारपीट झाली होती. यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात गारपिटीचा जोर सर्वाधिक होता. या नुकसानीची भरपाई शेती व फळपिकांना ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसानग्रस्त भागासाठी अाहे.
 
गारपिटीमध्ये अकोला जिल्ह्यात ८५० हेक्टरवरील जिरायती पिकांचे, ४६३ हेक्टरवरील बागायती पिकांचे अाणि ५६६ हेक्टरवरील बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले अाहे. या पिकांच्या नुकसानभरपाईपोटी दोन कोटी २२ लाख १७ हजार रुपयांची मदत जाहीर झाली अाहे. 
 
वऱ्हाडात बुलडाणा जिल्ह्याला सर्वाधिक ४४ कोटी ६६ लाख २६ हजार रुपये मदत मिळणार अाहे. या जिल्ह्यात ३५४६.३९ हेक्टरवरील जिरायती पिकांना, २८,२९७.८८ हेक्टरवरील पिकांना बागायती व २२४९.४० हेक्टरवरील बहुवार्षिक पिकांना गारपिटाचा फटका बसला. वाशीम जिल्ह्यासाठी १५ कोटी १८ लाख रुपयांची मदत अाहे. यात १५ हजार ७९७ हेक्टरवरील जिरायती पिकांसाठी, २३५२.८८ हेक्टरवरील बागायती अाणि ६९१.९९ हेक्टरवरील बहुवार्षिक पिकांना मदत मिळेल.      
 

अकोला जिल्ह्यातील पिकांना गारपिटीचा तडाखा बसलेला असताना प्रशासनाने चुकीची अाकडेवारी वरिष्ठांना सादर केली. त्यामुळेच ही मदत कमी असल्याचा अारोप शेतकऱ्यांमधून होत अाहे. काही तालुक्यांमध्ये गारपीट होऊनही ३३ टक्क्यांची अट मारक ठरली अाहे. यामुळे मदत मिळण्यास अडचण झाली अाहे. 

अशी मिळेल नुकसानभरपाई
बुलडाणा ४४ कोटी ६६ लाख
वाशीम १५ कोटी १८ लाख
अकोला २ कोटी २२ लाख

 

 

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com