संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात ३९ लाख हेक्‍टरवर कापूस लागवड शक्‍य

कापूस किंवा गाठींचे उत्पादन गुजरात अधिक घेतो. महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असतो. लागवडीसंबंधी तपशील पाहिला तर लागवड ही महाराष्ट्र, तेलंगण, कर्नाटक व उत्तरेकडील काही भागांत कमी होईल, असे दिसते. गुजरातमधून १०५ लाख गाठींचे उत्पादन मिळेलच, असे मला वाटते. परंतु इतर राज्यांमध्ये, देशांमध्ये लागवड कमी झाल्याचे समोर येत असल्याने देशाच्या व जागतिक उत्पादनावर त्याचा परिणाम होईल, असे दिसते. गुलाबी बोंड अळीची स्थिती, मॉन्सूनवरही अनेक बाबी अवलंबून आहेत. - अरविंद जैन, माजी सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

जळगाव ः देशात कापूस लागवडीत यंदा घट निश्‍चित असून, सुमारे ११० ते ११२ लाख हेक्‍टरवर लागवड होईल, असा अंदाज आहे. महाराष्ट्रात यंदा जवळपास दोन ते अडीच लाख हेक्‍टरने कापसाखालील क्षेत्र कमी होईल, अशी स्थिती आहे. सध्या उत्तरेकडे मॉन्सून सक्रिय असून, तेथे लागवड सुरू आहे. परंतु प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमधील पूर्वहंगामी कापूस उत्पादक शेतकरी कापसाऐवजी इतर पिकांकडे वळल्याने लागवडीत घट निश्‍चित मानली आहे.

मागील हंगामात (२०१७-१८) देशात १२२.३५ लाख हेक्‍टरवर कापूस लागवड झाली होती. महाराष्ट्रात सर्वाधिक ४१ लाख ९८ हजार हेक्‍टरवर कापूस लागवड झाली होती. यापाठोपाठ गुजरातेत २६ लाख १८ हजार, तेलंगणात १८ लाख २४ हजार हेक्‍टवर लागवड झाली होती. परंतु बोंड अळीचा धसका हंगामाच्या अखेरपर्यंत राहिला. शासकीय यंत्रणा, बियाणे उत्पादक अशा कुणाकडूनच बोंड अळी पुढील हंगामात येणार नाही, अशी ग्वाही न मिळाल्याने पूर्वहंगामी कापूस उत्पादक किंवा ज्यांच्याकडे मुबलक कृत्रिम जलसाठे आहेत, अशा शेतकऱ्यांनी कमी कालावधीची पिके, ऊस, फळ पिके, केळी आदींना प्राधान्य दिले.

हरियाना, पंजाबमध्ये धरणांमधून हव्या त्या वेळी सिंचनासाठी पाणी न मिळाल्याने तेथेही पूर्वहंगामी कापूस लागवड कमी झाली आहे. अर्थातच देशात पूर्वहंगामी कापसाखालील जवळपास चार ते साडेचार लाख हेक्‍टर क्षेत्र कमी होईल, असे मानले जात आहे. ज्यांच्याकडे कापूस पिकाला पर्याय नव्हता, त्यांनी लागवड केली आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत ३७ लाख हेक्‍टरवर पेरणी झाल्याचा अहवाल आहेत. राज्यातील क्षेत्र ३९ लाख हेक्‍टपुढे जाणार नाही, अशी स्थिती आहे. कारण जुलैनंतर लागवड कुठेही केली जात नाही. उत्तरेकडे राजस्थान, पंजाब, हरियानात लागवड अंतिम टप्प्यात आहे, तेथील लागवडीसंबंधीची माहिती येत्या आठवड्यात नेमकेपणाने पुढे येऊ शकते. पंजाब, हरियाना, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेशात लागवड अधिक कमी असेल. परंतु लागवड निश्‍चित कमी होईल, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाशी संबंधित सूत्रांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्त केला आहे.

देशात पूर्वहंगामी कापूस लागवडच कमी दिसत असल्याने उत्पादन कमी होईल. ते ३४२ ते ३४८ लाख गाठींदरम्यान (एक गाठ १७० किलो रुई) असू शकते. यातच महाराष्ट्रात बोंड अळी प्रादुर्भावाच्या तक्रारी पुन्हा एकदा येऊ लागल्या आहेत. मॉन्सून कसा बरसतो, यावर कोरडवाहू कापसाचे भवितव्य अवलंबून आहे. अशा सगळ्या नकारात्मक स्थितीत यंदा कापसाचे पीक तूर्त तरी आहे.

जागतिक स्तरावर सर्वांत मोठा कापूस निर्यातदार देश असलेल्या अमेरिकेतही (यूएस) कापूस लागवड घटली आहे. चीनमध्येही लागवड काहीशी कमी झाली आहे. पाकिस्तानातील पंजाब, सिंध भागात कापूस पिकाला पाण्याचे संकट भोवले आहे. अमेरिकेत मागील हंगामात ३८ लाख हेक्‍टरवर लागवड झाली होती. तेथील टेक्‍सास प्रांताला अधिक तापमानाचा फटका बसल्याने जवळपास एक लाख हेक्‍टर क्षेत्र तेथे कमी होऊ शकते.

चीनमध्ये २९ लाख हेक्‍टरवर लागवड झाली होती. तेथेही जिझियांग या कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या प्रांतासह यंगत्से नदीच्या खोऱ्यातील भागात कापसाचे पीक हवे तसे नसल्याची माहिती कापूस जगतात येत आहे. पाकिस्तानात २४ लाख हेक्‍टरवर कापूस लागवड मागील हंगामात झाली होती. तेथेही पूर्वहंगामी म्हणजेच मार्चमधील कापूस लागवड कमी झाली असून, एक ते सव्वा लाख हेक्‍टर क्षेत्र तेथे कमी होऊ शकते. जगभरात २९३ लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवड अपेक्षित असते. एवढी लागवड यंदा होणार नाही. कारण भारत, चीन, अमेरिका, पाकिस्तानसारख्या प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये कापूस पिकाला फटका बसल्याची माहिती मिळत आहे.  

देशातील कापूस लागवड दृष्टिक्षेपात (क्षेत्र लाख हेक्‍टरमध्ये)

(माहिती स्रोत ः कापूस सल्लागार मंडळ)

राज्य २०१६-१७  २०१७-१८
पंजाब २.८५   ३.८५
हरियाना  ५.७० ६.५६
राजस्थान ४.७१  ५.०३
गुजरात २४.०५ २६.१८
महाराष्ट्र  ३८.०० ४१.९८
मध्य प्रदेश ५.९९ ५.९९
तेलंगणा  १४.०९  १८.२४
आंध्र प्रदेश ४.७१ ५.४४
कर्नाटक   ५.०७ ५.६५
तमिळनाडू   १.४२  १.४८
ओडिशा  १.३६ १.४५
इतर ०.५०  ०.५०
एकूण   १०८.४५ १२२.३५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com