बोंड अळीचा जिनिंगलाही फटका

बोंड अळीचा जिनिंगलाही फटका
बोंड अळीचा जिनिंगलाही फटका

कमी कापूस उत्पादनाने उद्योग सावध जळगाव : कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचा फटका राज्यातील जिनिंग उद्योगाला बसत अाहे. हंगामादरम्यान अपेक्षित उत्पादन अाणि बोंड अळीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे उद्योगाचे अंदाजही चुकू लागले आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर कापूस उत्पादक गुजरात, आंध्र, पंजाब, मध्य प्रदेश आदी राज्यातही बोंड अळीने कापूस क्षेत्र प्रभावित झाले आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) केंद्रीय कृषी मंत्रालयास साकडे घालणार आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) असोसिएशनचे सदस्य अरविंद जैन यांनी ॲग्रोवनला याबाबत माहिती दिली. श्री. जैन म्हणाले, की गुलाबी बोंड अळीचा फटका जिनिंग उद्योग, कापूस व्यावसायिक यांनाही बसू लागला आहे. त्यात कपाशीचा तुटवडा जाणवू लागल्याने खानदेशात मागील तीन दिवसांत कपाशीचे दर क्विंटलमागे तब्बल ४०० ते ४५० रुपयांनी वाढले आहेत. यातच गुलाबी बोंड अळीला प्रतिकार व्हावा, यासाठी थ्री जीएम तंत्रज्ञान देशभर लागू केले जावे, बोलगार्ड २ च्या पुढील तंत्रज्ञान आत्मसात केले जावे. संबंधित संशोधन करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन दिले जावे यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या प्रतिनिधींना भेटणार आहे.

खानदेशात आठ लाख हेक्‍टरवर कपाशीचे पीक असले तरी गुलाबी बोंड अळीमुळे पूर्वहंगामी कपाशीखालील एक लाख हेक्‍टर पेक्षा अधिक क्षेत्र रिकामे झाले आहे. तर कोरडवाहू कपाशीचीही सिंचनाअभावी दैना आहे. मुरमाड जमिनीत कपाशीचे पीक माना टाकत आहे. उत्पादन निम्मे घटणार, असे संकेत मिळताच जिनिंग उद्योगासह व्यापारीही सावध झाले. त्याच वेळी कपाशीचे दर वाढू लागले. मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांत कपाशीचे दर क्विंटलमागे ३५० ते ४०० रुपयांनी वाढले. पहिल्या तीन चार वेचणीच्या कपाशीला ४७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर आहेत. तर कमी दर्जाच्या (अळीयुक्त बोंडे, लालसर कापूस) कपाशीला किमान ४१०० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. गुजरातमधील जिनर्सनीदेखील खरेदीचा सपाटा सुरू केला असून, खेडा खरेदी वेगात सुरू आहे. किमान ४७०० ते ४७५० रुपये प्रतिक्विंटलचा दर कापूस उत्पादकांना गावात मिळत आहे.   ‘महाकॉट’चे नियोजनही कोलमडले खानदेशातील ८० ते ८२ जिनर्स दरवर्षी महाकॉट ब्रँडच्या १९ ते २१ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्मिती करायचे. पण यंदा जिनिंगमध्ये कपाशीची आवक कमी आहे. त्यात गुजरातेत कापूस निर्यात अधिक होत असल्याने जिनिंग उद्योगच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. काही जिनर्सवर आपल्या दोन जिनिंगऐवजी एकच सुरू ठेवण्याची वेळ आली आहे. अशात महाकॉटच्या फक्त ११ ते १२ लाख गाठी तयार होतील, असे खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी सांगितले. कॉटन असोसिएशनचा अंदाजही बदलला देशात ४ कोटी गाठींचे उत्पादन होईल, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने मागील महिन्यात बांधला होता. परंतु आता गुलाबी बोंड अळी देशभर आहे. कापूस उद्‌ध्वस्त होत असल्याने उत्पादन ३१५ लाख गाठींपर्यंत येऊ शकते. बीटी कपाशीचे बोलगार्ड २ तंत्रज्ञान १० वर्षांपासून असून, ते गुलाबी बोंड अळीला प्रतिकार करू शकत नाही. नवे तंत्रज्ञान यावे यासाठी असोसिएशनने प्रयत्न सुरू केले असल्याचे श्री. जैन यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com