नगर जिल्ह्यात कांदा दरात सातत्याने चढउतार

जिल्ह्यामध्ये कांदा दरात सातत्याने चढउतार
जिल्ह्यामध्ये कांदा दरात सातत्याने चढउतार

नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या दरात सातत्याने चढउतार होत आहे. चार दिवसांपूर्वी (रविवारी) राहाता येथील बाजार समितीत पन्नास गोण्या कांद्याला २१०० रुपयांपर्यंतचा दर मिळाला. मात्र, बुधवारी (ता. ४) पारनेर येथील बाजार समितीत मात्र जवळपास पाचशे रुपयांनी कमी दर दिला जात असल्याने शेतकऱ्यांनी संतप्त होऊन लिलाव बंद पाडले. संगमनेर बाजार समितीतही मंगळवारी कमी दर मिळाल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. आवक वाढण्यासाठी मोजक्‍या गोण्यांना जास्ती दर देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याचा आरोप होत आहे.

नगर जिल्ह्यामध्ये मागील वर्षी खरीप, लेट खरीप आणि उन्हाळ कांद्याचे क्षेत्र वाढले. पाणी उपलब्ध असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस व अन्य पिकांच्या जागी उन्हाळ्यात कांद्याला पसंती दिली. त्यामुळे कांद्याचे बऱ्यापैकी उत्पादन निघाले आहे. मात्र, गेल्या सहा ते सात महिन्यांपासून कांद्याला समाधानकारक दर नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा साठवण केली आहे. पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात काहीशी वाढ होत आहे. मागील आठवड्यात राहाता बाजार समितीत अवघ्या पन्नास गोण्यांना २१०० रुपयांपर्यंतचा दर मिळाला असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यामध्ये जवळपास सगळ्याच बाजार समितीत कांद्याची खरेदी केली जाते. नगरला मात्र आवक जास्ती असते. आठवड्यातील साधारण तीन दिवस लिलाव होतात. त्या दिवशी जिल्हाभराचा विचार केला, तर साधारण एक ते दीड लाख गोण्यांची आवक होते.

मोजक्याच गोण्यांना चांगला दर राहात्यात २१०० रुपयांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांत उत्साह पसरला. त्यामुळे चार दिवसांत झालेल्या लिलावात आवक वाढली. मंगळवारी (संगमनेर) बाजार समितीत पस्तीस हजारांपेक्षा जास्ती कांदा गोण्याची आवक झाली. मात्र, लिलावात दर कमी निघाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त होऊन अांदोलन केले. बुधवारी पारनेर बाजार समितीतही तसाच प्रकार घडला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. कांद्याला २ हजारच्या पुढे भाव द्या, तरच लिलाव करा, असे म्हणत शेतकरी आक्रमक झाले. सुमारे एक तास शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. या वेळी बाजार समितीचे सचिव शिवाजी पानसरे, मारुती रेपाळे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र, ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. दरम्यान, सभापती प्रशांत गायकवाड यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून लिलाव पूर्ववत घेण्याची सूचना केली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान केवळ मोजक्‍या गोण्यांना चांगला दर देऊन बाकी कांद्याचे दर पाडले जात आहे. आवक वाढीसाठी ही दिशाभूल होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विष्णू ढवळे यांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com