सहकारमंत्र्यांचा बंगला बेकायदा

सहकारमंत्र्यांचा बंगला बेकायदा
सहकारमंत्र्यांचा बंगला बेकायदा

सोलापूर : राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या होटगी रस्त्यावरील अग्निशामक दलाच्या आरक्षित जागेवरील बंगल्याचे बांधकाम बेकायदा असल्याचा अहवाल सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी उच्च न्यायालयात दिला आहे. त्यामुळे मंत्री देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.  याबाबत माहिती अशी, की देशमुख यांचा बंगला आरक्षित जागेत आहे. या बंगल्याची जमीन महापालिकेच्या अग्निशामक विभाग आणि व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित आहे. देशमुख यांनी २००१ मध्ये बंगल्याच्या बांधकामासाठी परवानगी मागितली होती, पण ही परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर देशमुख यांनी पुढील प्रत्येक बाबीला जबाबदार राहू, असे प्रतिज्ञापत्र दिले. त्या आधारावर महापालिकेने २००४ मध्ये मंत्री देशमुख यांना वनबीएचके बांधकाम करण्यासाठी सशर्त परवाना दिला. पण आज प्रत्यक्षात तिप्पट अधिक बांधकाम करण्यात आले आहे. या सगळ्या मुद्द्यावर महेश चव्हाण यांनी उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे तक्रार केली होती. त्यानुसार न्यायालयाने ३१ मेपर्यंत महापालिकेच्या आयुक्‍तांना यासंबंधी अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर आयुक्त आणि देशमुख कुटुंबीयांची समोरासमोर सुनावणी झाली. शिवाय काही कागदपत्रांचीही पडताळणी झाली. त्यानंतर आयुक्त ढाकणे यांनी त्यांच्या निष्कर्षानुसार हा बंगला बेकायदा असल्याचा अहवाल दिला आहे. तसेच बांधकामाबाबतही काही आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.  ...तर स्वखर्चाने बंगला जमीनदोस्त करेन दरम्यान, या संदर्भात मंत्री सुभाष देशमुख यांनी मात्र ‘‘माझा बंगला हा कायदेशीर आणि नियमानुसार आहे. मी दोषी असल्यास मंत्रिपदावरून दूर होईन, तसेच बंगला बेकायदा असल्यास स्वखर्चाने जमीनदोस्त करेन,’’ असे स्पष्टीकरण दिले आहे. हा महापालिकेचा दोष आहे. रोख पैसे भरून परवाना घेतला आहे, परवान्यानुसारच बांधकाम केले आहे, असेही ते म्हणाले. देशमुखांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : मुंडे बीड : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. जो न्याय एकनाथ खडसेंना दिला, तोच न्याय देशमुखांना लावावा, असेही या वेळी धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. देशमुख यांचा सोलापुरातील बंगला बेकायदेशीर असल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांनी न्यायालयात सादर केला आहे. हे प्रकरण गंभीर असून, बांधकाम जमीनदोस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मागील एक वर्षापासून आम्ही सभागृहात आणि सभागृहाबाहेर हा विषय लावून धरला आहे. आगामी काळातही हा विषय लावून धरणार असून, मुख्यमंत्री आता तरी कारवाई करणार का, की नेहमीप्रमाणे विषयाला बगल देणार? असा सवालही मुंडे यांनी केला आहे.  तसेच, न्यायालयात हा विषय गेला नसता, तर सरकारने कधीच न्याय दिला नसता, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com