राज्यात 'पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स' नियुक्तीचा घोळ सुरूच

राज्यात 'पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स' नियुक्तीचा घोळ सुरूच
राज्यात 'पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स' नियुक्तीचा घोळ सुरूच

पुणे: शेतीमध्ये जहाल कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी स्वतंत्रपणे ''पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स'' नियुक्त करण्याचा प्रस्ताव लाल फितीत अडकला आहे. ऑपरेटर्सची नियमावली बनविण्याचा घोळ अजूनही सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  जहाल कीटकनाशकांच्या वापरातून दरवर्षी विषबाधेचे प्रकार होतात. विदर्भात काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात बळी गेल्यानंतर सरकारी यंत्रणा जागी झाली. कीटकनाशकांच्या वापराची चौकशी सुरू झाल्यानंतर कायद्यात तरतूद असूनही राज्यात स्वतंत्र ''पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स'' आस्तित्वात नसल्याचे उघड झाले.  ‘‘पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स उपलब्ध करून न दिल्यामुळेच घातक कीटकनाशकांची फवारणी स्वतः करण्याची सवय शेतकरी किंवा मजुरांना लागत गेली. मात्र, तांत्रिक माहितीचा अभाव असल्याने गावपातळीवर कीटकनाशकांची चुकीची हाताळणी होत गेली. कोणतीही कीटकनाशके कशीही फवारली जात असल्यामुळे विषबाधेचे प्रकार वाढत गेल्याचे आढळून आले आहे,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.    ‘‘केंद्र सरकारने कीटकनाशक कायदा १९६८ आणि १९७१ च्या नियमावलीत कीटकनाशकांच्या विषबाधेचा मुद्दा हाताळला गेला आहे. राज्यात स्वतंत्र ‘पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स’ नियुक्त करण्याची तरतूद कायद्यात आहे. या तरतुदीनुसार पाच वर्षांकरिता ‘पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स’चा परवाना देणे अत्यावश्यक होते. राज्यात असे परवाने कधीही न दिल्यामुळे शेतमजूर आणि शेतकऱ्यांना विषाशी खेळावे लागले,’’ अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.  ‘‘पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स’साठी सरकारने परवाना देणे सुरू केल्यास अॅल्युमिनियम फॉस्फाईड, मिथाईल ब्रोमाईड, इथिलिन डीब्रोमाईड किंवा अधिसूचित केलेले कोणतेही घातक रसायन फवारण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकते. कीटकनाशकाचा साठा व वापर याची माहिती शासनाला वेळोवेळी सादर करण्याचे कायदेशीर बंधनदेखील ‘पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स’वर असते. त्यामुळे शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर सुरक्षित फवारणीची सुविधा मिळू शकते,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.  ‘शेतीमधील कीटकनाशक फवारणीची गंभीर समस्या माहीत असूनही ‘पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स’बाबत शासन का गाफिल राहिले याचे आश्चर्य वाटते. रसायनशास्त्रातून विज्ञानाचे पदवीधर असलेल्या आणि राष्ट्रीय वनस्पती संरक्षण प्रशिक्षण संस्थेतून १५ दिवसांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असलेले ‘पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स’ राज्यभर उपलब्ध झाले असते. मात्र, या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न कृषी खात्याने केला नाही,’’ अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या एका शास्त्रज्ञाने दिली.  ‘हार्वेस्टर’प्रमाणेच ‘पेस्टिसाईड स्प्रेअर्स’ दिसणार  पिकाची कापणी करण्याची कामे आता हार्वेस्टरकडून व्यावसायिक पातळीवर होऊ लागली आहेत. त्याच पद्धतीने ‘पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स’ची ‘पेस्टिसाईड स्प्रेअर्स’ भविष्यात शेतात दिसू लागतील. लाल आणि पिवळ्या रंगाची चिन्ह असलेल्या जहाल कीटकनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र परवाना सक्तीचा केल्यास शेतकरी किंवा शेतमजुरांना जहाल कीटकनाशके स्वतः वापरता येणार नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com