एफआरपीवरून ‘सिद्धेश्‍वर’च्या सभेत गोंधळ

एफआरपीवरून ‘सिद्धेश्‍वर’च्या सभेत गोंधळ
एफआरपीवरून ‘सिद्धेश्‍वर’च्या सभेत गोंधळ

सोलापूर : गेल्या वर्षीची एफआरपी थकवल्याच्या मुद्द्यावरून सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी (ता. ३०) मोठा गोंधळ झाला. कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे बोलायला उभे राहताच, अनेक सदस्यांनी उभे राहून एफआरपीबाबत प्रश्‍न विचारायला सुरवात केली. जानेवारी ते मार्चअखेर १२०० रुपये दिले आहेत. उर्वरित १ हजार रुपये महिनाअखेर देऊ, असे ठोस आश्‍वासन दिल्यानंतर सभा सुरळीत सुरू झाली.

कारखान्याची सर्वसाधारण सभा काडादी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पण केवळ एफआरपीच्या मुद्द्याभोवतीच ही सभा फिरली. या वेळी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील, बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे, सिद्धाराम चाकोते, अनिल सिंदगी, शशिकांत तळे, रेवणसिद्ध बनशेट्टी, राजशेखर पाटील, अंबण्णप्पा भंगे, लिंबराज पाटील, अरुण लातुरे, सिद्रामप्पा अब्दुलपूरकर, प्रकाश वानकर, गुरुसिद्ध म्हेत्रे, जाफरताज पटेल, शिवानंद दरेकर, विश्‍वनाथ बिराजदार, दीपक आलुरे उपस्थित होते. दरम्यान मृत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी तीन लाखांच्या नुकसानभरपाईचे धनादेश काडादी यांच्या हस्ते देण्यात आले. कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष कुंभार यांनी विषयांचे वाचन केले.

गेल्या हंगामात सात लाख ४५ हजार ७७४ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले, तर ९.४५ टक्के इतका उतारा मिळाला आणि सभासदांना २२०० रुपयांचा दर दिला. उशिराच्या उसाला ५० ते २०० रुपयांचा जादा दर दिल्याचे काडदी यांनी सांगितले. पण सभासद त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. राहिलेल्या बिलाचे काय, असा त्यांचा प्रश्‍न होता. हळूहळू हा गोंधळ वाढतच गेला. शेवटी आश्‍वासन दिल्यानंतर सभा सुरळीत सुरू झाली.

अब्दुलपूरकर यांनी कारखान्याच्या संचालक मंडळावर जोरदार प्रहार केला. वेळच्या वेळी साखरेची विक्री केली नाही, सभासदांच्या ठेवी परत देण्याचे आश्‍वासन देऊनही मिळत नसल्याबाबत त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळेही काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. पण माजी आमदार पाटील, कृषी सभापती पाटील यांनी हस्तक्षेप करून सभासदांना शांत केल्याने पुढे कामकाज सुरळीत झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com