काँग्रेसचा प्रेरणादायी इतिहास आणि उज्ज्वल भविष्य

काँग्रेसचा प्रेरणादायी इतिहास आणि उज्ज्वल भविष्य
काँग्रेसचा प्रेरणादायी इतिहास आणि उज्ज्वल भविष्य

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची सोनिया गांधींची १९ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द यशस्वी ठरली. ही धुरा आता राहुल गांधी यांच्या हाती आली आहे. काँग्रेस पक्षातील या महत्त्वाच्या स्थित्यंतराच्या टप्प्यावर व्यक्त केलेले मनोगत.

काँग्रेस पक्षाच्या १३२ वर्षांच्या इतिहासात प्रत्येक काँग्रेस अध्यक्षांनी पक्षहिताबरोबरच देशहितासाठी भरीव योगदान दिले असून, प्रत्येकाचे जीवन देशासाठी समर्पित राहिले. सर्वाधिक काळ अध्यक्षपदी राहिलेल्या श्रीमती सोनिया गांधी याच परंपरेतील. त्यांनीही आपल्या कार्याने काँग्रेस पक्षाच्या व देशाच्या इतिहासात आपला ठसा उमटवला आहे. शुक्रवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आलेले राहुल गांधी हे सोनिया गांधी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. काँग्रेस पक्ष एका नवीन पर्वात पदार्पण करीत आहे. म्हणूनच आजच्या दिवशी सोनिया गांधी यांच्या १९ वर्षांच्या कारकिर्दीला उजाळा देणे क्रमप्राप्त ठरते. 

सोनिया गांधी यांचा भारताशी संबंध राजीव गांधी यांच्याशी केलेल्या विवाहानंतर आला. देशाकरिता गांधी कुटुंबाने केलेला त्याग, बलिदान व जनतेचे त्यांच्यावर असलेले प्रेम याबाबत सोनियाजी अनभिज्ञ असणे साहजिकच. भारताचे राजकारणही त्यांनी पाहिले नव्हते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर भारतात राहूनही आपल्या कुटुंबाला त्यांनी अधिक महत्त्व दिले; किंबहुना राजकारणाशी संबंध जाणीवपूर्वक टाळला. १९८४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींची भीषण हत्या आणि १९९१मध्ये झालेली राजीव गांधी यांची हत्या यातून राजकारणाबद्दलची नकारात्मक भावना आणखी दृढ झाली.

पुढची सात वर्षे राजकारणात न येण्याच्या निर्णयावर ठाम होत्या. १९९६ पर्यंत काँग्रेस पक्ष सत्तेत होता. पुढच्या दोन वर्षांच्या कालावधीत स्वातंत्र्य संग्रामातून आणि काँग्रेसच्या विचारांतून आलेली सामाजिक समतेची मूल्ये आणि लोकशाहीला न मानणाऱ्या व ज्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस नेतृत्वाने वेळोवेळी लढा दिला, अशा धर्मांध व जातीयवादी शक्तींनी पुन्हा डोके वर काढले होते. काँग्रेसचा पराभव आणि एकंदर मरगळ यातून पक्ष हे आव्हान भविष्यात पेलू शकेल का, अशी परिस्थिती दिसत होती. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता सोनिया गांधींकडे आशेने पाहत होता. त्यातूनच गांधी कुटुंबाच्या देशसेवेच्या परंपरेचे उत्तरदायित्व नजरेस ठेवून, देशाला मजबूत करण्याकरिता काँग्रेसची आवश्‍यकता आणि काँग्रेसच्या मजबुतीकरिता अडचणीच्या काळात गांधी परिवारातील नेतृत्वाची गरज, याची जाणीव ठेवून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. भाषेची अडचण, राजकारणाबद्दल अनभिज्ञता, विदेशात जन्म झाल्याचा आक्षेप घेत सतत झालेली टीका, विखारी प्रचार हे सर्व सहन करीत जनतेशी प्रेमाचे नाते त्यांनी जोडले.

सोनियाजी अध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोऱ्या गेल्या आणि निवडूनही आल्या. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली आणि काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम सुरू केले. १९९६मध्ये काँग्रेसचा पराभव झाला. या पराभवाने त्या खचल्या नाहीत. त्यांनी संघर्ष सुरूच ठेवला. २००४ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाला सत्तेवर आणले. सत्ता आल्यानंतरही जन्माने विदेशी व्यक्ती पंतप्रधान होऊ नये म्हणून भाजपच्या नेत्यांनी प्रचंड विरोध केला; पण काँग्रेसच्या २०० खासदारांची इच्छा असूनही स्वतः सोनिया गांधी यांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकून पंतप्रधानपदाचा त्याग केला. सर्वोच्च पदाचा स्वत:हून त्याग करण्याचे हे एकमेव उदाहरण असेल. समर्थपणे नेतृत्व करून पक्षाला दोनदा सत्तेत आणले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारच्या वर्षाच्या कार्यकाळात देशाची प्रगती झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षा, मनरेगा, लोकपाल, शिक्षणाचा अधिकार, माहिती अधिकार, महिला सुरक्षेकरिता निर्भया कायदा, ७२ हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी असे ऐतिहासिक निर्णय घेतले गेले. काँग्रेसच्या विचारांतून विकासाची सांगड घालताना त्यांना गरिबांबद्दल असलेली कणव आणि संवेदनशीलता सातत्याने दिसली. दहा वर्षांत जवळपास १४ कोटी लोक दारिद्रयरेषेच्या वर आले.

सत्ताधारी पक्ष आणि सरकार यांतील सीमारेषा आखून देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. पक्ष व सरकार यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर देशाचे फार मोठे नुकसान होऊ शकते, ही जाणीव त्यांना होती. राष्ट्रीय सल्लागार समिती ही त्यांनी निर्माण केलेली देशातील पहिली थिंकटॅंक. जी सरकारमध्ये नसलेल्या; पण स्वतंत्र विचार करण्याची कुवत असलेल्या तज्ज्ञांचे एक व्यासपीठ होते. त्याने मार्गदर्शन केले; पण सरकारच्या कामात कधीही ढवळाढवळ केली नाही. उलट यातून पक्ष व सरकारमध्ये सुसंवाद निर्माण झाला. अणुऊर्जा करार किंवा आर्थिक सुधारणांचे नवे धाडसी निर्णय घेताना डॉ. मनमोहनसिंग यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळाले; पण माहिती अधिकार किंवा अन्नसुरक्षा कायदा या गोष्टी राष्ट्रीय सल्लागार समितीच्या शिफारशींनुसार अस्तित्वात आल्या. डॉ. मनमोहनसिंग यांची दोन्ही सरकारे ही आघाडीची सरकारे होती. सोनिया गांधी आघाडीच्या अध्यक्षा होत्या. अणुऊर्जा करारावेळी डाव्यांनी पाठिंबा काढून घेतला त्या वेळी त्या डगमगल्या नाहीत. अन्य वेळीही आघाडीतील पक्षांच्या कुरबुरी, भांडणे त्यांनी मुत्सद्दीपणे हाताळली; पण सरकार स्थिर ठेवले. 

इंदिरा गांधी यांच्या कालावधीपासून चव्हाण आणि गांधी कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. (कै.) डॉ. शंकरराव चव्हाण यांनी इंदिराजी व राजीव गांधी यांच्याबरोबर काम केले. २००८मध्ये मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्यात नेतृत्वपरिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर माझ्यासह अनेक पर्याय असताना सोनिया गांधींनी माझ्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने सोपवली. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात एक कौटुंबिक जिव्हाळा नेहमीच जाणवला. सोनियाजींनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांशी हा जिव्हाळा कायम ठेवला आहे.

राहुल गांधी आज अध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाती घेताना पक्षात चैतन्याचे वातावरण आहे. देशहितासाठी समर्पणाची काँग्रेसची परंपरा त्यांच्या रक्तातच आहे. प्रामाणिकपणा, दिलखुलास व्यक्तिमत्त्व आणि धर्मांध शक्तीना अंगावर घेण्याचा धाडसीपणा त्यांच्याकडे आहे. देशाच्या नवनिर्मितीसाठी आणि समृद्धीसाठी आसुसलेला तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होत आहे. थापेबाजीला हा वर्ग आता कंटाळला आहे. मुख्य म्हणजे एक सामान्य कार्यकर्ता राहून राहुलजींनी भारतीय समाजमनाचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष नव्या उमेदीने झेप घेईल. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाही, सामाजिक मूल्ये अधिकाधिक मजबूत होतील आणि देशाच्या सामाजिक एकतेवर घाला घालणाऱ्या विचारधारेचा बीमोड करण्याकरिता काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीनिशी राहुल गांधींच्या पाठीशी उभा राहील. - अशोक चव्हाण,    प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस पक्ष

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com