बीडमध्ये संमिश्र निकाल; सर्वांच्याच पारड्यात भरभरून

 बीड : निकालानंतर कार्यकर्त्यांनी असा जल्लोष केला.
बीड : निकालानंतर कार्यकर्त्यांनी असा जल्लोष केला.

बीड  : जिल्ह्यात ६५५ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी (ता. नऊ) जाहीर झाले. यामध्ये मतदारांनी सर्वच नेत्यांना भरभरून दिल्याचे चित्र आहे.

परळी मतदारसंघात पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गटांना चांगले यश आले. मात्र, गोपीनाथगड असलेल्या पांगरी गावची ग्रामपंचायत राष्ट्रवादीने जिंकली. दोघांनी केलेल्या दाव्यांची बेरीज केली तर दीडशे टक्के निकाल होतो.

बीड मतदारसंघात आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार विनायक मेटे, जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांच्या आघाड्यांनी यश मिळवले. राजुरी या आमदार क्षीरसागरांच्या गावात त्यांच्या पॅनलचा पराभव झाला. तर शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्या गावात त्यांच्या पॅनलचा पराभव झाला. गेवराईत बदामराव पंडित गटासह आमदार अमरसिंह पंडित गटाने चांगले यश मिळवले. आमदार लक्ष्मण पवार समर्थकांचा गट पिछाडीवर गेला. आष्टी मतदारसंघात सुरेश धस यांच्या समर्थकांनी वर्चस्व राखले. तर केज तालुक्यात रमेश आडसकर समर्थकांनी बाजी मारली. माजलगाव मतदारसंघात सोळंके गटाला यश मिळाले. अंबाजोगाईत नंदकिशोर मुंदडा समर्थकांनीही यश मिळवले.

राष्ट्रवादी भवन सुने-सुने जिल्ह्यातील ६५५ ग्रामपंचायतींचा निकाल लागल्यानंतर पक्ष कार्यालये आणि नेत्यांच्या घरासमोर जल्लोष दिसत होता. पण, बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आलिशान कार्यालय ओस पडलेले चित्र होते. बीड मतदारसंघात राष्ट्रवादीला वाली कोण, असा प्रश्न आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपासून या पक्षात बेदिली माजली आहे. पक्षातील एक गट याच पक्षाचे विधिमंडळ नेते आणि बीड मतदारसंघाचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्यावर नेहमी कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागरही अलीकडे राष्ट्रवादीपासून सुरक्षित अंतरावरच आहेत. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर, आमदार विनायक मेटे, संदीप क्षीरसागर यांच्या गटांनी निवडणुका लढवल्या. निकालानंतर या नेत्यांची कार्यालये किंवा घरासमोर जल्लोष सुरू होता. पण, राष्ट्रवादीत बीडला दोन नेते असताना राष्ट्रवादी भवन मात्र ओस होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com