साताऱ्यात जलयुक्त शिवार योजनेची ८८ टक्‍के कामे पूर्ण

साताऱ्यात जलयुक्त शिवार योजनेची ८८ टक्‍के कामे पूर्ण
साताऱ्यात जलयुक्त शिवार योजनेची ८८ टक्‍के कामे पूर्ण

सातारा : जलयुक्त शिवार अभियानामुळे गेल्या तीन वर्षांत मृद्‌ व जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. २०१७-१८ मधील २०९ गावांतील ८८ टक्‍के कामे पूर्णत्वाला गेली आहेत. उर्वरित कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत शासनाने दिली आहे.

सरकारने जलयुक्‍त शिवार योजना राबवून दुष्काळी भागातील शिवारात जलक्रांतीची सुरवात केली. प्रारंभी सातारा जिल्ह्याने गतीने कामे करत राज्यात ‘डंका’ पिटला. राजस्थानमध्येही ही योजना राबविण्यासाठी तेथील सरकारने सातारा जिल्ह्याचा आदर्श घेतला. मात्र, मध्यंतरी या योजनेला जिल्ह्यात घरघर लागली.

राजकीय, लोकसहभागाची उदासीनता, अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा यामुळे ‘जलयुक्‍त’मधील कामे कासव गतीने सुरू होती. आता पुन्हा एकदा शासनाने या योजनेकडे लक्ष दिले असून, २०१७-१८ मध्ये या योजनेत निवडलेल्या गावांची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गती घेत कामे पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. २०९ गावांतील ३३६४ कामांना मंजूर करण्यात आली होती. त्यामधील २९५६ कामे पूर्ण झाली आहेत; तर २६५ कामे डिसेंबरअखेर पूर्ण करायाची आहे. यासाठी १४.७० कोटी रुपये खर्च आला आहे. पाझर तलाव, कंपार्टमेंट बंडिंग, सलग समतल चर, शेततळे, वनतळे, अनघड दगडाचे बंधारे, वळण बंधारे, सिमेंट बंधारे, माती नालाबांध, गॅबियन स्ट्रक्‍चर, के. टी. वेअर, साठवण बंधारे, कालवा दुरुस्ती, नाला खोलीकरण, सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, गाळ काढणे, ठिबक तसेच तुषार सिंचन, ओढा जोड प्रकल्प आदी ३७ प्रकारच्या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्याने १३ हजार हेक्‍टर क्षेत्राला त्याचा फायदा होणार आहे.

९१ गावांची निवड २०१८-१९ वर्षाकरिता "जलयुक्‍त''मध्ये जिल्ह्यातील ९१ गावांची निवड केली आहे. त्या गावांतील कामांचा आराखडा तयार केला असून, त्यामध्ये ८२० कामे प्रस्तावित आहेत. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याने ही कामे लवकरच सुरू होतील, अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली.

जलयुक्‍त शिवार अभियानातील कामे अंतिम टप्प्यात असून, २६५ कामे डिसेंबरपूर्वी पूर्ण केली जातील. या योजनेमुळे दुष्काळी भागात जलसंधारणाची कामे होऊन जलसाठा वाढला आहे. परिणामी, टॅंकरची संख्या घटली आहे. -संजय पाटील, उपजिल्हाधिकारी, रोहयो

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com