अमित शहा यांनी पायउतार व्हावे : पृथ्वीराज चव्हाण

 माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलावर कंपनीच्या कर्जाबाबत संशयास्पद व्यवहाराचे आरोप झाले अाहेत. या आरोपांची सीबीआय, ‘ईडी’मार्फत चौकशी करावी. संपूर्ण व्यवहारप्रकरणी निर्दोष सिद्ध होत नाहीत; तोपर्यंत भाजपचे सर्वेसर्वा अमित शहा यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी (ता. ९) केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण यांनी अमित शहा व भाजपवर जोरदार हल्ला चढवला. या वेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की वायर वृत्तसंस्थेच्या वृत्तात कुठेही आरोप करण्यात आलेला नाही. जय शहा यांच्या वकिलांचे मतही बातमीमध्ये दिले आहे. मात्र काँग्रेसचे या प्रकरणी काही आरोप आहेत.

जय शहा यांनी २००४ मध्ये टेंपल इंटरप्राईज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जितेंद्र शहा यांच्यासोबत सुरू केली. २००४ ते २००६ मध्ये कंपनीचा काहीही कारभार झाला नाही. २०१५-१६ मध्ये मात्र कंपनीची उलाढाल ८० कोटी ५० लाख रुपयांवर पोचली. ही वाढ १६००० पट इतकी आहे. केआयएफएस या राजेश खांडवाला यांच्या कंपनीने जय शहा यांना १५ कोटींचे कर्ज कोणतेही तारण न घेता दिले. सेबीने या कंपनीला बंद का करू नये, अशी नोटीसही बजावली होती.

मात्र, जय शहा म्हणताहेत, की हे कर्ज नव्हते तर डिपॉझिट होते. जय शहा यांची एक कुसुम किन्सर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जुलै २०१६ मध्ये स्थापन झाली. यामध्ये जय शहा यांचा ६० टक्के हिस्सा आहे. कंपनीला २ कोटी ६ लाखांचे डिपॉझिट २०१४-१५ मध्ये मिळाले. तर ४ कोटी ९० लाखांचे कर्ज दुसऱ्या अनोळखी कंपनीकडून मिळाले. शहा यांनी रतलाममध्ये पवनऊर्जा प्रकल्प उभा केला आहे. हा १५ कोटी रूपयांचा प्रकल्प आहे.

निरमा कंपनीशी संबंधित बॅंकेने या प्रकल्पाला २५ कोटींचे कर्ज दिले. त्यापोटी कंपनीने फक्त ६ कोटी २० लाखांचे तारण दिले आहे. यात अमित शहा यांची ५ कोटींची मालमत्ता तर यशपाल चुडासामा यांची १ कोटी इतकी होती. या पवनऊर्जा कंपनीला केंद्राच्या कंपनीने तत्कालीन मंत्री पीयूष गोयल यांनी १० कोटी ३५ लाखांचे कर्ज दिले. यामध्ये स्पष्टपणे क्रोनिक कॅपिटलचा भाग आहे.

यात खूप मोठ्या प्रमाणावर संशयास्पद व्यवहार झाले आहेत. याची चौकशी ईडी, सीबीआयने केली पाहिजे. या सगळ्या प्रकाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करायला हवा. यापूर्वी जैन हवालामध्ये अडवाणी, तहलकाप्रकरणी बंगारू लक्ष्मण, तर ‘पूर्ती’मध्ये नितीन गडकरी यांनी राजीनामे दिले होते. तिघेही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. भाजप अध्यक्षांची अशी परंपरा अाहे, असा टोलाही श्री. चव्हाण यांनी या वेळी लगावला.

अमित शहा यांनीदेखील राजीनामा द्यावा. या व्यवहारांची संपूर्ण निष्पक्षपाती चौकशी व्हावी. अरुण जेटली यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करावी, देशातील जनता सरकारकडे उत्तर मागत आहे, असेही श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com