औरंगाबादला आढावा बैठकीतच शेतकऱ्यांचा हल्लाबोल

आढावा बैठकीतच शेतकऱ्यांचा हल्लाबोल
आढावा बैठकीतच शेतकऱ्यांचा हल्लाबोल

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील रामेतीच्या सभागृहात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची विभागीय आढावा बैठक सुरू असताना बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या गंगापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मागण्यांच्या निवेदनासह रामेतीवर धडक दिली. सुरवातीला निवेदन व त्यानंतर ठोस उत्तर मिळत नसल्याचे पाहून आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी अचानक चक्‍क अंगावर रॉकेल ओतून घेतल्याने चांगलीच खळबळ उडाली. उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. त्यांना त्यांची मागणी कृषी आयुक्‍तांकडे तत्काळ कळविल्याचे लेखी दिल्यानंतरच शेतकऱ्यांचे समाधान झाले. या प्रकारामुळे बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता किती गंभीर झाली आहे, हे अधोरेखित झाले आहे.  औरंगाबादमधील रामेतीच्या सभागृहात शुक्रवारी (ता. २४) फलोत्पादन संचालक पी. एन. पोकळे यांच्या उपस्थितीत विभागीय आढावा बैठक सुरू होती. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास गंगापूर तालुक्‍यातील वजनापूर येथील शेंदरी बोंडअळीमुळे कपाशीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी थेट या बैठकीच्या स्थळी आपल्या मागण्यांच्या निवेदनासह धडक दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील बोंडअळी बाधित संपूर्ण कपाशी क्षेत्राचे सरसकट पंचनामे घेऊन हेक्‍टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी श्री. पोकळे यांच्यासह कृषी विभागाच्या अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, विभागीय कृषी सहसंचालक प्रतापसिंह कदम यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.   

शासनाच्या आदेशाचा दाखला देऊन जी नमुन्यामध्ये तक्रार अर्ज भरून घेण्याचा प्रकार म्हणजे शेतकरी व बीटी कंपन्यांमध्ये वाद लावण्याचा प्रकार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनातून केला आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये केवळ वेळ वाया जाणार असून, हाती काहीच पडणार नाही. या वेळकाढूपणामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानाचे सरसकट पंचनामे करून हेक्‍टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यानंतर अचानक आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. शेतकऱ्यांच्या या अचानक घेतलेल्या पवित्र्यामुळे एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. जोवर आमच्या मागण्यासंदर्भात लेखी दिले जात नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितला. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनिशी शेतकऱ्यांच्या मागण्या कृषी आयुक्‍तांकडे पुढील कार्यवाहिस्तव सादर केल्याचे लेखी देण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांचे समाधान झाल्याने आंदोलन स्थगित झाले. 

दरम्यान पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. आता कृषी विभागाने लेखी दिले असले तरी जोवर झालेल्या नुकसानासंदर्भात शासन धोरणात्मक निर्णय घेऊन न्याय देत नाही, तोवर प्रसंगानुरूप आंदोलनाची धार तीव्र करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती संतोष पाटील जाधव यांनी दिला. शेतकरी पोपट चव्हाण, विठ्ठल चव्हाण, संजय चव्हाण, आबासाहेब चव्हाण, गोरखनाथ चव्हाण, अण्णासाहेब चव्हाण आदीं शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.  रामेतीच्या प्रवेशद्वाराला बांधले बोंडांचे तोरण आपल्या मागण्यांसाठी अधिकाऱ्यांच्या बैठकीवर धडक देणाऱ्या शेतकऱ्यांनी रामेतीच्या प्रवेशद्वाराला शेंदरी बोंडअळीने नुकसान केलेल्या बोंडांचे तोरण बांधले. या वेळी शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. प्रवेशद्वारासोबतच अधिकाऱ्यांच्या बैठकीतही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेली बोंडे आणून टाकली.  साडेतीन एकरांत आजवर एकच वेचणी झाली. चार क्‍विंटलच कापूस निघाला. कपाशी चांगली दिसते, पण एकही बोंड शेंदरी बोंडअळीनं कामाचं ठेवलं नाही, काय करावं.  - विठ्ठल चव्हाण, कपाशी उत्पादक शेतकरी, वजनापूर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद.   शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जी फॉर्म व इतर कापूस कायद्यातील फॉर्म न भरता तातडीने सरसगट पंचनामे व हेक्‍टरी एक लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी पुढील कार्यवाहीस्तव कृषी आयुक्‍तांकडे पाठविली आहे. - संजीव पडवळ, अधीक्षक कृषी अधिकारी, औरंगाबाद. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com