भारतीय कापसाला कमी उत्पादकतेचे ग्रहण

भारतीय कापसाला कमी उत्पादकतेचे ग्रहण
भारतीय कापसाला कमी उत्पादकतेचे ग्रहण

जगभरात कापूस हे एक प्रस्थापित नगदी पीक आहे. या पिकावर खूप साऱ्या शेतकऱ्यांचा पिढ्यानपिढ्या विश्वास राहिला आहे. जगातील बहुतेक सर्व प्रमुख कापूस उत्पादक देशांमधील सरकारे शेतकऱ्यांना कापसासाठी विशेष अनुदान आणि मदत देत असतात. चीन आणि अमेरिकेसारख्या महत्त्वाच्या देशांमध्ये तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष दिले जाते. भारतातही अनेक वर्षांपासून कापूस उत्पादकांना मदत केली जाते; परंतु त्याची कार्यप्रणाली वेगळी आहे. आणि त्या मुद्द्यावरच आज विशेष लक्ष देण्याची गरज आहे. भारताची कापसातली कागमिरी फारशी समाधानकारक नाही. इतक्या साऱ्या वर्षांमध्ये मदत आणि कर्जमाफीसाठी लाखो रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांच्या स्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही. भारतात एकूणच कृषी क्षेत्रात आणि विशेषतः कापसाच्या बाबतीत अपेक्षित परिणाम झालेले दिसून येत नाहीत. याचे कारण म्हणजे सरकारचा सगळा भर शेतकऱ्यांच्या तात्कालिक गरजा पूर्ण करणे हा असतो. त्याचीही गरज असतेच. परंतु शेतकऱ्यांना सक्षम करून त्यांना त्यांची प्रगती साधण्यासाठी स्वयंपूर्ण बनवण्याची अधिक आवश्यकता आहे. सरकार आणि वस्त्रोद्योग क्षेत्राचा सगळा फोकस कापसाचे लागवड क्षेत्र वाढविण्यावर राहिला आहे. निःसंशय पेरणीक्षेत्राचा घटक महत्त्वाचाच आहे; परंतु त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाची बाब उत्पादकता आणि गुणवत्ता ही आहे. देशात महाराष्ट्र या एका राज्यात साधारण ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होते. हे क्षेत्र चीनमधील एकूण कापूस लागवडीची बरोबरी करणारे आहे. परंतु चीनमध्ये कापसाची उत्पादकता प्रतिहेक्टर १५०० क्विंटल इतकी प्रचंड आहे. चीनची कापूस उत्पादकता भारतातील एकूण कापूस उत्पादनाच्या तिप्पट आहे. त्यामुळे चीनमध्ये महाराष्ट्राइतके कापूस लागवड क्षेत्र असताना उत्पादन मात्र संपूर्ण भारतातील कापूस उत्पादनाइतके आहे. याचा अर्थ, भारतातने जर चीनइतकी उत्पादकता गाठली तर भारतात चीनच्या तिप्पट कापूस उत्पादन होऊ शकते किंवा एकटा महाराष्ट्र कापूस उत्पादनात चीनची बरोबरी करू शकतो. त्यासाठी आपला फोकस कापसाच्या लागवड क्षेत्रावरून उत्पादकता वाढविण्यावर वळवला पाहिजे. गेल्या वर्षी भारतातील कापूस उत्पादकता घटल्याचे आढळून आले. त्याचे मुख्य कारण म्हणजे कापसाच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा झालेला हल्ला. या बोंड अळीमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणातील कापूस उत्पादकता आणि उत्पादनावर मोठा परिणाम झाला. कापसाची लागवड १२२ लाख हेक्टर क्षेत्रावर झालेली होती, त्या हिशेबाने ४०० लाख गाठी कापूस उत्पादन होणे अपेक्षित होते. परंतु बोंड अळीमुळे प्रत्यक्षात ३६५ लाख गाठी कापूस उत्पादन झाले. यंदाच्या हंगामात विदर्भात कापसावर बोंड अळी, मिलिबग, बुरशी, तुडतुडे आणि आणखी एका नव्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. कॉटनगुरूच्या प्रकल्पाशी संबंधित असलेले प्रगतिशील शेतकरी अमृतराव देशमुख यांनी इतर बाधित शेतकऱ्यांना घेऊन केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे यांची भेट घेतली आणि त्यांना सडलेली रोगग्रस्त कापसाची बोंडे दाखवून या रोगाचे निदान व तपास करण्याची मागणी केली. डॉ. वाघमारे यांनी आठ दिवसांनंतर यासंबंधीचा निर्णय घेऊ, असे शेतकऱ्यांना सांगितले. हा बोंड अळीचा प्रादुर्भाव नसून अज्ञात रोगाचा हा प्रकार आहे, ही बाब डॉ. वाघामारे सुरवातीला मान्यच करायला तयार नव्हते. शेतकऱ्यांनी त्यानंतर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. सी. डी. मायी यांची भेट घेतली. डॉ. मायी यांनी रोगग्रस्त कापूस बोंडे पाहून ही बोंड अळी नसल्याचा निर्वाळा दिला.  हे सर्व तपशीलवार सांगायचा उद्देश हा, की शेतीशी संबंधित कोणत्याही बाबींवर शेतकऱ्यांचे मत विचारात घेणे अत्यंत जरूरीचे आहे. शेतीमधल्या नेमक्या अडचणी कोणत्या, याचे व्यावहारिक निवारण करणे गरजेचे आहे. दुसऱ्या देशांनी हा दृष्टिकोन स्वीकारल्यामुळेच तेथील उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न यात आपल्या तुलनेत मोठा फरक दिसतो. देशांतर्गत रुई बाजारात कापसाचा बाजार नरम आहे. हजर बाजारात गुजरात शंकर-६ वाणाचे भाव ४७ हजार ५०० ते ४८ हजार ५०० रुपयांच्या घरात आहेत. महाराष्ट्रात २९ मिमी धाग्याच्या रुईचे भाव ४७ हजार ५०० ते ४८ हजार रुपये इतके आहेत. गिरण्यांच्या गरजेनुसार कापसाची खरेदी होत आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत होऊनही निर्यातदार शांत आहेत. ते कदाचित नवीन हंगामाच्या तयारीत असावेत. सूत आणि कापडाचा उठाव कमी असल्यामुळे पेमेंटच्या अडचणी कायम आहेत. आंतरराष्ट्रीय रुई बाजारात दरपातळी स्थिर आहे. अमेरिकेचे चीन, तुर्कस्थान, इराण आणि भारताशी सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे बाजारात नरमाईचे वातावरण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विदेशनीतीचा परिणाम म्हणून व्यापारात अनेक अडथळे येत आहेत. या परिस्थितीवर लवकरच तोडगा निघेल, अशी आशा आहे. थोडक्यात सरकार आणि मॉन्सूनचा कापूस बाजारावर प्रभाव कायम आहे. (लेखक कापूस बाजार विश्लेषक असून `कॉटनगुरू`चे प्रमुख आहेत.)   ः www.cottonguru.org

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com