कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार

कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार

जळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र राज्यात रिकामे केले जात आहे. याच वेळी अवर्षणप्रवण स्थितीचा फटका दोन प्रमुख कापूस उत्पादक राज्यांना बसल्याने देशांतर्गत उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत २५ लाख गाठींनी (एक गाठ १७० किलो रुई) कमी होणार आहे. याच वेळी देशांतर्गत बाजारात मिल, मिलांव्यतिरिक्त (नॉन मिल) व लघुउद्योगांची (एसएसआय) मागणी (कन्झमशन) मिळून यंदा ३५० लाख गाठींची आहे. यामुळे देशातील निर्यात मागील हंगामाच्या तुलनेत कमी होईल, असे संकेत आहेत.  मागील हंगामात (१ ऑक्‍टोबर २०१७ ते ३० सप्टेंबर २०१८) ६७ लाख गाठींची निर्यात झाली. यंदाच्या हंगामात निर्यात सुमारे ५५ ते ५६ लाख गाठी एवढी होईल. कारण स्थानिक गरज किंवा मागणीदेखील पूर्ण करायची आहे. तेलंगण, महाराष्ट्र या आघाडीच्या कापूस उत्पादक राज्यांसह कर्नाटकात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव या महिन्यात झाला आहे. यामुळे पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र झपाट्याने रिकामे होईल. राज्यात ८५ ते ९० लाख, तर आंध्र प्रदेश व तेलंगणात मिळून सुमारे ३८ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता. पण, हा अंदाज आता चुकणार आहे. देशात यंदा तीन टक्‍क्‍यांनी कापसाची मागणी वाढली आहे. रुपयाचे अवमूल्यन वर्षभर सुरूच आहे. यात आयात मिलांना परवडणारी नाही. निर्यातीला संधी आहे. कारण बांगलादेश १०४ लाख गाठींची आयात करणार आहे. तर, व्हिएतनाम ९६ लाख गाठींची आयात जगातील विविध देशांमधून करणार आहे. बांगलादेशसह व्हिएतनाममध्ये देशातून किमान ६० ते ६५ लाख गाठींची निर्यात होऊ शकते. देशात यंदा ३४० ते ३४७ लाख गाठींचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. देशांतर्गत बाजारात उठाव वाढू लागला आहे. कारण दिवाळीनंतर उत्तरेकडील वस्त्रोद्योग कार्यरत झाला आहे. यामुळे कापूस दरात मागील १५ दिवसांत सुधारणा झाली असून, राज्यात पहिल्या कापसाला किमान ५८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. दिवाळीपूर्वी बाजारात फारशा हालचाली नव्हत्या. दर स्थिर होते. तसेच, यंदा आयातही मागील हंगामाच्या तुलनेत तीन लाख गाठींनी घटून १९ लाख गाठी ऑस्ट्रेलिया, अमेरिकेतून देशात येतील. देशात न पिकणाऱ्या पिमा व गिझा प्रकारच्या कापसाचीच आयात यंदा होईल, असे सांगण्यात आले.  अमेरिकेत उत्पादनात घट भारताप्रमाणे अमेरिकेतही कापूस उत्पादनात मोठी घट येणार आहे. तेथे मागील हंगामात २६८ लाख गाठींचे उत्पादन झाले होते. यंदा तेथे २३६ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज आहे. अमेरिकेतील निर्यातही यंदा ११ लाख गाठींनी कमी होईल. कारण टेक्‍सास प्रांतात यंदा कापूस लागवडीला अवर्षणप्रवण स्थितीचा फटका बसला. तसेच, सप्टेंबरमध्ये पिकाला वादळाचाही फटका बसला. यामुळे आंतरराष्ट्रीय कापूस बाजार स्थिरावला आहे. तर, देशांतर्गत बाजार सावरला आहे.  पाकिस्तानचे चलन कमकुमत, आयात घटविणार पाकिस्तानचे चलन रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाले आहे. पाकिस्तानला एक डॉलर १२६ रुपयांना मिळत आहे. परिणामी, पाकिस्तानला आयात महाग पडत असून, मागील हंगामाच्या तुलनेत पाकिस्तान आयात कमी करणार आहे. तेथे मागील हंगामात ४२ लाख गाठींची आयात झाली होती. या हंगामात पाकिस्तान अखेरपर्यंत ३३ लाख गाठींची आयात करणार आहे, अशी माहिती जाणकारांनी दिली.   

देशातील कापसाचा ताळेबंद (लाख गाठींमध्ये)

मिल्सची (सूतगिरण्या) गरज ३०३ 
लघु उद्योग (एसएसआय) ३०
मिल्सव्यतिरिक्त (नॉन मिल) असलेली गरज २१
निर्यात ५५ ते ६० (अंदाजित) 
आयात १९

कापूस बाजार स्थिर आहे. कारण अमेरिकेतील निर्यात कमी होताना दिसत आहे. जगात अमेरिका, भारतात उत्पादन कमी होताना दिसत आहे. पिकाचा दुसरा हंगाम (फरडद) अवर्षण प्रवण स्थितीने बाधित झाला आहे. दुसऱ्या बाजूला देशांतर्गत कापसाची मागणी यंदा मागील हंगामाच्या तुलनेत वाढली आहे.  - अनिल सोमाणी,  सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com