`ब्रॅंड मूल्यवृद्धीसाठी हवा स्वच्छ कापूस, पॅकिंगवर भर`

मूल्यवृद्धीसाठी शेतीपासून स्पिनिंगपर्यंत स्वच्छ कापूस जायला हवा. मार्केट कर कमी करण्याची मागणी आपण मंत्र्यांकडे केली. शासन शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरावर भर देत आहे.ड्रोनद्‌वारे पिकांचे क्षेत्र, सर्वेक्षण, फवारणीचे प्रयोग सुरू आहेत. कापूस उत्पादक शेतकरी कंपन्या व्हायला हव्यात. त्यांना अर्थपुरवठाही आवश्यक आहे. - पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषीमुल्य आयोग
औरंगाबाद येथे कापूस परिषद
औरंगाबाद येथे कापूस परिषद

औरंगाबाद  : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्तापूर्ण असलेल्या देशातील कापसाच्या ब्रॅंडची मूल्यवृद्धी करण्यासाठी स्वच्छ कापसासह पॅकिंगवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. त्यासाठीची तयारी औरंगाबाद येथे पार पडलेल्या दोनदिवसीय कापूस परिषदेत दाखविली गेली. औरंगाबादेत ५ व ६ ऑक्‍टोबर दरम्यान `कापूस परिषद २०१८' पार पडली. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) जिनर्स असोसिएशनच्या सहयोगातून या परिषदेचे आयोजन केले होते.  परिषदेला ‘सीएआय’चे अध्यक्ष अतुल गणात्रा, ‘सीएआय’चे उपाध्यक्ष व महाराष्ट्र कॉटन जीनर्स असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्रसिंग राजपाल, ट्रेडींग मॅनेजर रमन भल्ला, कॉटन फेडरेशन ऑफ इंडीयाचे डॉ. पी. अली इरानी, कोटक गृपचे संचालक सुरेश कोटक, ‘बीएसई’चे समीर पाटील, गुजरात स्पीनर्स असोशीएशनचे डॉ. भारत बोघरा, आयएमसी-ईआरटीएफ चे संचालक जी. चंद्रशेखर, बिरेन वकील उपस्थित होते.

देशभरातील एक हजारांवर कापूस उद्योगाशी जोडल्या गेलेल्या विविध घटकांनी या परिषदेत सहभाग नोंदविला. दोन दिवस चाललेल्या परिषदेच्या समारोपीय सत्राला शनिवारी (ता. ६) राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची विशेष उपस्थिती होती.

दोन दिवस चाललेल्या या परिषदेत राज्य व देशांतर्गत कापूस उत्पादकता, उत्पादित कापसाच्या दर्जात्मक सुधारणेसंदर्भातील बाबी, शेतकरी आणि जीनर्सच्या समन्वयातून उत्पादकांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविण्यासोबतच त्याचे उत्पन्न वाढविण्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजना, देशांतर्गत उत्पादित कापसाच्या गुणवत्तेची आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रॅंडिंग करण्यात येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय, जीनर्सच्या अडचणी, बॅंकिंग, वेअर हाउसच्या संदर्भातील विषय, यंदाच्या हंगामात राज्य व देशात कापसाची नेमकी किती उत्पादकता राहील आदींविषयी चिंतन झाले.

झाडावर असलेला स्वच्छ कापूस धागा निर्मितीपर्यंत त्याच स्वच्छतेने पोचण्यासाठी वेचणीपासून एकूणच प्रक्रियेत सुधारणा होण्यासाठी प्रयत्नाची समन्वयातून सुरवात करण्याचा संकल्प परिषदेत केला गेला. कापूस उद्योगाशी संबंधित विविध प्रतिनिधींनी जवळपास पंधरा विषयांत देशातील उत्पादित कापसाची ब्रॅंड व्ह्यल्यू कशी वाढवावी याविषयी आपले विचार मांडले. निर्यातक्षम कापसाची तपासणी आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय राखणारी असावी असा विचार या परिषदेत मांडल्या गेला.

जवळपास सात पॅनलमध्ये प्रत्येकी सात ते आठ प्रतिनिधींच्या सहभागातून विविध विषयांवर समूह चर्चा झाली. जवळपास आठ प्रमुख व्यक्‍तींनी आपल्या विचार परिषदेच्या माध्यमातून मांडले. दर्जेदार कापसासाठी काम करणाऱ्या जवळपास आठ ते नऊ जिनर्सचा या वेळी सत्कार करण्यात आला.

जीनर्सनी शेतकऱ्यांच्या समन्वयातून नेमके कसे काम करायला हवे. उत्पादन खर्च कमी करून दर्जेदार कापूस उत्पादन कसे करावे याविषयी शेतकऱ्यांना कसे प्रशिक्षण देता येईल याविषयी विचार मांडण्याची संधी कापूस परिषदेमुळे मिळाली, असे महाराष्ट्र कॉटन जिनर्स असोसिएशनचे कोषाध्यक्ष राजदीप चावला  यांनी सांगितले.

गुणवत्ता असूनही केवळ अनावधानाने होणाऱ्या चुकांमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कापसाची मूल्यवृद्धी होत नसल्याचे दिसते. त्याची दक्षता घेतल्यास मूल्यवृद्धी सहज शक्‍य आहे, असे सीएआयचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र कॉटन जीनर्स असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्रसिंग राजपाल यांनी सांगितले.

कापूस स्वच्छतेविषयी प्रशिक्षण देण्याची तयारी टप्प्याटप्प्याने वेचणीची पद्धत अवलंबिल्या जाणारा भारतातील कापूस गुणवत्तेचा आहे. परंतु वेचणीनंतर अनावधाने मिसळले जाणारे केस, प्लास्‍टिक आदी बाबींमुळे गुणवत्तापूर्ण कापसाचा दर्जा बिघडतो. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅंकिगमध्येही सुधारणेची गरज आहे. त्यामुळे कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्याची बाब या परिषदेत अधोरेखित करण्यात आली. कापसाच्या उत्पादकता व दर्जा आणखी कसा सुधारता येईल, दर्जेदार कापूस उत्पादनाची गरज, उत्पादन खर्च कमी करून स्वच्छ, दर्जेदार कापूस उत्पादन घेण्याविषयी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी सीएआयने दाखविली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com